मुलांनो, तुम्ही कृष्णदेवराय आणि तेनालीरामच्या गोष्टी ऐकल्या आहेत ना? तशाच अनेक राजा आणि कवींच्या गोष्टी ऐकायला आवडतील ना? राजा, कवी आणि कथा या कथामालेत आपण भारतातील प्रसिद्ध राजे, त्यांचे कवी व त्या कवीने लिहिलेली महान कथा यांची गोष्ट वाचणार आहोत. आजची कथा आहे  - अर्जुन, कृष्ण आणि गीतेची.

कौरव-पांडव युद्ध अटळ झाले, तेव्हा कौरवांचे वडील, धृतराष्ट्र अतिशय दीन झाले. या युद्धात आपली मुले मारली जातील, याची त्यांना कल्पना आलीच असणार. त्या वेळी व्यास ऋषींनी त्याचे सांत्वन करून शब्द दिला - या युद्धाचा इतिहास लिहून तुझ्या मुलांना मी अमर करेन. सहजच संपूर्ण महाभारताचा केंद्रबिंदू हे युद्ध आहे.

कौरव-पांडव युद्ध जेव्हा सुरू झाले, तेव्हा युद्धातील तपशील मिळवण्यासाठी व्यासांनी संजयला पत्रकार म्हणून नेमले. चिलखत घालून, अंगरक्षकांसवेत संजय युद्धभूमीवर हजर होता. कदाचित आणखीनही वार्ताहारांचा ताफा त्याच्याबरोबर होता. युद्धाचा संपूर्ण तपशील - कोणी किती बाण सोडले, कोणी कसला व्यूह रचला, कुणाला मारले, कुणाला पाडले, कुणाचे रथ उलटवले, कोण काय म्हणाले - हे सर्व नोंदवायचे काम संजयवर सोपवले होते. त्याने सर्व काही टिपून धृतराष्ट्र व व्यासांना सांगितले. युद्ध संपल्यानंतर, व्यासांनी ३ वर्षांत महाभारत लिहून काढले. हा इतिहास १८ भागात मांडला आहे. प्रत्येक भागाला ‘पर्व’ म्हटले आहे. महाभारतातील भीष्म पर्वात, २५ ते ४२ अध्याय हे गीतेचे १८ अध्याय आहेत. 

काय झालं, युद्धासाठी कौरव आणि पांडव एकमेकांसमोर उभे राहिले. पांडवांपैकी अर्जुन हा राजपुत्र. त्याच्या रथाचा सारथी होता यादव राजकुमार कृष्ण. दोघे अगदी जीवाभावाचे मित्र. जीवाला जीव देणारे सखे. तर, अर्जुन कृष्णाला काय म्हणाला, ‘माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर, म्हणजे बघतो मी कोण-कोण आमच्याशी युद्धाला आले आहेत ते.’ कृष्णाने रथ मधोमध उभा केला. त्या वेळी अर्जुनाला पुन्हा एकदा लक्षात आले की, आपल्यासमोर तर आपले चुलत भाऊ कौरव उभे आहेत. त्याशिवाय आपले गुरुजन, आजोबा, काका, पुतणे, भाचे, सासरे, जावई, लहानपणीचे मित्रसुद्धा आहेत. या सर्वांशी युद्ध करून आपण यांना मारणार! कशासाठी? तर राज्यासाठी! नको ते राज्य मला! मी त्यापेक्षा भिक्षा मागून जगेन. असे म्हणून अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य खाली ठेवले.

आता, अर्जुनाला असा प्रश्न नाही पडला की, मी हरलो तर काय? मी मेलो तर काय? मला भीती वाटते! उलट त्याला विश्वास आहे की तो जिंकणार आहे आणि कौरवांना मारणार आहे. या युद्धानंतर त्याला राज्य मिळणार आहे. अनेक वर्ष वनवासात राहिलेला माणूस हातातोंडाशी आलेल्या राज्याचा त्याग करायला तयार आहे! भूक लागलेली असताना समोर आलेल्या अन्नाचा त्याग करायला तयार आहे. असा त्याग जो करू शकतो, त्याच्यासाठी गीतेचा उपदेश आहे.  

अर्जुनाचे बोलणे ऐकून, कृष्ण म्हणाला, ‘अर्जुना! क्षत्रिय म्हणून युद्ध करणे हे तुझं कर्तव्य आहे. ते तू केलेच पाहिजे. आज जर तू युद्धातून पळून गेलास, तर पुढच्या पिढ्या तुझा आदर्श ठेवून युद्धातून पळून जातील. म्हणून तू युद्ध सोडून जाणे उचित नाही. तुझ्यासारख्या वीराचे पोवाडे गंधर्व गातात, पण या एका कृतीमुळे लोक तुला नावे ठेवतील. पळपुटा म्हणतील. युद्धाला घाबरला म्हणतील. तुला असे चालेल काय? तू जर युद्ध करून जिंकलास तर राज्य मिळेल आणि मृत्यू पावलास तर कीर्ती मिळेल. चांगले नाव मिळवण्यासाठी लोक आयुष्य वेचतात. तू कशासाठी आपले नाव वाईट करून घेण्याचे कर्म करतोस?

तू कर्माचा त्याग न करता, कर्मापासून मिळणार्‍या फळाचा त्याग कर! विजयासाठी युद्ध न करता, कर्तव्यासाठी युद्ध कर. तुझे धनुष्य हाती घे, उठ आणि युद्धासाठी सज्ज हो!

‘अर्जुना! जे उमलते ते कोमेजणार, जे उगवते ते मावळणार आणि जे जन्मते ते मृत्यू पावणार हा संसाराचा नियम आहे. रणांगणात मृत्यूचा शोक करणे वीराला शोभत नाही. कारण, मृत्यू होतो तो शरीराचा. आत्मा अमर असतो. जीर्ण झालेला देहाचा त्याग करून आत्मा पुन्हा पुन्हा नवीन देह धारण करतो. तुझे आणि माझे असे अनेक जन्म झाले आहेत. तुला ते आठवत नाहीत इतकेच. मी वारंवार जन्म घेऊन हेच ज्ञान पूर्वीदेखील शिकवले आहे.’

अशा प्रकारे कृष्णाने अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली. अर्जुनाच्या शंकांचे, प्रश्नांचे निरसन केले. कृष्णाच्या उपदेशाने, अर्जुनाचे मन स्वच्छ धुतले गेले आणि तो युद्धासाठी सज्ज झाला. कृष्णार्जुनाचा हा संवाद संजयने ऐकला आणि व्यासांनी ग्रंथित करून ठेवला. या छोट्याशा ग्रंथातून उपनिषदांचे सार मिळते, आपल्याला सुद्धा रोजच्या जीवनात गीतेतील उपदेशाचा उपयोग होतो. त्यामुळे गीता हा भारतीयांचा अतिशय आवडीचा ग्रंथ आहे. आणि अनेकांच्या नित्य वाचनात आहे.

-दिपाली पाटवदकर

[email protected]

 

राजा, कवी आणि काव्य या मालिकेतील पहिली कथा  
जनक, याज्ञवाल्क्य आणि बृहदारण्यक उपनिषद