INS दादागिरी

दिंनाक: 30 Sep 2018 15:32:50


पाकिस्तान विरोधातील ७१व्या युद्धामध्ये पाकिस्तानी नाविक दलाला ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडणाऱ्या ‘गिरी’ स्क्वाड्रन जहाजाच्या ताफ्यात नवीन जहाज येणार होते. तेव्हा आमच्या नौसैनिकांत त्याच्याच गप्पा रंगल्या होत्या. दरम्यान आमच्या गप्पा सुरू असताना कुणीतरी सहजच विचारले.

‘अरे, यार या नव्या जहाजाला काय नाव देणार... आतापर्यंत आपल्या या गिरी स्क्वाड्रनमध्ये INSˆ द्रोणागिरी झाली. उदयगिरी झाली, अगदी रत्नागिरी पण झाली, मग नवीन नाव काय असेल...?’

त्या वेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि राष्ट्रपती  होते व्ही.व्ही. गिरी. आमच्यातलाच एक तमिळ नौसैनिक अत्यंत हजरजबाबी होता. तो पटकन म्हणाला इंदिराजी या जहाजाचे नाव INS व्ही.व्ही. गिरी ठेवणार बहुतेक. आमचा कोल्हापूरकडचा एक मराठी गडी होताच, तो वरकडी करत म्हणाला... ते नाही ठेवणार नाव.. तर तर INS ‘दादागिरी’ ठेवा आणि खरोखरच या गिरी स्क्वाड्रनने त्या युद्धात दादागिरीच गाजवली होती.

पाकिस्तानी जवानही म्हणायला लागले होते. ‘अरे, गिरी तो गिरी, क्या गिरी... दबा के गिरी हमे डुबा के चली गयी।’

या गिरी जहाजाची ही खासियत होती की, त्या ९० टक्के हिंदुस्थानी बनावटीच्या होत्या. त्यामुळे गिरी स्क्वाड्रनला स्वदेशी अभिमान चिकटलेला होता. नवीन नौका आली. तिचे नामकरण व्ही.व्ही. गिरी किंवा दादागिरी न ठेवता ‘INS तारागिरी’ ठेवले गेले, पण जेव्हा जेव्हा तारागिरी जहाजाचा विषय निघतो, तेव्हा ती मराठी दादागिरी आठवल्याशिवाय राहात नाही.


-कॅप्टन विनायक अभ्यंकर

[email protected]

 

जरा याद करो कुर्बानी