गोपाळकाला

दिंनाक: 03 Sep 2018 17:15:26


श्रावण वद्य अष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस. या दिवशी मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म झाला. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. भारतीय संस्कृतीने आणि धर्माने मानलेल्या भगवंताच्या दशावतांरापैकी श्रीकृष्ण हा आठवा अवतार होय. म्हणूनच या दिवशी रात्री बारा वाजता कीर्तन-भजनाने हा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. दुसर्‍या दिवशी जन्मोत्सवाचा उत्सव म्हणून गोपाळकाला हा उत्सव अतिशय उत्साहात भारतात सर्वत्र साजरा होेतो. कित्येकांच्या घरी गोकुळ वृंदावनाचा देखावा करून जन्मोत्सव साजरा होतो आणि दुसर्‍या दिवशी काला केला जातो. गोपाळकाला हा महाराष्ट्रातील वैष्णवांचा एक नृत्योत्सव आहे. दही, दूध, लोणी, लाह्या हे सारे पदार्थ एकत्र करून कालवणे आणि त्याचा प्रसाद देणे म्हणजे ‘काला’ होय. काल्याची परंपरा कृष्णलीलेत आहे. गोकुळात वावरणारा बाळकृष्ण लहानपणी गोपगड्यांना सवे घेऊन गोकुळात खोड्या करी. गोपाळांना घेऊन गौळणींच्या घरी जायचे. दह्या-दूधाचे माठ फोडायचे. दही-दूध खायचे आणि गौळण मागे धावत येईपर्यंत पळून जायचे. मग सगळ्या गौळणी राजवाड्यावर यशोदेला कृष्णाची गार्‍हाणी येऊन सांगत. सार्‍या खोड्या यशोदेच्या कानावर घालत. आता याच्या खोड्या वाढत चालल्या आहेत; त्यावर निर्बंध घालायला हवा म्हणून यशोदा कृष्णाला रानात गोधने राखायला पाठवत असे. पितांबर, डोक्यावर मोरपिस आणि हातात घुंगराची काठी आणि खांद्यावर घोंगडी घेऊन कृष्ण रानात गोपगड्यांसह गाई चारायला जाई. त्या वेळी रानाच्या शिवारात कृष्णासह सगळे गोपाळ विविध प्रकारचे खेळ खेळत. त्यात हुतुतु, आट्यापाट्या, हमामा, एकाबेकी यांसारखे खेळ असत. खेळ खेळून सारे गुराखी दमले की मग झाडाखाली एकत्र शिदोरी खायला जमायचे. श्रीकृष्ण सार्‍या गोपाळांच्या शिदोर्‍या एकत्र करायचा आणि त्या सर्वांचा एकत्र काला करून सर्वांना वाटायचा. काला ही एकरूपतेची आणि सहजीवनाची निशाणी आहे. सगळ्यांच्या घरातील पदार्थांचा एकत्रित काला खाऊन सारे गोपाळ आनंदित व्हायचे. ही काल्याची परंपरा कृष्णजन्माचा गोपाळकाला म्हणून पुढे खूप लोकप्रिय झाली.

कृष्ण जन्माच्या दुसर्‍या दिवशी काल्याची आणि दहिहंडी फोडण्याची प्रथा सुरू झाली. गावात मध्यभागी चौकात दोन उंच इमारतींना दोर लावून दहिहंडी बांधलेली असते. त्यात दही, दूध, लोणी, लाह्या, पोहे असतात. गावातील तरुण मुले एकमेकांच्या हातात हात घालून नाचत-नाचत रस्त्याने जातात. आणि गाणे म्हणतात.

गोविंदा आला रे आला।

गोकुळात आनंद झाला।

दहिहंडी फोडणार्‍या ह्या मुलांना गोविंदा असे म्हटले जाते. हे गोविंदा दहिहंडीच्या खाली गोलाकार नाचत मानवी मनोरे ऊभे करून, शेवटचा उंचावरचा मुलगा दहिहंडी फोडतो आणि दहिहंडीतील दही, दूध, लाह्या, पोहे यांचा काला सर्वांच्या अंगावर पाडतो. तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. नंतर दहिहंडीची गाणी गात आणि नृत्य करीत गोपाळकाल्याच्या उत्सवाची सांगता होते. काही ठिकाणी गोपाळकाल्याचा आणि दहिहंडीचा प्रसंग हा श्रीकृष्ण, गोपाळ यांची वेषभूषा करून, त्यांच्या रूपात दहिहंडी फोडून करतात. काही ठिकाणी काल्याचे कीर्तन करून कीर्तनकारक दहिहंडी फोडून गोपाळकाला करतात. देवाशी एकरूप होऊन मिळलेला प्रकार म्हणजे काला. संत तुकाराम महाराजांनी काल्याच्या एका अभंगात म्हटले आहे,

उपजोनिया पुढती येऊ

काला खाऊ दहिभात।

एकमेका देऊ मुखी...।

अनेक संतांनी ‘काला’ या विषयावर अभंग लिहून काल्याचे रूपक सांगितले आहे. जीव आणि शिव, देव आणि भक्त यांचे ऐक्य आणि एकरूपत्व म्हणजे काला होय. हा ऐक्यभावाचा गोपाळकाला भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे महान प्रतीक ठरला आहे.

-रामचंद्र देखणे

[email protected]