"सखी हसली, जोडी जमली।

नेहा अन् सारिकेची, फुगडी रंगली।"

नेहा आणि सारिकेची फुगडी वेग घेऊ लागली, सर्वांनी आरडाओरड करून त्यांना आणखी प्रोत्साहन दिलं. शेवटी दमून दोघी थांबल्या.

"आता पुढची जोडी.... चल, केतकी ..." स्नेहलताईनं केतकीला उठवलं. स्नेहलताईनं अपेक्षेने शमिकाकडे पाहिलं. केतकी - शमिकाची जोडी सगळ्यांनाच ठाऊक होती. पण केतकीनं सायलीला बोलावलं आणि तिच्याबरोबर फुगडी घालायचा सुरुवात केली. पुढे सरसावलेली शमिका आश्चर्यानं बघतच राहिली.

"जोडी फुटली, मैत्रीण रुसली।

अशी कशी बाई यांची मैत्री तुटली।" कुणीतरी विचारलंच.

केतकीनं दुर्लक्ष केलं.

"ताई आम्ही मित्रांनी घातली तर चालेल फुगडी?", संकेतनं विचारलं.

"हो.... कां नाही?" स्नेहलताईनं दुजोरा दिला; पण तिच्या मनात केतकी शमिकाचं काय बरं बिनसलं असेल हाच विचार चालू राहिला.

संकेत - निखिलची जोडी झाली, साहील - अथर्वची जोडी झाली.

शमिकानं मुद्दामच निखिलशी जोडी लावली .....

छोट्या वेदाबरोबर साहीलदादानंही फुगडी घातली.

मग मात्र ताईनं केतकी - शमिकाला सगळ्यांसमोर बोलावून विचारलंच....."काय झालंय काय तुम्हा दोघींना?"

"काय माहीत....? आज ही जरा विचित्रच वागतेय माझ्याशी", शमिका.

"मी विचित्र वागतेय का तू?", केतकीनं एकदम चढा सूर लावला. सगळे स्तब्ध झाले.

"ही शमिका, काल ही माझ्यासाठी न थांबता एकटीच डान्स प्रॅक्टीसला पुढे गेली. तिथूनही मला न सांगता लवकर सटकली. आज इथे येतांनाही नंतर कुठूनतरी एकटीच आली... आणि वर मलाच म्हणते मी विचित्र वागते म्हणून?"

केतकी अगदी रडू फुटलं. 

"अगं केतकी, अशी काय रागावतेस तू? तुला आजीनं निरोप दिला नाही का काल?", शमिका केतकीला मनवू लागली.

"काही सारवासारव करू नकोस आता....", केतकी फणकारली.

"अगं, पण ती काय म्हणते ते ऐकून तरी घे जरा....", स्नेहलताईनं मध्यस्थी केली. 

शमिका सांगू लागली...."अगं, तुझी आजी खालीच भेटली काल. मी तिला सांगितलं की, ताईनं दोन दिवस माझ्या छोट्या भाचीसोबत राहायला बोलावलंय म्हणून. आणि मी लगेच ताईकडे गेले. तिथून संध्याकाळी प्रॅक्टीसला लवकर गेले आणि लवकर निघून पुन्हा ताईकडे गेले. तिथेच राहिले. आज नाहीतरी शाळेला सुट्टीच होती. म्हणून ताईकडून डायरेक्ट इथेच आले. आता मला काय माहीत तुला निरोपच मिळाला नाही ते... उगीच चिडचिड करते..." 

"बघ.....आता कोण चुकलं?", ताईनं केतकीला विचारलं.

केतकी ओशाळली..... जरा नरमाईनंच म्हणाली, "अगं, मी प्रियाकडे नोट्स घ्यायला गेले होते. घरी आले तर आजी देवळात गेलेली. आमची चुकामुकच झाली म्हणायची."

"बघितलंत..... छोट्याशा गोष्टीमुळे कसे गैरसमज होतात ते.", स्नेहलताईनं सर्वांनाच ताकीद दिली.

"अरे मित्र समजता ना एकमेकांना? मग मैत्रीत साध्या गैरसमजांमुळे इतके रागावता? अगदी मैत्री तोडायला निघता? सच्च्या मैत्रीत तर उलट खरा विश्वास पाहिजे एकमेकांवर. अगदी कोणी जाणीवपूर्वक जरी एकमेकांत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी आपला प्रथम मित्रावर विश्वास हवा. कुठल्याही ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी, मित्राशी बोलून खऱ्या खोट्याची शहानिशा करून घ्यायला हवी.

