औद्योगिक क्रांती, दळणवळण व सरकारीकरण यामुळे चरितार्थाच्या अनेक जुन्या संधी गायब होत होत्या. त्याच वेळी अनेक नवीन संधी निर्माणही होत होत्या. नवीन संधीचा लाभ घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहायचे असेल तर शिक्षण घेणे गरजेचे होते. स्वत:च्या पायावर उभे राहण्याची गरज त्या वेळी सगळ्यात जास्त अर्थातच महिलांना होती. नेमका हाच विचार करून, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, रमाबाई रानडे व महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांना शिक्षण मिळावे म्हणून स्वातंत्र्यपूर्वकाळात प्रयत्न सुरू केले.

एकीकडे समाजाचा विरोध तर दुसरीकडे सरकारचे आडमुठे धोरण या दोन्ही गोष्टींवर मात करून फुले दाम्पत्याने एका लहानशा वाड्यातून मुलींच्या शाळेला सुरुवात केली. रानडे दाम्पत्याने अनाथ, विधवा व परित्यक्ता महिलांसाठी सेवासदन या संस्थेची स्थापना करून महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली, तर महर्षी कर्वे यांनी जगभरात फिरून मदत गोळा करत सुरू केलेल्या व चालवलेल्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने महिलांच्या समस्येचा मुळापासून विचार करून त्यांना सर्वसमावेशक शिक्षण देऊन, जगण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू केले.

ज्याप्रमाणे समाजातील सगळ्या घटकांना शिक्षण मिळत नाही, म्हणून काही नेते अस्वस्थ होते, त्याचप्रमाणे जे शिक्षण घेत आहेत त्यांना राष्ट्रीय विचाराचे शिक्षण मिळत नाही म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर व त्यांचे सहकारी अस्वस्थ होते. इंग्रजांनी सुरू केलेल्या शाळेतून शिक्षण घेतलेले भारतीयच इंग्रजी सत्तेला बळकट करत आहेत हे लोकमान्य टिळक व आगरकर यांच्या लक्षात आल्याने राष्ट्रीय विचारांचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची सुरुवात केली.

पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून सुरू झालेल्या पहिल्या बिगर सरकारी शाळेपासून नंतर पुण्यातच फर्ग्युसन कॉलेज पुढे सांगली, सातारा व मुंबई अशा शहरांमध्ये या संस्थेने राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा व महाविद्यालये सुरू केली. त्यातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला वैचारिक अधिष्ठान देणारे, इंग्रजांशी अहिंसेच्या व क्रांतीच्या माध्यमातून लढा देणारे अनेक देशभक्त आपल्याला मिळाले व राष्ट्रीय विचारांच्या शिक्षणाची गरज अधोरेखित झाली.

अशा प्रकारे समाजातील सगळ्या घटकांना शिक्षण मिळावे, राष्ट्रीय विचारांचे शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न व प्रयोग सुरू असताना शिक्षणाकडे बघण्याचा एकूण दृष्टिकोनच बदलून टाकणारे काही प्रयोगही सुरू झाले होते. आयुष्य सुखाने व समाधानाने जगण्यासाठी केवळ पुस्तकी शिक्षण देऊन उपयोग नाही, तर कृतीशील शिक्षणातून समाजासाठी जगणारा एक उत्तम नागरिक तयार करता आला पाहिजे या भूमिकेतून कृतीशील शिक्षणावर भर देणाऱ्या शिक्षणाची कल्पना महात्मा गांधीनी मांडली.

भारतातील वेगवेगळ्या प्रांतातून काही मुले महात्मा गांधीना भेटायला आली होती. त्या वेळी गांधीनी त्यांना विचारले, "तुमचे शिक्षणाचे माध्यम कोणते?" मुलांनी हिंदी, मराठी, इंग्रजी, बंगाली, गुजराती अशी त्यांच्या प्रांतात ज्या भाषेतून शिक्षण मिळत होते, त्या भाषांची नावे सांगायला सुरुवात केली. ते ऐकताच गांधीजी त्यांना मध्येच अडवून म्हणाले, "अरे थांबा, थांबा, मी तुम्हाला शिक्षणाचे माध्यम विचारतोय आणि तुम्ही तर मला तुम्ही कोणत्या भाषेतून शिकताय हे सांगत आहात."

गांधीजींचे म्हणणे मुलांच्या लक्षात न आल्याने मुले प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघू लागली. तेव्हा गांधीजी त्यांना म्हणाले, "अरे, शिक्षणाचे माध्यम म्हणजे तुमचे हात."

पुस्तकांतून शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून शिकल्यामुळे मुलांना सर्वांगीण शिक्षण मिळेल व त्यातून आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रश्नांना कृतीशील उत्तरे शोधणारे नागरिक मिळतील व या नागरिकांच्या माध्यमातून स्वराज्य व त्याचे फायदे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवता येतील असा गांधीजींचा ठाम विश्वास होता. गांधीजी कृतीशील शिक्षणाची संकल्पना मांडून तिथेच थांबले नाहीत, तर 'नयी तालीम'च्या माध्यमातून त्यांचे शिक्षणातील प्रयोग त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राबवले.

गांधीजींच्या या विचाराच्या पुढे जाऊन मुलांना जे हवे तेच शिक्षण मुलांना हव्या असलेल्या पद्धतीने मिळाले पाहिजे असा शिक्षणक्षेत्रातील एक क्रांतिकारक विचार घेऊन गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी शांतीनिकेतनच्या माध्यमातून प्रयोगशील शिक्षणाची सुरुवात केली. मुलांना बंदिस्त वातावरणातून मुक्त करून निसर्गाच्या सानिध्यात शिकू दिले तर त्यांच्या कल्पनाशक्तीचा व सर्जनशीलतेचा त्यांना पूर्ण क्षमतेने वापर करता येतो, हे टागोरांनी शांतीनिकेतनच्या माध्यमातून भारतीयांना दाखवून दिले.

आता १९४७ साल उजाडले होते. भारतात स्वातंत्र्याची रम्य पहाट उगवली होती. भारतीयांच्या उज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्याची ताकद आता भारतीयांना स्वातंत्र्याच्या माध्यमातून मिळाली होती. उज्वल भविष्यासाठी उत्तम शिक्षण हे किती गरजेचे आहे हे आता भारतीयांना चांगलेच उमगले होते. भारताची शिक्षणपद्धती कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार आता भारतीयांना मिळाला होता. ती कशी असली पाहिजे यासाठी गांधीजी, टागोर, टिळक, फुले, रानडे, कर्वे यांनी अनेक पर्याय समोर ठेवले होतेच.

या अधिकाराचा वापर करून भारतीय नेत्यांनी कोणती शिक्षणपद्धती स्वीकारली हे आपण पुढील भागात समजून घेऊ.

-चेतन एरंडे

[email protected]

ब्रिटीशकालीन भारतीय शिक्षणपद्धती कशी होती? वाचा चेतन एरंडे यांचा लेख. 
ब्रिटीशकालीन भारतीय शिक्षणपद्धती