कळलावी

दिंनाक: 26 Sep 2018 14:41:03


कळलावी ही लिली प्रजातीतील एक वनस्पती आहे. ती बहुवर्षीय, वेलवर्गातील आहे. कळलावी ही वनस्पती प्रसूतीसाठी कळा आणण्याचे काम करते. हीचे शास्त्रीय नाव ग्लॉरीओसा सुपर्णा. पहिलं सुंदर फुले येणारी आणि ती सुंदर दिसते म्हणून सुपर्णा. ती कळा आणण्याचे काम करते म्हणून तिला कळलावी (प्रचलित नाव) म्हटले जाते. कळलावीच्या फुलांच्या पाकळ्यांची टोके तांबडी व मधला भाग पिवळा असल्याने ट्रॅफिक सिग्नलचे तीन रंगच जणू, अग्निज्वाळा असल्याचा भास होतो. आणि अशा या पाकळ्या दुरून समईत ज्योती तेवल्यासारख्या दिसतात. म्हणून तिला ‘अग्निशिखा’ असेही म्हणतात. तसेच फुलांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या वेलीला कलहारी, गौरीचे हात, बचनाग अशीही नावे आहेत. फुले नसतानाही ही वेल तिच्या कुरळ्या नखरेल पानांमुळे सहज ओळखू येते. पावसाळ्यात कोकणात बऱ्याच ठिकाणी हिची लाल रंगाची आकर्षक फुले आपले लक्ष वेधतात. हिच्या पानांना देठ नसतात. पाने साधी पानांचा शिराविन्यास समांतर असून खोडावरील मांडणी एका आड एक लांबट शंकूच्या आकाराची परस्परविरोधी गुंडाळलेली, टोकदार असतात. पानांची टोके स्प्रिंगसारखी, विळखे घेऊन पकड घेत घेत वर चढतात. फुलांचा देठ आठ ते दहा से.मी. लांब असून फुलाचे तोंड खाली, पण पाकळ्या उलट्या वरच्या दिशेने वळलेल्या आणि कडा वेड्यावाकड्या असलेल्या सहा पाकळ्या दिसतात. सहा शेंदरी पुंकेसर आणि स्त्रीकेसाराचे ३ते४ तंतू फुलांतून बाहेर आलेले दिसतात. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत फुले येतात.

कोकण, पश्चिम घाटात तसेच मराठवाडा, विदर्भात ही सर्वत्र आढळते. हिची मुले इंग्रजी मुळाक्षर एल किंवा व्ही अशा विशिष्ठ आकाराची, हाताच्या बोटांसारखी असतात. याचे जमिनीखालील कंद पांढऱ्या रंगाचे, सुळसुळीत असतात. याची खोडाला लागून पाने येतात. ही वेल १०-२० फुटापर्यंत वाढते. फुले आकर्षक सुरुवातीला हिरवी, नंतर पिवळी, नारंगी आणि शेवटी लाल रंगाची होतात. फळे आधी हिरवट असतात व परिपक्व होताना राखाडी-पिवळी होतात. बिया गोलाकार राखाडी रंगाच्या असतात. कफवात शामक हा कळलावीचा गुण आहे.

जमिनीखाली या वनस्पतीला कुंद येतात, त्यास आगंतुक मुळे असतात. कळलावीची फुले दिसेनाशी झाली म्हणजे हीचे झाड कोठे होते हेही ओळखणे कठीण जाते. कारण पाने व वेलही ताबडतोब वाळतो. कंद सुप्तावस्थेत राहतो व पुढील पावसाळ्यात ते आपला जीवनक्रम पुन्हा सुरू करतात. हिला जग पाहायची घाई-देठ फुटण्याची वाटही ती बघत नाही. या वनस्पतींची लागवड परिपक्व फळांतील बिया व कंदाने केली जाते. हिचे आयुष्य और घटकेचे दिमाखदार, मजेदार, सुंदर.....!

कळलावीचे औषधीदृष्ट्या उपयुक्त भाग म्हणजे कंद, पाने आणि बी आहेत. पानांच्या रसाने उवा मरतात. बीमध्ये व पानात जास्त प्रमाणात कॉल्वीसीन हे औषधी द्रव्य सापडते. व्रण, सूज, गंडमाळा, सर्प व विंचूदंश यावर कंद उगाळून लेप लावावेत. कृमी व दौर्वल्य‌‌ यामध्ये ही कळलावी उपयोगी आहे. फुले धार्मिक उत्सवासाठी गौरीचे हात म्हणून गौरी गणपतीला वाहिली जातात. अलीकडे याची मुळे व बिया औषधात वापरल्या जात असल्याने हीचे उत्पादन कमी होत असल्याने ही प्रजाती संकटग्रस्त होत आहे. 

-मीनल पटवर्धन 

[email protected]

 

निशिगंध या फुलाविषयी माहिती घेऊ खालील लेखात.

निशिगंध (रजनीगंधा)