निशिगंध हे कंदवर्गीय झाड. रात्रीच्या वेळी या फुलांचा सुगंध दरवळतो म्हणून हे नाव त्यांना पडले आहे. याच्या सात पाकळ्या असतात. याची पाने गडद हिरवी, लांब, अरुंद गवतासारखी असतात. पण गवताच्या पानांसारखी धार मात्र नसते. तर ती मऊ असतात. फुलांचा दांडा खोडासारखा पानांच्या समूहातून निघतो. त्यावर २५-३० फुले असतात. फुलांच्या गुलबट कळ्या नळीसारख्या असतात.

फुलांचे प्रकार दोन - १) एकेरी २) दुहेरी आणि तिसरा व्हेरीगटा – याची पाने पिवळी, हिरवी असतात. एकेरी फुलेच जास्त सुगंधी असतात. याची फुले पांढरी असून खूप काळ सुगंधी असतात. याची उंची एक ते दीड मीटर असते. हे झाड साधारण तीन वर्षे टिकते. निशिगंध हा ‘बब्लस’ कुटुंबातला.

polianthes tuberosa असे याचे शास्त्रीय नाव आहे. ही वनस्पती परकी जरी असली तरी जगात सर्वत्र आढळते. कापलेल्या लांब दांड्याची फुले दीर्घकाळ टिकतात. एकबीजपत्री प्रकारात याचा कंद लागवड करताना खोलवर जमिनीत पुरतात. मार्च ते मे हे दोन महिने लागवडीला योग्य. या प्रकारात फांद्या नसतात. दांड्यांच्या खालच्या भागातील फुले प्रथम फुलतात. त्यानंतर त्याच्या वरची फुले आणि सर्वात शेवटी टोकाकडची फुले उमलतात. नळीसारख्या आकारातून पांढऱ्या रंगाच्या सहा पाकळ्या वर येतात. या विशिष्ट रचनेमुळेच या फुलांना ट्युबरोझ म्हटले जाते. उत्तम सुगंधीमुळे या फुलांना खूप मागणी असते. त्यांचा उपयोग देवपूजा, हार, वेण्या, गजरे, पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी केला जातो. निशिगंधाची फुले बाकदार, पण ताठर.

पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मणिपूर, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम या ठिकाणी चांगले (उत्पन्न) पीक देणारे म्हणून याची लागवड केली जाते. महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहमदनगर,ठाणे, सांगली हे जिल्हे हिच्या लागवडीत अग्रेसर आहेत.

निशिगंधाला कोरडे, थंड हवामान मानवते, पण कडक थंडी (१० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान) व कडक उन्हाळा मानवत नाही. पाण्याचा निचरा होणारी चांगली जमीन निशिगंधाला उपयुक्त ठरते. नाहीतर फुले लहान येणे, फुलांचा हंगाम लवकर संपणे किंवा रोगांचा प्रादुर्भाव होणे अशा अडचणी येतात म्हणून फुलांची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही घसरते. कंद त्याच्या आकाराएवढ्याच भागात जमिनीत खोल लावावा. ही वर्षातून तीनदा फुलते.

फुलांची लागवड उन्हाळ्याच्या अखेरीस करतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कंदापासून झाडाची वाढ होण्यास सुरुवात झाली पाहिजे. नाहीतर पावसामुळे कंद कुजण्याचा धोका असतो. त्याची मार्च-मेमध्ये लागवड केल्यास ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये फुले उपलब्ध होतात. म्हणजे लागवडीनंतर साडे-तीन चार महिन्यांनी फुले तोडण्यास तयार होतात. फुले पूर्ण उमलल्यानंतर दांड्यासह कापून काढावी. त्या वेळी काही काळ पाणी बंद करावे. फुले सतत काढत राहिल्याने आणखी फुले लागत राहतात. याशिवाय एकाच झाडापासून दीर्घकाळ फुले मिळतात. जमिनीतील कंदाची जागा लगेचच बदलण्याची गरज नसते. जास्तीचे कंद अन्यत्र लावण्यासाठी वेगळे करून घ्यावेत. कापलेल्या फुलांचे दांडे लगेच पाण्यात बुडवून सावलीत ठेवावेत. या फुलांच्या कळ्या दांडीवर जोडीने असतात. दांडी न मोडता पूर्ण वाढलेली जोडगोळी तोडावी. तोडलेली फुले सावलीत पाणी शिंपडून ठेवावीत अन्यथा ती खराब होतात. सर्व फुले काढल्यावरच दांडे कापावेत. मोठ्या कंदानाच फुले लवकर लागतात. डिसेंबर - जानेवारीत थंडीच्या दिवसात या फुलांचा विश्रांतीचा काळ असतो. पुन्हा मार्चपासून फुले लागतात. एका कंदापासून सहज दोन वर्षे त्याच जागी चांगली भरघोस फुले मिळतात. तिसऱ्या वर्षात झाडावर रोग पडू लागतात. तेव्हा पहिला कंद काढून टाकून त्याजागी दुसऱ्या फुलाचे झाड / कलम लावावे. शेतातल्या पिकासारखीच झाडांची फेरपालट करायला हवी. त्यामुळे झाडातील नत्र, स्फुरद, पलाश कमी न पडता दुसरे पिक वा फुले घेतल्याने दोष जाऊन उत्पादन चांगले येते.

बंगलोरच्या कृषी संशोधन केंद्रात नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. एकेरी पाकळ्यांची फुलांची जात शृंगर नावाची तर दुहेरी पाकळ्यांची हिची फुले सुवासिनी नावाने परिचित आहे. लखनौच्या राष्ट्रीय वनस्पती संशोधन केंद्रात सोनेरी रंगाच्या दुहेरी पाकळ्यांचे हिचे एक वाण तयार केले आहे.

याच्या तेलाचा उपयोग आरोमा उपचारासाठी केला जातो. या तेलाने सुगंधी द्रव्य तयार करतात. फुलांची गुणवत्ता, गंधामुळे निशिगंधाला व्यापारी पिकाचे महत्त्व आहे. 

-मीनल पटवर्धन 

[email protected]

 

अबोली या फुलाविषयी माहिती घेऊ खालील लेखात. 

अबोली