गणपती बाप्पा! लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना हवासा वाटणारा बाप्पा कधी एकदा आपल्या घरी येतो असे प्रत्येकालाच वाटत असते. तो येणार म्हटलं की सगळे महिनाभर आधीच तयारीला लागतात… मग या तयारीत बच्चे कंपनीही मागे कशी राहील? लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तेही जोमाने तयारीला लागतात. चिमुकल्यांच्या या तयारीत सहभाग घेत शिक्षणविवेकने या लहानग्यांना चक्‍क बाप्पाची मूर्ती साकारण्याची संधी दिली आणि सगळ्यांनी त्यात उत्साहाने सहभाग घेत एकापेक्षा एक छान –छान बाप्पाच्या मूर्ती साकारल्या.

१ सप्टेंबर, २०१८ रोजी पूर्व-प्राथमिक ते माध्यमिक वयोगटाच्या मुलांसाठी ‘शिक्षणविवेक’ आयोजित ‘घडवू गणपती स्व-हस्ते’ कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळाला सुरुवात होताना मुलांच्या चेहेऱ्यावर खूप उत्सुकता दिसत होती. गणपती कशाचा बनवायचा? कसा बनवायचा? रंगवायचा का? मला ते जमेल ना? असे एकानेक प्रश्न मुलांच्या चेहऱ्यावर होते.

न्यू इंग्लिश मिडियम स्कूलचे कलाशिक्षक सुरेश वंरगटीवर यांनी गणपतीच्या गोष्टी कुणाला कुणाला माहिती आहेत, असे विचारल्यावर खूप जणांनी गणपतीची गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि गणपतीच्या वेगवेगळ्या आणि छान गोष्टी ऐकतच शाडूच्या मातीचे गोळे एकमेकांना पुरवत या कार्यशाळेला सुरुवात झाली. वरगंटीवार सरांनी मुलांना अतिशय सोप्या पद्धतीने गणपतीची मूर्ती कशी घडवायची, हे शिकवले.

गणपतीला बसायला पाट कसा तयार करायचा?, पोटाला कसा आकार द्यायचा?, हात, पाय, सोंड, कान इ. अवयवांना कसा आकार द्यायचा जेणेकरून सुंदर अशी मूर्ती घडेल, हे सरांनी सांगितले. मूर्तीचा एक एक भाग साकारत सर्वांत शेवटी मुकुट कसा तयार करायचा हे सरांनी दाखवले. सरांच्या सहकार्याने शिक्षणविवेकच्या प्रतिनिधीचेही मुलांना मूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन चालू होते. चिमुकल्यांचा आपापल्या परीने सुंदर अशा बाप्पाच्या मूर्ती साकारण्याचा प्रयत्न चालू होता. सकाळी ११ ते २ या वेळेत स्वा. सावरकर अध्यासन केंद्र येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. तीन तासांच्या या कार्यशाळेत मुलांनी अनेक रूपातील बाप्पाच्या मूर्ती साकारल्या. त्यात उंदरावर बसलेले, मल्हार रूपातील, वेगवेळे फेटे घातलेल्या मूर्ती तयार केल्या होत्या. विविध शाळांच्या १३० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतल्याने नव्या मित्र-मैत्रिणींबरोबरच आपली स्व-हस्ते साकरालेली बाप्पाची मूर्ती घेऊन आनंदातच मुले घरी परतली.

-प्रतिनिधी

[email protected]