लहान मुलांमध्ये सामाजिक विकास हा तितकाच महत्त्वाचा असतो. वाढत्या वयातच सामाजिक कौशल्ये वाढवणेही गरजेचे असते. जन्मतः सगळेजणच अहंकारपूर्ण असतात, फक्त स्वतःचा विचार करणारे, कारण सगळ्याच मुलांना असे वाटत असते की, अख्खे जग आपल्या भोवती फिरते. लोकांचा विचार करणे हे त्यांना शिकवायला लागते. जसजशी मुले मोठी होतात, तसतशी त्यांची सामाजिक देवाणघेवाण सुरू होते आणि या वेळेस इतरांचा विचार करणे हे अत्यंत गरजेचे होऊन जाते.

इतरांबरोबर सकारात्मक संवाद साधता येणे, यानेच मुलांचे सामाजिकीकरण सुधारते. सामाजिक विकास होण्यासाठी ३ गोष्टींवर भर देणे आवश्यक असते.

आपल्या भावनांची माहिती असणे : ज्या मुलांना स्वतःच्या भावनांची जाणीव असते आणि जी मुले त्या समजून घेतात, त्यांची इतरांशी मैत्री आणि नाती कायम चांगली टिकून राहतात. ते अवघड परिस्थितींमध्येदेखील शांत राहू शकतात. जसे ते मोठे होतात तसे त्यांच्या भावनांना नाव देणे आणि त्यांना त्यांचे परिणाम समजावून सांगणे ही जबाबदारी आपली असते.

भाषा, वाचा आणि संवाद याचादेखील आपल्या जीवनात महत्त्वाचा भाग असतो. आपल्याला अनुसरून मुले भाषा शिकतात, नवीन शब्दांचा वापर शिकतात, वेगवेगळे आवाज शिकतात. हातवारे करणे, डोळे फिरवणे, मान डोलावणे हासुद्धा भाषेचाच भाग आहे की.

सहानुभूती : म्हणजेच दुसर्‍याचा दृष्टिकोन जाणून घेऊन आपला प्रतिसाद द्यायच्या आधी त्याच्या भावनांचा विचार करण्यासाठी आधी आपल्या भावनांची माहिती असणे आणि त्या योग्य रित्या व्यक्त करता येणे हे जास्त गरजेचे असते. जी मुले सहानुभूती व्यक्त करू शकतात त्यांना सामाजिकीकरण सोपे जाते व मोठे होऊन आपल्या कामातही ते यशस्वी होऊन दाखवतात.

मुलांमध्ये सामाजिकीकरण निर्माण करण्यासाठी संगीत हा एक महत्त्वाचा घटक असतो, असे अनेक संशोधनातून मांडले आहे. संगीत आणि भाषा यांचे एकमेकांशी घनिष्ठ नाते असते. संगीताबद्दलची जाणीव मुलांच्या भाषेच्या विकासात खूप मदत करते. ताल, सूर आणि संगीत हे सर्व मुलांना बोलायला, वाचायला व एकंदरीत संवाद साधायला नक्कीच प्रोत्साहित करतात.

काही संशोधनाप्रमाणे भाषा आणि संगीताशी संबंधित शिरा या आपल्या मेंदूमध्येदेखील ओव्हरलॅप होतात. शब्दांपासून वाक्य, त्यापासून मोठी वाक्य आणि त्यालाच थोडी चाल लावली, की झाली मुलांची गाणी तयार! बाळाच्या जन्मापासूनच पालक गाण्यांचा वापर बाळाला शांत करण्यासाठी, त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्याशी खेळण्यासाठी करतात. संगीतामुळे मुलांचीही मानसिक आणि सामाजिक वाढ उत्कृष्ट होते. एका अभ्यासाप्रमाणे, जर लहानपणी मुलांची संगीताशी ओळख झाली, तर त्यांची बोली भाषा आणि वाचण्याची क्षमता सुधारते. गाण्यामुळे शालेय गरजेच्या सगळ्याच areas (बौद्धिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक)मध्ये सुधारणा होते.

जेव्हा अगदी तान्ह्या बाळांना गाणी ऐकवली जातात, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरसुद्धा हास्य उमटते. थोडी मोठी मुले गाण्यांवर टाळ्या वाजवतात, उड्या मारतात, नाचतात, इतकेच काय तर आपले शब्द वापरून त्याच चालीवर नवीन गाणेदेखील तयार करतात.

संगीतामुळे घरातील ताण-तणावसुद्धा दूर होऊ शकतो, पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जवळीक निर्माण होऊ शकते. शाळेच्या गटात गाणी लावली/वाद्य वाजवली, तर मुले एकमेकांच्या सानिध्यात छान प्रगती करतात. लाजाळू (shy) आणि अंतर्मूख (introvert) मुलांना इतरांबरोबर एकत्र येण्याची चेतना मिळू शकते.

संगीताचा आपल्या व मुलांच्या भावनांवरदेखील परिणाम होतो. ते स्वतःच्या भावना ओळखू व सांभाळू शकतात, गरजेप्रमाणे बदलू शकतात. तसेच कुठल्या गाण्यामुळे आपण शांत होतो, कुठल्याने उत्साहित होतो, हेही त्यांना कळते. स्वतःच्या भावना ते मोकळेपणाने व्यक्त करू शकतात, तर मग पालक म्हणून आपण आता असा एक निश्चय करू की, रोज किमान एक गाणे तरी मुलांना ऐकवायचे किंवा त्यांच्याबरोबर म्हणायचे. बघा, तुमचे व त्यांचे आनंदाचे क्षण किती वाढतील.

-प्रियांका जोशी

[email protected] 

 

आजूबाजूच्या परिसरातील रोजच्या आयुष्यात लागणार्‍या सर्व सामान्य गोष्टींची माहिती सांगतायेत प्रियांका जोशी  
आपला परिसर आणि मुले