कोणतंही नाटक चांगल्या संहितेशिवाय निर्माण होऊ शकत नाही. पण चांगली संहिता म्हणजे काय हा प्रश्‍न अनेकदा पडतो. या लेखात बालनाटकाची चांगली संहिता म्हणजे काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

लहान मुलांसाठी नाटक लिहिणं हे मोठ्यांसाठी लिहिल्या जाणार्‍या नाटकांपेक्षा कठीण काम आहे. लहान मुलांची मानसिकता समजून त्यानुसार संहिता लेखन करणं गरजेचं असतं. बालनाटकांचा विषय हा मुलांच्या भावजीवनाशी संबंधित असावा. नाटकात मुलांचे प्रश्‍न, त्यांच्या भाव-भावना, त्यांच्या समस्या असाव्यात. मात्र त्यातले खलनायक पालक नसावेत. मुलं आपले प्रश्‍न आपल्या पद्धतीने सोडवतात याचे दर्शन व्हावे. पुलंचं ‘वयम् मोठम् खोटम्’ हे बालनाटक याचं एक चांगलं उदाहरण आहे. मुलांना मोठं व्हावसं वाटतं. मात्र आपल्या लहान असण्यातच मजा आहे, हे त्यांचं त्यांनाच काही अनुभवांती कळतं हे यात दाखवलं आहे. मोठ्यांच्या भाषणबाजीशिवाय.

हल्ली लहान मुलांच्या बर्‍याच नाटकांवर टीव्हीवरील ‘चला हवा येऊ द्या’सारख्या लोकप्रिय मालिकांचा प्रभाव जाणवतो. जो खरं तर फारच चुकीचा पायंडा पडत आहे. केवळ एक गोष्ट एका माध्यमात लोकप्रिय झाली म्हणून तिचं अंधानुकरण करत राहिलो तर चांगल्या कलाकृती निर्माण होत नाहीत. बालनाटक लिहिणार्‍यांनी याचा नीट विचार करायला हवा. आपण नाटक लिहीत आहोत तेही मुलांसाठी. आपला प्रेक्षक हा मुलांप्रमाणे त्यांचे पालकही असतील. त्यामुळे त्याचे भान लेखन करताना सतत असायला हवे. आपल्या नाटकांतून पालकांचे उद्बोधन झाले तर चांगलेच आहे मात्र आपले लक्ष्य प्रेक्षक मुलं असावीत. याबद्दल मला माझ्या एका मित्राने सुचवलेला एक विषय आठवतो. बालनाटकाचा विषय सुचवताना तो म्हणाला होता की, हल्ली बाहेर काम करणार्‍या अनेक आया आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवतात. ही पाळणाघरात राहणारी मुलं आपल्या आयुष्यातील सुरुवातीच्या वर्षात जास्तीत जास्त वेळ पाळणाघरातच असतात. तर त्या सर्वांच्या संभाषणातून त्यांचं तिथलं आयुष्य आपण बालनाटकातून मांडू शकतो. तेव्हा मी म्हणालो, हा लहान मुलांचा विषय असला तरी हा बालनाटकाचा विषय नाही. हा मोठ्यांच्या नाटकाचा विषय आहे कारण त्यातून मुलांना नाही फक्त त्यांच्या पालकांनाच काही सांगायचं आहे. फक्त लहान मुलं नाटकातील पात्र आहेत म्हणून ते नाटक बालनाटक होत नाही. त्याचा विषय मुलांशी संबंधित असावा आणि त्यातून त्यांनाच काहीतरी सांगायचे मुद्दे असावेत.

वर म्हटल्याप्रमाणे बालनाटक हे केवळ हास्य निर्माण करण्यासाठी पंचेसची फोडणी दिलेले, अंगविक्षेप असलेले स्कीट नसावे. तर त्यात गोष्ट हवी, मुलांना विचार करायला लावणारे, त्यांचे गैरसमज दूर करायला लावणारे मुद्दे असावेत. (अर्थात ती सांगताना लेखकाने गंभीर, विनोदी किंवा इतर कोणत्याही बाजाचा वापर केला तरी चालेल.)

बालनाटक लेखकांनी लेखन करताना त्यातल्या संवादांवर विशेष लक्ष द्यायला हवे. त्यातील संवाद हे त्या त्या पात्राला शोभतील असे तर असायला हवेतच. शिवाय त्यातील संदर्भ हे मुलांच्या आयुष्याशी निगडित असायला हवे. यासाठी मी माझ्या ‘जब तक है जान’ या बालनाटकाचं उदाहरण देईन. या नाटकात यम, यमी त्यांचे सहकारी अशी पात्रे आहेत आणि त्याचा विषय जंकफुडचे दुष्परिणाम असा आहे. मात्र यातल्या पात्रांच्या संवादात मुले, त्यांची शाळा, परीक्षेतील गुण, खाण्याच्या सवयी यांचा जास्त वापर केला असल्यामुळे ते नाटक मुलांचंच राहतं.

संवादाचा विषय चालला आहे, तर मी आणखी एक उदाहरण देईन. हे उदाहरण माझ्याच ‘हनुमान’ या बालनाटकाचं आहे. याचा ‘मुलांना दिल्या जाणार्‍या पास होण्याच्या सुविधा आणि त्यामुळे मुलांचा शिक्षणाकडे पाहण्याचा बदलत चाललेला दृष्टीकोन’ असा विषय आहे. पूर्ण नाटकात माकडं आणि मुलं यांच्यातील संभाषण आहे. मात्र यात मी एका मुलाच्या तोंडी एक राजकीय कमेंट टाकली होती, ज्यावर नेहमी हशा यायचा. मात्र एका परीक्षकांनी ते नाटकात कसं गरजेचे नाही हे पटवून दिलं आणि मग मी ते काढून टाकलं. थोडक्यात, फक्त हशा आणि टाळ्या घेणे हा नाटकातील संवादाचा उद्देश नसावा. त्यातून एकूण परिणामास बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

खुल्या एकांकिका स्पर्धांमध्ये गाजलेल्या काही एकांकिका बर्‍याचदा बालरंगभूमीवर सादर केल्या जातात. त्या करण्यास हरकत नाही. मात्र त्या मुलांनी बघण्यासाठीच्या आहेत का, हेही तपासून पाहायला हवे. एका बालनाट्यस्पर्धेत ‘गमभन’ ही मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवरील एकांकिका बालनाट्य म्हणून सादर केली जात होती. मात्र प्रयोग सुरू असताना त्यातील काही आशय किंवा दृश्य (बालरंगभूमीचा विचार करता) आक्षेपार्ह असल्यामुळे परीक्षकांनी ती सादर होऊ दिली नाहीत. नाटकाचा कंटेंट हा नेहमीच सगळ्यांत महत्त्वाचा असतो हे लक्षात घ्यायला हवे. थोडक्यात, कसदार संहिता ही चांगल्या नाटकाचा पाया असते.

-सुरेश शेलार

 [email protected]