आयुष्यात प्रत्येकाला एक तरी असा मित्र किंवा अशी मैत्रीण असायला हवी, ज्या व्यक्तीबरोबर आपण आपल्या मनातलं दिलखुलासपणे, विनासंकोच बोलू शकतो. समवयस्क असल्याने, आनंदात तसंच दु:खात, यशात तसंच अपयशात, समाधानात तसंच नैराश्यात तिच्याजवळ आपलं मन मोकळं करू शकतो. अशी व्यक्ती आपलं म्हणणं मनापासून ऐकून घेते, आपल्याला समजून घेते, आपल्या दु:खात सहभागी होऊन धीर देते, आपली चूक दाखवून प्रसंगी आपली कानउघाडणी देखील करते. तिनं केलेल्या मदतीच्या बदल्यात तिची काही अपेक्षाही नसते. अशी निरपेक्ष मैत्री जपणं हेही तितकंच महत्त्वाचं, हेही लक्षात ठेवा."

"ताई, मग मुलाला मैत्रीण किंवा मुलीला मित्र असू शकतो?", साहील.

"का नाही? जरूर असू शकतो. मैत्रीचं नातंच इतकं छान असतं, की त्यात असा भेदभाव असूच शकत नाही. पण ते पवित्र नातं दोघांनीही प्रामाणिकपणे जपलं पाहिजे. मग कशाला कुणाला त्यात वावगं वाटेल?", स्नेहलताई. 

इतका वेळ ताईचं बोलणं ऐकल्यावर, केतकीनं शमिकाकडे धाव घेतली. गैरसमजाचं सावट दूर झालं. दोघींच्या डोळ्यातून श्रावणसरी ओघळू लागल्या. आनंदानं त्यांनी फुगडी घालायचा सुरुवात केली.

"पाहा बाई पाहा, मैत्रिणी पाहा। केतकी - शमिकाची फुगडी पाहा"....

मैत्रीचा श्रावण फुलला.... कट्टी बट्टीचा ऊनपावसाचा खेळ संपला.

जिकडे बघावी तिकडे मैत्रीची हिरवळ.....

आनंदी आनंद गडे । इकडे तिकडे चोहिकडे ।।

या श्रावणाचंही तसंच आहे......

वर्षभरातल्या बारा महिन्यांमध्ये, या श्रावणाचा आनंद काही वेगळाच आहे.

हा आनंदाचा श्रावण, उत्साहाचा श्रावण, सणांचा श्रावण, बहीण भावांच्या नात्यांचा श्रावण.

फुललेल्या निसर्गाचा, नवचैतन्याचा, अमृतधारांनी तृप्त झालेल्या धरतीचा,

विविधरंगी इंद्रधनुष्याचा, रंगीबेरंगी सुगंधित कुसुमांचा,

शिवभक्तीचा, कृष्णजन्माच्या आनंदोत्सवाचा,

नागोबा आणि बैलांच्याप्रती कृतज्ञतेचा,

झाडांवर झुला बांधून झोके घेणाऱ्या माहेरवाशिणींचा, मंगळागौर पुजून रात्र जागवणाऱ्या सुवासिनींचा, व्रतवैकल्यात समाधान मिळवणाऱ्या आज्यांचा आणि सणासुदीच्या निमित्ताने रोज मस्त मस्त गोड धोड खाणाऱ्या बाळगोपाळांचा........

सर्वांचा आवडता श्रावण......

बालकवी म्हणतात त्याप्रमाणे....

श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे । क्षणांत येते सरसर शिरवे, क्षणांत फिरुनी ऊन पडे ।।

तर कुसुमाग्रज म्हणतात तसा......

हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला ।

तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला ।

मेघात लावित सोनेरी निशाणे, आकाशवाटेने श्रावण आला ।।

स्नेहलताईनं रंगवलेल्या या श्रावणाच्या लोभस रूपात सर्वजण रंगून गेले.

-मधुवंती पेठे 

[email protected]


लेख ६ - सांग ना स्नेहलताई .....