मित्रहो, मागील लेखामध्ये आपण पाहिले की आपल्या प्राणी मित्रांनी मानवाच्या या अवकाश स्पर्धेत कसे योगदान दिले. रशियाने स्पुतनिक-१ हा उपग्रह अवकाशात सोडून अमेरिकेला एका अर्थी आव्हानच दिले होते, त्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी त्या वेळी सरळ घोषणाच केली की, येत्या दशकाच्या आधी आम्ही मानव चंद्रावर उतरवू आणि सुखरूप परत आणू आणि या घोषणेने अमेरिकन आकाश संस्था नासासमोर फार मोठे आव्हान उभे केले. आता प्रस्तुत लेखामध्ये आपण पाहणार आहोत की, या आव्हानासाठी अमेरिकेने कशी तयारी सुरू केली आणि चंद्रावर मानवाचे पाऊल पडण्याआधी अमेरिकेने कोणकोणत्या मोहिमा यशस्वी केल्या.

केनेडीने अशी घोषणा केल्यानंतर लगेच नासाने आपली तयारी करायला सुरुवात केली. हे साल होते १९५९. त्या सालात रशियाच्या तुलनेत अमेरिका तांत्रिकदृष्ट्या फारच पिछाडीवर होती. याच काळात रशियाने जगातील पहिली महिला अंतराळवीर ‘वालेन्तिना तेरेश्कोवा’ला अवकाशात पाठवून अजून एक विक्रम हस्तंगत केला. त्यामुळे अमेरिकेवर असणारा दबाव फारच वाढला. त्यानंतर मात्र अमेरिकेने लाखो डॉलर हे या चंद्रावर माणूस उतरवण्याच्या मोहिमेवर खर्च करायला सुरुवात केली. १९६२ साली पहिल्यांदा अमेरिकेने चंद्राच्या पृथ्वीविरुद्धच्या बाजूने एक यान जाऊन धडकावले आणि त्याद्वारे आपण एखादे यान चंद्रावर पोहोचवू शकतो हे सिद्ध केले. त्यानंतर साधारण १९६५च्या सुमाराला पहिले मानवासहित उडालेले यान हे त्याची कक्षा बदलण्यात यशस्वी झाले. हे जितके वाटते तितके सोप्पे नव्हते. त्याआधी शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी फार किचकट आणि अवघड गणिते मांडून नीट कक्षा आणि नंतर ती बदलता येऊ शकेल याचे अंतिम गणित मांडले. हे अवघड होते कारण एखाद्या अतिशय वेगात म्हणजे सुमारे ६५,००० कि.मी. प्रती सेकंद या वेगाने जाणार्‍या यानाचा वेग बदलून दिशा बदलावी लागणार होती. हे फारच अवघड होते. तरीसुद्धा १९६५ साली शास्त्रज्ञांनी हे करून दाखवले. त्यानंतर त्याच साली जेमिनी या प्रोग्राम अंतर्गत दोन याने ही एकमेकांच्या समांतर नेणे हे सुद्धा शक्य केले. या काळात जरी अमेरिका ही या अवकाश स्पर्धेत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असली तरीसुद्धा रशिया काही मागे नव्हती. रशियाने आपले ‘लुना-९’ हे यान चंद्रावर उतरवले आणि चंद्राचे पहिले फोटो पृथ्वीवर पाठवले.

याच काळात पुढील वर्षी अमेरिकेने १९६६ साली दोन याने ही समांतर ठेवून एकमेकांमध्ये Docking म्हणजेच एक यान अंतराळात दुसर्‍या यानाला जोडले. ही चंद्रावर जाण्याच्या दृष्टीने फार जास्त महत्त्वाची पायरी होती, कारण चंद्रावर जाणार्‍या यानाची रचना काहीशी अशीच असणार होती. त्यामुळे हे यश चंद्र मोहिमेबाबत फार जास्त महत्त्वाचे मानले गेले आणि अमेरिका अंतराळ स्पर्धेत अजून एक पाऊल पुढे गेली. त्याच्या पुढच्याच वर्षी १९६७ साली हेच Docking, मानव विरहित करून दाखवले आणि अमेरिकेने अजून एक झेप घेतली. त्याच पुढे १९६८ च्या साली अपोलो-८ या मिशनमध्ये मानवाने पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाऊन चंद्र मोहिमेच्या तयारीत अजून पुढचा झेंडा रोवला.

या सर्व स्पर्धेच्या काळात अवकाशात जाण्यासाठी जे काही तंत्रज्ञान लागेल ते सर्व विकसित करण्याचा प्रयत्न करून आणि त्यासाठी लाखो डॉलर खर्ची करून नासा आणि परिणामतः स्वतःची प्रतिष्ठा अमेरिकेने जपली आणि आता तो क्षण जवळजवळ येत चालला होता. शतक संपायला फक्त दीड वर्ष उरले होते आणि आता शतक संपायच्या आत चंद्रावर उतरण्यास आणि सुखरूप परत येण्यात फारच थोडा अवधी उरला होता. अमेरिकेसाठी ‘करो या मारो’ सारखी परिस्थिती आलेली. साधारणतः सर्व अमेरिका आणि परिणामतः सर्वच जग या स्पर्धेत खेचले गेलेले. सर्वांचे डोळे त्या क्षणाची वाट बघत होते, ज्या क्षणी मानव चंद्रावरून सर्व जगाला लाईव्ह संदेश देणार होता. कारण या चंद्र मोहिमेचे लाईव्ह टेलिकास्ट जगभर होण्याची व्यवस्था अमेरिकेद्वारे करण्यात आलेली होती. त्याच प्रमाणे एखाद्या वस्तू अथवा सेवेचे जसे विद्यापन केले जाते, तसेच या चांद्रमोहिमेचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विद्यापन करण्यात आले होते. आता सर्व जग तो क्षण जगायला तयार होते!

आत्तापर्यंतचे अवकाश मोहिमांचे सर्व प्रयत्न हे आपल्याला Youtube सारख्या माध्यमात पाहायला मिळू शकतील. या सर्व मोहिमांचा मानवी जीवनावर फार मोठा परिणाम झालेला आहे. आपण जे सर्व तंत्रज्ञान वापरतो त्यातील बहुतांश गोष्टींचा उगम सुद्धा या स्पर्धेतच आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात यायला मदत होईल. चला तर पुढील लेखात पाहूयात याच चंद्र मोहिमेची कथा!

-अक्षय भिडे

[email protected]

अवकाश स्वारीत मनुष्यासह इतर प्रजातींनी कशी मदत केली वाचा खालील लेखात.

अवकाश स्पर्धेत प्राण्यांचे योगदान!