दोस्त

दिंनाक: 18 Sep 2018 15:06:17


कियामा, कावाबे आणि यामाशिता या शाळकरी मित्रांच्या मैत्रीची कहाणी म्हणजेच दोस्त ही कादंबरी. या कथेत इतरही अनेक पात्र आहेत, पण हे तिघे मुख्य आणि यांच्या एवढेच महत्त्वाचे आणखी एक पात्र म्हणजे एक म्हातारे आजोबा.       

कथेची सुरुवात ही एका कुतूहलाने होते. ते कुतूहल असे की, यामाशिताची आजी मरते आणि त्या वेळी झालेले आजीचे अंत्यविधी यामशिताने प्रथमच पाहिलेले असतात; पण हे कावाबे आणि कियामा यांनी मात्र कधीच पाहिलेले नसतात. त्यात यामाशिताने या दोघांपुढे केलेले वर्णन ऐकून यांची ते सगळं प्रत्यक्षात बघण्याची उत्सुकता वाढते. पण आता अंत्यविधी बघणार तरी कसे? तेवढ्यात कावाबेला आठवते की, कॅलिग्राफी स्कूलच्या पुढे काही घरे सोडून एक म्हातारा राहत असून तो कधीही मरू शकतो, असे त्याची आई शेजारच्या काकूंना सांगताना त्याने ऐकलेले असते. हेच तो यामाशिता आणि कियामाला सांगतो आणि मग काय? सुरू होतो त्यांचा प्रवास, त्या एकट्या म्हाताऱ्या आजोबांवर रोज पाळत ठेवण्याचा! पण हे लवकरच आजोबांच्या लक्षात येत आणि ते देखील मुलांवर लक्ष ठेवायला सुरुवात करतात.

हे म्हातारे आजोबा आणि ही मुले, यांच्यात दोन पिढ्यांचे अंतर असते, पण हे अंतर ही मुले, संवादाच्या माध्यमातून कमी करू पाहत असतात. या म्हाताऱ्या आजोबांच्या वागण्यावरून त्यांचा भूतकाळ नक्कीच काहीतरी वेगळा, रोमांचित करणारा वगैरे असणार, अशी मुलांची खात्री झालेली असते आणि म्हणून ते सतत त्या आजोबांना त्यांच्या आयुष्याबद्दल विचारत असतात, पण आजोबा नेहमी अर्धवट उत्तरे देऊन विषय सोडून देतात.

एकटे राहणारे आजोबा मुलांशी सहज बोलतानाही कोड्यात बोलतात. ज्याचा संबंध बऱ्याचदा त्यांच्या भूतकाळाशी असायचा आणि तो भूतकाळ या मुलांना माहीत नसल्याने ते आपापल्या परीने तर्कवितर्क लावून अर्थ काढत असतात. याठिकाणी या मुलांच्या विचार कौशल्याचे खरंच कौतुक करण्याजोगे आहे. 

मेलेल्या माणसाला बघण्यासाठी किंवा त्या मृत शरीराचा अंत्यविधी बघण्यासाठी उत्सुक असलेली ही १२-१३ वर्षाची मुले सुरुवातीला या विषयाच्या बाबतीत एवढी उत्साही असतात. पण, जेव्हा यामाशिता स्विमिंग पूलमध्ये पडतो आणि त्याची पूर्ण हालचाल थांबते, तेव्हा मात्र त्याच्याशिवाय जगण्याच्या विचाराने ही मुले पुरती हादरून जातात. हा साधा विचार सुद्धा असह्य होऊन "यामाशिता - ए जाड्या चल उठ आता!" असं ओरडतो. तेव्हा त्यांच्या मैत्रीचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही.

या वयातली मुले कधी काय करतील ते सांगता येत नाही. म्हाताऱ्या आजोबाच्या सांगण्यातून जेव्हा त्यांच्या हे लक्षात येत की, आजोबांची बायको कदाचित जिवंत असू शकते, तेव्हा ते तिचा शोध घ्यायला सुरुवात करतात. यायोई आजीचा शोध घेण्यासाठी या मुलांनी केलेल्या करामती पण भारीच असतात. मग ते डिरेक्टरीमधून नंबर शोधून वेगवेगळ्या लोकांना फोन करणे असूदेत किंवा नर्सिंग होममध्ये खोटी ओळख सांगून त्या आजीला भेटणे असुदेत. 

खरं तर या गोष्टीत मुलांना त्या म्हाताऱ्या आजोबांना मरताना बघायचे असते, म्हणून मुले त्यांच्यावर पाळत ठेवायला सुरुवात करतात. पण नकळत ते एकमेकांचे मित्र होतात. ही मुले आजोबासोबत त्यांच्या घरात राहू लागतात. आजोबा सांगतील ते काम करतात. त्यांचे पाय चेपून देतात, तर आजोबा पण मुलांना खाऊ-पिऊ घालत असतात. यातूनच त्यांच्यात आजोबा – नातू असं आपुलकीच, प्रेमाचं नातं तयार होतं. पण शेवटी मात्र आजोबा त्या मुलांना कायमचे सोडून जातात. कसे ते पुस्तक वाचून जाणून घ्या. 

दोस्त हे मूळ पुस्तक जपानी भाषेत असले आणि आपण अनुवादित मराठी पुस्तक वाचत असलो, तरीही वाचताना आपण नकळत एक जपानी लोकांचे विश्व उभारण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक घटना त्या उभ्या केलेल्या आपल्याच दृश्यातून अनुभवतो. हा अनुभव लहनांसोबतच मोठ्यांनीही नक्कीच घ्यावा.

 

- ज्योती बागल

[email protected] 

जपानी पुस्तक - नात्सु नो निवा, लेखिका - युमोतो काझुमी

मराठी अनुवाद - दोस्त

लेखिका - चेतना सरदेशमुख - गोसावी, मीना आशिझावा

किमंत - १५०, पृष्ठ संख्या - ११३