आईशप्पथ

दिंनाक: 24 Sep 2018 15:27:20

लहानपणीच्या काळात किंवा शालेय जीवनात आपल्या अनेक समजुती असतात, जसं की कुठल्याशा झाडाचं पान वहीत बरेच दिवस ठेवल्यावर त्याचं मोरपीस होतं किंवा आपण एखादी गोष्ट परीक्षेच्या आधी केली आणि पेपर चांगला गेला की आपण ती गोष्ट न चुकता पुढच्याही परीक्षेला हटकून करतोच. अशीच अजून एक ठाम समजूत म्हणजे कोणाचीही खोटी शपथ घ्यायची नाही असं केल्यास संबंधित व्यक्तीला काहीतरी होतं.
 
आईशप्पथ ही शॉर्टफिल्म या समजुतीवर आधारली आहे. शाळेला सुट्टी असल्याने सगळी मुलं चाळीत क्रिकेट खेळतायत. इथे मुंबईच्या टिपिकल चाळीच दर्शन घडतं. जुने जिने, सगळीकडे समान रंग असलेल्या आणि समान आकाराच्या खोल्या आणि जागेपेक्षा मन मोठी असणारी दिलदार माणसं. तर पुन्हा कथेकडे येऊयात सगळी मुलं क्रिकेट खेळतायत. दर वेळी क्रिकेट खेळताना काय होत बरं? बॅट्समनला अर्धशतक/शतक केल्याशिवाय आउट व्हायचं नसतं आणि विरुद्ध संघातल्या बॉलरला मात्र त्या बॅट्समनला आऊट करण्याची घाई झालेली असते. अशात बॅट्समन आऊट झाला की, मग होते चिडचिड आणि मग "ए रडीचा डाव नाही हं खेळायचा" अशी वाक्य वापरली जातात, हो नं? इथेही तसंच होतं बॅटिंग करणारा मुलगा आउट होतो, पण त्याला खेळ थांबवायचा नसतो म्हणून तो म्हणतो, "आईशप्पथ रे मी खरंच आऊट झालो नाहीये" आता याच बॅटिंग करणाऱ्या मुलाचा आतेभाऊ विरुद्ध संघात आहे आणि त्याच्या मात्र लक्षात येतं की आपला भाऊ खोटं बोलतोय आणि त्याने आपल्या मामीची खोटी शपथ घेतलीय. झालं याला आता मामीची काळजी वाटायला लागते.
 
आपल्या भावाने अशी खोटी शपथ घ्यायला नको होती, आता मामीला काहीतरी होणार ही काळजी त्या लहानग्याला ग्रासते. मग मामी गच्चीवर गेली की गच्चीला नीट कठडे नाहीत म्हणून, मामीला सकाळी झोपेतून उठायला उशीर झाला म्हणून, मामी घरातून दुपारी स्वतःच्या जायला निघते, पण तिला पोचता पोचता बराच उशीर होतो, मग पोहोचल्याचा फोन आला नाही म्हणून या आणि अशा अनेक कारणांनी हा लहानगा काळजीत पडतो. शेवटी मामी एकदाची सुखरूप घरी पोचते आणि याचा जीव भांड्यात पडतो.
 
एकूणच खोटी शपथ घ्यायची नाही या समजुतीवर आधारलेली ही शॉर्टफिल्म खूप छान आहे. त्या लहानग्याचा अभिनय खूप नैसर्गिक वाटतो, त्याच्या डोळ्यातले काळजीचे भाव क्षणभर आपल्यालाही प्रेक्षक म्हणून काळजीत पडायला भाग पाडतात. मुख्य भूमिका करणाऱ्या लहान मुलाच्या आईची भूमिका ऋजुता देशमुख यांनी केली तर मामीची भूमिका मधुरा वेलणकर या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलीय. दोघींचा वावर फार सहज आहे. इतर मुख्य भूमिकेत अभिषेक बचणकर आणि अभिजीत केळकर आहेत, तर दिग्दर्शन केलंय गौतम वझे यांनी.
 
कोणाची खोटी शपथ घ्यायची नाही यापेक्षा मुळात खोटं बोलूच नये असा सुंदर संदेश या शॉर्टफिल्ममधून घेता येईल. खालील लिंकवर क्लीक करून नक्की पाहा आईशप्पथ ही शॉर्टफिल्म 
 
 
सौजन्य - युट्यूब
 
-भाग्यश्री भोसेकर 
 
 आई आणि मूल या नात्यावर आधारित शॉर्टफिल्म 

पाईपर - भाग २