बाप्पाचे आसन

दिंनाक: 12 Sep 2018 14:54:28


गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण अतिशय उत्सुकतेने वाट पाहत असतो. त्यांच्यासाठी विविध आकर्षक प्रकारे सजावट करत असतो. पण अनेकदा आपण त्याकरिता प्लास्टिक/थर्माकॉल इ. पर्यावरणाला हानिकारक असलेल्या गोष्टींचा वापर करतो. पण घरच्या घरी उपलब्ध व पर्यावरणाला पूरक असलेल्या वस्तूंपासून आकर्षक सजावट आपण करू शकतो...

साहित्य : रंगीत कागद (२ रंगांचे), जरीचे कापड (२ प्रकार), कात्री, फॅब्रिक ग्लू (कापड चिकटवण्यासाठी), सेलोटेप, वापरलेला पुठ्ठ्याचा डबा, जाड पुठ्ठा (३-५ mm), कापूस

कृती :

१ आसन बनवण्यासाठी वापरलेल्या डब्याला वरील बाजूस ३-५ mm जाडीचा पुठ्ठा चिकटवा. यामुळे मूर्ती ठेवल्यावर डबा वाकणार नाही. वरील बाजूस जरीचे कापड अथवा रंगीत कागद लावा. नंतर डब्याच्या चारही बाजूने रंगीत कागद लावा.

२ लोड बनविण्यासाठी, छोट्या कापडामध्ये थोडा कापूस घालून त्याची गुंडाळी करून फॅब्रिक ग्लू व सेलोटेप लावून चिकटवा.

३ एका रंगीत कागदाचे आयत कापून, थोड्या थोड्या अंतरावर उलट-सुलट बाजूने दुमडून एकत्र करा व दोन्ही बाजूने गोलसर कापा. एका बाजूच्या टोकाला सेलोटेप चिकटवून त्याचा पंखा करा व तयार केलेल्या आसनाच्या मागे चिकटवा. पंखा सुंदर फुलण्यासाठी डब्याच्या मापाएवढी १ बाजू व त्याच्या साधारण तीनपट दुसरी बाजू या मापाचे रंगीत कागदाचे आयत कापा. अशा प्रकारे विविध रंगाचे कागद व कापड वापरून आकर्षक, पर्यावरणपूरक सजावट तुमच्या बाप्पासाठी करता येईल.

-संपदा कुलकर्णी 

[email protected]