मी कृष्णा...

दिंनाक: 20 Sep 2018 14:57:15


गंगा, गोदावरी आणि ब्रह्मपुत्रानंतर मी भारतातील चौथ्या क्रमांकाची मोठी नदी आहे. देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास ८% क्षेत्र हे माझ्या खोऱ्याने व्यापून टाकलेले आहे. महाराष्ट्रातील २६%, तेलंगनातील १५% आणि कर्नाटकमधील ४४% आणि आंध्र प्रदेशमधील १५% असे माझे खोरे विस्तारलेले आहे.

महाबळेश्वर येथे अनेक नद्यांचे उगमस्थान आहेत. कोयना, वेण्णा, सावित्री या नद्यांचे उगमझरे महाबळेश्वर येथील पश्चिम घाटातून आहेत. येथून उगम होऊन या नद्या वेगवेगळ्या दिशांना वाहतात. माझा उगमही पश्चिम घाटातून होतो. तेथून १४०० कि.मी.चा प्रवास करत मी आंध्र प्रदेश येथील कोडूरू येथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.

तुंगभद्रा आणि भीमा या दोन मोठ्या नद्या मला माझ्या प्रवासात येऊन मिळतात; तसेच मालप्रभा, वारणा, दुधगंगा, घट प्रभा, पंचगंगा या ही नद्या माझ्या या प्रवासात मला येऊन मिळतात. कराड येथे माझा व कोयनेचा संगम होतो. याला प्रीतीसंगम असे नाव दिले आहे. पंचगंगा ही नदी कुरुंदवाड येथे मला येऊन मिळते. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती अशा पाच नद्या एकत्र मिळून पंचगंगा नदी तयार होते.

महाराष्ट्रामध्ये माझे खोरे अत्यंत सुपीक काळ्या मातीचे आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, ऊस, भुईमुग अशी पिके घेतली जातात. कर्नाटक राज्यामध्येही ज्वारी, बाजरी, कापूस, गहू, कडधान्ये ही प्रमुख पिके माझ्या खोऱ्यात घेतली जातात. माझे खोरे हे नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असे खोरे आहे. माझ्या नदी किनाऱ्यालगत अनेक औषधी वनस्पती आढळून येतात. तसेच जांभूळ, बाभूळ, साग, खैर इ. झाडेही आढळतात. अनेक प्राणी व पक्षीही माझ्या खोऱ्यात भोवती दिसून येतात. बरं का!

तापी, नर्मदा यांनी आपली समस्या सांगितली तिचं समस्या माझीही आहे. अगदी बरोबर ओळखलंत! प्रदूषण.. मित्रानो.. मीही प्रदूषित आहे. दुषित पाणी पिऊन मानव स्वतः आजारांना निमंत्रण देतोय. हे जलप्रदूषण रोखण हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.

चला तर मग मी निघते. अजून बराच पल्ला मला गाठायचा आहे. 

 

-उत्कर्षा सुमित 

 [email protected] 

 

 मुठा नदीविषयी माहिती घेऊ खालील लेखात.

मुळा-मुठामधील मी मुठा..