‘‘माझ्या बंधुनो आणि माझ्या भगिनीनो...’’
11 सप्टेंबर 1893 हा सर्वच धर्मातील लोकांसाठी सानेरी दिवस होता. याच दिवशी स्वामीजींनी विश्‍वबंधुत्वाचा संदेश जगासमोर मांडला. जगाला हिंदू धर्माची ओळख नव्याने करून दिली. सध्याचे वर्ष हे भाषणाचे एकशे पंचवीसावे वर्ष आहे. सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.
शिकागो सर्व धर्मपरिषदेची सत्रे 11 ते 27 सप्टेंबर 1893च्या दरम्यान चालणार होती. कोलंबसाच्या अमेरिका शोधाला 400वर्षे झाली होती. त्यानिमित्ताने शिकागो नगरामध्ये  सर्वधर्मपरिषदेत मानवी वैचारिक प्रगतीचा आढावा घेतला जाणार होता. जगातील मोठमोठ्या व्यक्तींची उपस्थिती असणारी ती एक मोठी घटना होती. ही व्याख्याने ऐकण्यासाठी 4 ते 5 हजार श्रोते येत असत. जगातील अनेक तत्त्वज्ञांनी यात भाग घेतला होता.
11 सप्टेंबरचा दिवस उजाडला. सकाळचे 10 वाजता घंटानाद झाला अन परिषदेला सुरुवात झाली. इहलोकीचा परमेश्‍वर विवेकानंद समोर आले अन त्यांच्या मुखातून जणू अमृतवाणीच बाहेर आली. ‘‘अमेरिकेतील माझ्या बंधूनो आणि भगिनीनो’’ या शब्दासरशी जणू एक विजेची लहर सभागृहात फिरली. श्रोतावृंद उठून उभा राहू लागला आणि टाळ्यांचा एकच कडकडाट सुरू झाली. जवळजवळ 2 मिनिटे स्वामीजींना पुढचे एक अक्षरही बोलता आले नाही. हिंदू ग्रंथातील दोन श्‍लोक त्यांनी म्हटले -
‘‘रूचीनां वैचित्र्यात ऋजुकुटिलनानापथजुषाम।
नृणाव एको गम्य : त्वमसि पयसाम अर्णव श्‍व।’’
‘‘ज्याप्रमाणे भिन्न उगमांतून निघणारे विभिन्न जलप्रवाह शेवटी समुद्राला येवून मिळतात व एक होऊन जातात, त्याचप्रमाणे रूचिवैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गांनी जाणारे सर्व वाटसरू प्रभो, अंती तुलाच येऊन मिळतात.’’
‘‘ ये यथा मां प्रपदयन्ते तान तथैव भजाम्यहम।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश:।’’
‘‘कुणी कोणत्याही भावाचा आश्रय घेऊन मजप्रत येईना का, मी त्याच भावाने त्यावर अनुग्रह करीत असतो. अर्जुना, लोक चोखाळीत असलेले सगळे मार्ग अखेरीस मलाच येऊन मिळतात.’’
स्वामीजींनाी अगदीच छोटे भाषण केले. त्यांचे सविस्तर भाषण नंतर होणारच होते. पण या भाषणाने परिषदेचा सारा नूरच पालटला. विश्‍वबंधुत्वाच्या संकल्पनेनेच सारा श्रोतृवृंद भारावून गेला. ऐकणार्‍याच्या ह्रदयात या योद्यासंन्यासीने विश्‍वबंधुत्वाची ज्योत प्रज्वलित केली होती.
परंतु आजची सद्यस्थिती पाहता, आपण आपल्या संस्कृतीपासून खूप दूर गेलोय की, काय अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. जगाला विश्‍वबंधुत्वाचा, एकतेचा संदेश देणारे आपण किमान शाळेत तरी बंधुत्वाच्या नात्याने आपल्या मित्रांशी वागतो का? आपल्या अमृतमयवाणीने जगाला एक करणार्‍या स्वामीजींकडे पाहून आपण कोणाचेही मन न दुखावण्याचा प्रयत्न करतो का? भारतमातेचे नाव हिमालयाच्या शिखरावर नेवून ठेवणार्‍या स्वामीजींची आपण सगळी मुले आपल्या कुटुंबाचे, शाळेचे नाव आपल्या कर्तृत्वाने मोठे करण्याचा प्रयत्न करतो का? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे नक्कीच हो असतील.
एक विद्यार्थ म्हणून स्वामीजींकडे पाहताना आपल्या सर्वांनाच खूप वाचन व अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. तुम्ही सर्व विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक आहात, तेव्हा तुम्हाला भारतमातेला जगात अढळपद मिळवून द्यायचे असेल तर सुरुवात आजपासून करूया. स्वामीजींचा एकतेचा, बंधुत्वाचा संदेश आपण अंगीकारूयात. कुटुंब व शाळेचे नाव आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मोठे करूयात. आज नव्याने, नव्या जोषाने, उमेदीने आपल्या प्रत्येकाला आपल्या सहवासात येणार्‍या प्रत्येकाशी माणुसकीच्या नात्याने वागण्याची गरज आहे. स्वामीजींनी दिलेली विश्‍वबंधुत्वाची शिकवण आत्मसात करताना आपल्यात असणारी एकतेची वीण आणखी थोडी घट्ट करूयात.
 
- अनिता कुंभार(पालक)
 डे. ए. सो. रमणबाग प्रशाला, पुणे.