मी खिडकीत बसून चहा पित होतो इतक्यात एक माशी उजव्या कानाशी गुणगुणली. मी कप टेबलावर ठेवून तिला हाकललं. तर ती डाव्या कानाशी झुणझूणली.

पुन्हा कप खाली ठेवून मी दोन्ही हातांनी कानांच्या चिपळ्या वाजवल्या. तर माशी जराशी लांब गेली. समोरच्या पुस्तकावर बसून माझ्याकडे पाहात म्हणाली, ‘‘काऽऽय? झाला का चहा पिऊन?’’

मी तिच्या झुणझुणण्याने वैतागलोच होतो. मी चिडून विचारलं, ‘‘का?’’

माशी डोळे मिचकावत म्हणाली, ‘‘म्हणजे.. काय माहित्यै का... आपण दोघे एकाचवेळी एकाच कपातून चहा पिऊ शकत नाही ना? कारण तुमच्यात म्हणतात म्हणे ‘माशीशी मस्ती म्हणजे रोगांशी दोस्ती’ हो ना?’’

मी भराभर चहा संपवत म्हणालो, ‘‘अगं बरोबरंच आहे ते.’’

माशी शांतपणे म्हणाली, ‘‘अरे, म्हणूनच विचारलं. म्हणजे तुझा जर चहा पिऊन झाला असेल तर, उरलेला थेंबभर चहा मी पिईन हो.’’

मी तोंड पुसत हसलो तेव्हा माशी कपातल्या चहात लोळून आली होती.

मग माशी घरभर भिरभिरली आणि समोर येऊन पाठमोरी बसली.

माझ्या मनात विचार आला, आता हिचं काही आपल्याकडे लक्ष नाहीए. हिला पटकन पकडून डबीत ठेवावं का? म्हणजे मग छान गप्पा मारता येतील. तिला पकडण्यासाठी मी किंचित हात हलवला आणि.. ती एका क्षणात भूर्रऽऽऽ.

मग माझ्या मनातलं कळल्याप्रमाणे माशी म्हणाली, ‘‘मुझे पकडना मुश्कील ही नही बल्की नामुमकीन है. फॅ फॅ’’

‘‘का बरं?’’

‘‘अरे तुला फक्त समोरचं दिसतं, पण मला सर्वत्र दिसतं. कारण मला तुझ्यापेक्षा जास्त डोळे आहेत. खूप खूप जास्त डोळे.’’

मी हसतच म्हणालो, ‘‘तुला माझ्यापेक्षा खूप खूप जास्त डोळे? काहीतरी फेकू नकोस.’’

माशी तोंड वाकडं करत म्हणाली, ‘‘एऽऽऽ काहीतरी बोलू नकोस. फेकणारे तुम्ही. तुम्ही जे फेकता ते एकतर आम्ही खातो किंवा तुम्हाला परत आणून देतो.’’

हे ऐकल्यावर तर माझी बोलतीच बंद झाली.

‘‘सांग बरं आम्हाला किती डोळे असतील? सांग ना?’’

‘‘अगं, तू आहेस टिचभर. तुला असून असून किती डोळे असणार? माझ्यापेक्षा जास्ती म्हणजे ३ किंवा ४ डोळे असतील फारफार तर.’’

फॅ फॅ हसत माशी म्हणाली, ‘‘फसला रे फसला. मला किमान २००० डोळे असतात!’’

मी आश्चर्याने ओरडणारच होतो इतक्यात माशी पुढे म्हणाली, ‘‘ओरडायचं काम नाही. नीट ऐक. मी दिसते टिचभर हे खरंच आहे. माझ्यासारख्या घरमाशीचा आकार तर १ सें.मी. असतो. पण आमचे डोळे संयुक्त प्रकारचे असतात. म्हणजे एक डोळा अनेक छोट्या छोट्या भागांमधे विभागलेला असतो. त्यामुळे मला एकाचवेळी अनेक ठिकाणचं दिसतं.’’

हे ऐकून तर मला धक्काच बसला.

