पाईपर - भाग २

दिंनाक: 06 Sep 2018 15:26:20


आई आणि मूल या नात्यावर बोलावं तेवढं थोडं. तुम्हा सर्वांच्याही तुमच्या आईसोबतच्या काही आठवणी असतील. कधी आईच्या मायेबद्दल, प्रेमाबद्दलच्या आठवणी तर कधी प्रसंगी आईने कान पिळल्याच्याही आठवणी. असं म्हणतात पालकत्व म्हणजे जसा मुलांना आधार देणं, तसंच योग्य वेळी मुलांचा हात सोडणं हेही.

पाईपर ही ऍनिमेटेड शॉर्टफिल्म पालकत्वाच्या याच कल्पनेवर आधारित आहे. आपण समुद्रकिनारी जातो तेव्हा काय पाहतो तर समुद्राची वेगळी रेती, शंख, शिंपले, पाणपक्षी, विंचू इत्यादी इत्यादी. पाईपर ही गोष्ट पाणपक्ष्यांच्या जीवनाशी निगडित आहे. पाणपक्षी काय करतात तर समुद्रकिनारी जे शंख शिंपले असतात त्यात वाढणाऱ्या किड्यांना खातात. तेच त्यांचं जेवण असतं. असाच एक पक्ष्यांचा थवा/समूह आहे. रोज असे शंख,शिंपले यांच्यातले किडे खाण त्यांची दिनचर्या आहे. त्यांच्यामध्येच आहे एक आई आणि पिल्लू. सर्वसाधारणपणे प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये पिल्लू थोडं मोठं होईपर्यंत किंवा उडायला लागेपर्यंत आईच पिल्लांसाठी खाद्य घेऊन येते ज्यावर त्या पिल्लांचं पोट भरतं. आता या गोष्टीतही तसंच आहे.इतके दिवस आपल्या पिल्लासाठी खाद्य घेऊन येणारी आई, आता पिल्लाने हे काम स्वतः करावं असं इच्छिते. पण त्या पिल्लाची मात्र मानसिक तयारी नाहीये किंवा आत्मविश्वास नाहीये असं म्हणूयात. मग आई त्या पिल्लाला स्वतःच्या भरवश्यावर सोडून देते कारण त्याशिवाय ते पिल्लू शिकणार कसं?

मग सुरू होतात पिल्लाचे प्रयत्न. पहिल्या दिवशी लाटेच्या पाण्यात पिल्लू इतकं भिजत की त्याला मनात भीतीच बसते. मग दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीही तीच कथा. मग मात्र पिल्लू मनाचा हिय्या करून आज काहीही झाले तरी यश मिळवायचेच या इराद्याने या जीवनाच्या लढाईत उतरतं. आज मात्र त्याला एक युक्ती सुचते आणि ही युक्ती शंख, शिंपले यांच्यातले किडेच यांच्यामुळेच सुचते. ती युक्ती वापरून पिल्लू यशस्वी होतं आणि त्याच्या आईला त्याचा खूप अभिमान वाटतो.

कोणती ती युक्ती? या प्रश्नाचं उत्तर ही शॉर्टफिल्म पाहून मिळवा. पाईपर ही ऍनिमेटेड शॉर्टफिल्म डिजने पिक्सर यांनी बनवलेली असून यातले अनिमेशन्स अगदी पाहण्यासारखे आहेत. प्रत्येक दृश्यातले बारकावे, व्हिज्युअल इफेक्ट्स मनावर खोल परिणाम करतात आणि हे सगळं खूप मनोरंजनात्मक आणि सुंदर आहे. अशी ही शॉर्टफिल्म कमी वेळात खूप लोकांना आवडली नसती तरच नवल!!

तर खालील लिंकवर क्लीक करून नक्की पहा 'पाईपर'
 
 
 
 
सौजन्य - युट्यूब 
-भाग्यश्री भोसेकर 
 
जमेल तेव्हा, जमेल तेवढी मदत आपण प्रत्येकाला केली पाहिजे हा सुंदर संदेश देणारी शॉर्टफिल्म