मित्रांनो, मी तुम्हाला गेल्या वेळी म्हणाले होते की, मी तुम्हाला दिल्लीतल्या काही महत्त्वाच्या इमारतींबद्दल सांगेन म्हणून. दिल्ली ही देशाची राजधानी असल्यामुळे फक्त इथेच आहेत आणि देशात इतरत्र कुठे नाहीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत. 

दिल्लीबद्दल एक गमतीची गोष्ट अशी की, दिल्ली हे जसं शहर आहे तसंच ते एक राज्य पण आहे. दिल्ली शहराला महानगरपालिका आहे. दिल्ली राज्याचे विधिमंडळसुद्धा आहे. दिल्लीमध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इथे एक नॅशनल कॅपिटल रिजन आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की हे काय आता नवीन? नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये दिल्लीबरोबर आसपासच्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश होतो. ही शहरं हरियाणा, उत्तर प्रदेश अशा वेगेवेगळ्या राज्यांमधली आहेत. नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये असणारी महत्त्वाची शहरं म्हणजे दिल्ली, गुरगाव, गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा आणि मेरठ. हा नॅशनल कॅपिटल रिजन अशासाठी की या शहरांचा एकत्रित आणि पद्धतशीरपणे विकास व्हावा. 

दिल्ली ही राजधानी असल्यामुळे इथे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती, राज्यसभेचे उपसभापती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांची अधिकृत निवासस्थानं आहेत. या सगळ्या महत्त्वाच्या मंडळींची कार्यालयं सुद्धा दिल्लीतच आहेत. वेगवेगळ्या मंत्रालयाची कार्यालयेही इथे आहेत. इथल्या बिल्डिंगची नावही बोलकी आहेत. उदाहरणार्थ, उद्योग मंत्रालयाची कार्यालयं असणाऱ्या बिल्डिंगचं नाव उद्योग भवन. शेती किंवा कृषी मंत्रालयाच्या बिल्डिंगचं नाव कृषी भवन. बिल्डिंग, घरं यांची देखरेख करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या बिल्डिंगचं नाव निर्माण भवन. आहेत की नाही नावं इंटरेस्टिंग. दिल्लीतल्या काही  इमारती आहेत ज्यांची नावं तुम्ही अनेक वेळा बातम्यांमध्ये ऐकत असाल. एक आहे राष्ट्रपती भवन, दुसरं आहे नॉर्थ ब्लॉक, तिसरं आहे साऊथ ब्लॉक. एखादी महत्त्वाची घटना घडली किंवा सरकारने काही  महत्त्वाची  घोषणा केली की त्याबद्दल मंत्री बोलताना अनेक वेळा मागे तुम्ही नॉर्थ ब्लॉक ही पाटी पाहिली असेल. नॉर्थ ब्लॉक या बिल्डिंगमध्ये  अर्थ मंत्रालयाची बरीचशी ऑफिस आहेत. गृह मंत्रालयाची पण आहेत. या नॉर्थ ब्लॉकच्या समोर आहे साऊथ ब्लॉक. इथे पंतप्रधानांचे कार्यालय आहे. परराष्ट्र मंत्रालयाची कार्यालये आहेत. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक या समोरासमोर आहेत. यांच्या मध्यभागी आहे राष्ट्रपती भवन. या तीनही बिल्डिंग एका टेकडीवर वसलेल्या आहेत. त्या टेकडीच नाव आहे रायसीना हिल्स. राष्ट्रपती भवन ही एकच बिल्डिंग नाहीये. हा ३०० एकरापेक्षा जास्त मोठा परिसर आहे. राष्ट्रपतींच निवासस्थान जे आहे तिथे ४ मजले आणि ३४० खोल्या आहेत. या सगळ्या ३४० खोल्या कोणी राहण्यासाठी वापरत नाही. इथल्या काही खोल्या या गेस्ट हाऊस म्हणून वापरल्या जातात. इतर देशांचे राष्ट्रपती जेव्हा भारतात येतात तेव्हा ते इथे राहातात. राष्ट्रपती भवन परिसरात  मुघल गार्डन ही बाग आहे. दर वर्षी हिवाळ्यात काही दिवस  ही बाग सगळ्यांना बघण्यासाठी खुली असते. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहण्याची घरं आहेत. राष्ट्रपतींच्या ताफ्यात असणाऱ्या घोड्यांचे तबेले सुद्धा आहेत इथे. असं म्हणतात की जगभरात राष्ट्रप्रमुखांची जी निवासस्थानं आहेत त्यातल्या मोठ्या निवासस्थानांपैकी एक म्हणजे भारताचं राष्ट्रपती भवन. या राष्ट्रपती भवनामध्ये एक वस्तू संग्रहालय किंवा म्युझियम सुद्धा आहे. हे म्युझियम म्हणजे राष्ट्रपती भवनाची एक झलकच आहे. इथे पूर्वी राहून गेलेल्या सर्व राष्ट्रपतींची माहिती सुद्धा वाचता येते. राष्ट्रपती भवनाच्या मुख्य बिल्डिंगमधले २ हॉल प्रसिद्ध आहेत. एक आहे दरबार हॉल आणि एक आहे अशोक हॉल. हे हॉल सुद्धा आपल्याला अधूनमधून टीव्हीवर दिसतात. राष्ट्रपतींच्या हस्ते जे पुरस्कार प्रदान केले जातात ते सगळे समारंभ दरबार हॉलमध्ये होतात. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशी पुरस्कारांची नावं कधीतरी तुम्ही ऐकली असतील. हे पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ दरबार हॉलमध्ये होतो. दरबार हॉलची आणखी एक खास गोष्ट आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ याच हॉलमध्ये घेतली होती. भारताच्या इतिहासातल्या एका  महत्त्वाच्या गोष्टीचा हा दरबार हॉल साक्षीदार आहे. गमतीचा भाग असा की, या राष्ट्रपती भावनांची रचना करणारे आर्किटेकट हे ब्रिटिश होते आणि आता आपण ज्याला राष्ट्रपती भवन म्हणतो तो परिसर मुळात व्हॉइसरॉयचे घर म्हणून तयार केला गेला होता. अशोक हॉलही दरबार हॉलसारखा देखणा आहे. इतर राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख किंवा पाहुणे मंडळी येतात तेव्हा त्यांची ओळख एकमेकांना या अशोक हॉलमध्ये करून दिली जाते. राष्ट्रपती भावनांबद्दल तुम्हाला अगदी सविस्तर माहिती हवी असेल, तिथले फोटो पाहायचे असतील तर राष्ट्रपती भवनाची वेबसाईट जरूर पहा. वेबसाईट आहे - rashtrapatisachivalay.gov.in

-सुप्रिया देवस्थळी

     [email protected]  

 दिल्लीतील चांदणी चौक याविषयी माहिती घेऊ खालील लिंकवर 
शोधू नवे रस्ते - भाग ५