‘‘अरे, हे तर काहीच नाही. माझं नाव तर जगातल्या ‘फ्लाइंग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नंबर १ म्हणून नोंदलं गेलं आहे.’’

मी भुवया उंचावल्या. मला काही नीटसं कळलेलं नाही हे तिला बरोबर कळलं.

‘‘मला सहा पाय आहेत त्यामुळे मी तुमच्या घरात, कधी तुमच्या जेवणाच्या ताटात तर कधी तुमच्या अंगावर चालते तर कधी घरभर उडते. इतर सहा पायवाले प्राणी जे करू शकत नाहीत ते पण मी करते. मी सहा पाय असूनही तुमच्या घरातल्या गुळगुळीत काचेवर किंवा चकचकीत आरशावर आरामात बसून माझा मस्त मेकप करते. क्यों की, आरशासमोर उभं राहून करतो गमजा, तो माणूस येडा समजा’ असं आमच्यात म्हणतात ते काही उगीच नाही हो आणि मुख्य म्हणजे मी, वर्ल्ड कीटक ऑलिंपियाडला’ नॉमिनेट पण झाली आहे. कारण माझा उडण्याचा वेग ताशी ८ कि.मी. आहे.’’

मी टाळ्या वाजवत म्हणालो, ‘‘व्वा! खरंच तुझं कौतुक केलं पाहिजे. तुझ्याकडून हे शिकलं पाहिजे.’’

माशी फणकारत म्हणाली, ‘‘आता उडण्याचाच विषय निघाला म्हणून सांगते. मला पंखांची एक जोडी असते. हे पंख अर्धपारदर्शक, पातळ आणि चिवट असतात. या पंखांच्या मागे पंखांसारखीच आणखी एक जोडी असते. पण ते पंख नव्हेत. त्यांना ‘संतोलक’ म्हणतात. हे संतोलक सुकाणूसारखं काम करतात. म्हणजे उडत असताना दिशा बदलण्यासाठी यांचा मला खूप उपयोग होतो.

आमचं उडण्याचं हे डिझाईन काही परदेशी विमान कंपन्यांनी चोरलं आहे असा असा आमचा फक्त चिकट संशय नाही तर चिकट घट्ट दावा आहे. आम्हाला काही वेळा विमानाने प्रवास करावा लागतो, तेव्हा आम्ही हे आमच्या हजारो डोळ्यांनी पाहिलं आहे. पण आमच्या मनाचा मोठेपणा म्हणून आम्ही आत्तापर्यंत हे कुणाला बोललो ही नाही.’’

मी विषय बदलत म्हणालो, ‘‘इतर कुणी आरशावर बसू शकत नाहीत पण मग तू कशी काय बसू शकतेस? त्यासाठी तू काही खास व्यायाम वगैरे करतेस का?’’

फिशीफिशी हसत माशी म्हणाली, ‘‘माझ्या पायाच्या टोकाला आकड्यांसारखी एक जोडी असते. या आकड्यांच्या जोडीत चिकट स्त्राव सोडणार्‍या ग्रंथी असतात. या जादूई चिकट स्त्रावामुळे गुळगुळीत पृष्ठभागावरून चालताना मी घसरत नाही.’’

‘‘हं. आलं लक्षात. म्हणजे जेव्हा तू भूक लागली की जेवायला आनंदाने घाणीवर बसतेस तेव्हा त्या चिकट स्त्रावावर घाण व जंतूही चिकटतात. मग तू उडून खाद्यपदार्थावर बसलीस की तुझ्या पायाला चिकटलेले हे जंतू त्या खाद्यपदार्थात मिसळतात. ‘हवं तिथे जाय, हवं तिथे खाय पण तिथे नको माशीचा पाय’ असं आमच्यात म्हणतात ते काही उगीच नाही.’’

एकाचवेळी स्वत:चे १५९८ डोळे मिचकावत माशी फुर्रकन उडूनच गेली.

-राजीव तांबे

[email protected]


गप्पागप्पी झुरळाशी