‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ हा गजर ऐकला की, आपल्या डोळ्यांसमोर बाप्पाची सुंदर मूर्ती उभी राहाते. ही मूर्ती साकारण्याची संधी शिक्षणविवेक आयोजित ‘पर्यावरणपूरक सजावटीत पर्यावरणपूरक बाप्पा’ या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मिळाली. शिक्षणविवेकने वेगवेगळ्या शाळांमध्ये या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. सुरेश वरगंटीवार आणि स्वाती देवळे यांनी जवळजवळ 291 विद्यार्थ्यांना गणपती मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण दिले. शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर, उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे, उपक्रम साहाय्यक सायली शिगवण आणि आदिती दाते यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सहकार्य केले.
सोमवार दि. ३ सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत इ. ५वी ते ७ वीच्या ८५ विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरणपूरक सजावटीत पर्यावरणपूरक बाप्पा’ या कार्यशाळेत सहभाग घेतला. गणपतीची मूर्ती बनवण्याची कृती सर्वजण पहिल्यांदाच अनुभवत होते. शाडूच्या मातीने बनवला जाणारा बाप्पा पाहाताना मुलांच्या चेहेर्‍यावर उत्सुकता दिसत होती.
‘आपणही बाप्पा तयार करणार’ ही संकल्पनाच मुलांना आनंद देणारी होती. शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली ठकार, कलाशिक्षक अपूर्वा अग्रे, शिक्षक प्रतिनिधी कीर्ती घुमे यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.
मंगळवार दि. ४ सप्टेंबर रोजी नू. म. वि. मराठी शाळा या शाळेत इ. १ ली ते इ. ४थीच्या १४० विद्यार्थ्यांना गणपती बाप्पाची मूर्ती घडवण्याची संधी मिळाली. शाळेच्या मोठ्ठ्या पटांगणात सर्व विद्यार्थी जवळजवळ दोन तास बाप्पाची मूर्ती साकारत होते. गटागटानुसार बसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक मदत करत होते. शिक्षक प्रतिनिधी प्राजक्ता पारेकर यांनी अगदी माती भिजवण्यापासून सर्व प्रक्रिया समजावून घेतली. विशेष म्हणजे या कार्यशाळेतील गणपतीबाप्पाला सर्वांचेच हात लागले. शाळेतील सेवक काका, माता-पालक संघाच्या अध्यक्षा, पालक, शिक्षक अशा सर्वांनीच विद्यार्थ्यांना मदत केली.
मॉडर्न हायस्कूल, गणेशखिंड या शाळेतील २६ विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरणपूरक सजावटीत पर्यावरणपूरक बाप्पा’ तयार केला. माती भिजवताना विद्यार्थ्यांना अनेक प्रश्‍न पडत होते. ‘ही माती म्हणजेच प्लॅस्टर ऑफ पॅरीस असते का?’, ‘बाजारात या मातीचे गणपती मिळतात का?’, अशा अनेक शंकांचे निरसन करतानाच ‘या मातीपासून आपल्याला गणपती बनवायला मिळणार’ या कल्पनेनेच विद्यार्थी सुखावले होते. शाडूची माती वापरत असल्याने संपूर्ण पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती आपण साकारणार याचा मुलांना अभिमान वाटत होता. शाळेच्या शिक्षिका स्वाती देवळे यांनी कार्यशाळेचे उत्तम नियोजन केले होते. विद्यार्थ्यांनी बनवलेले गणपती पाहून मुख्याध्यापिका छाया आंधळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सर्वात जास्त आनंद होता, तो वि. रा. रुईया मुकबधीर विद्यालय या शाळेत. शिक्षक प्रतिनिधी पूर्वा जोशी यांच्या मेहनतीला आलेले यश म्हणजे वि. रा. रुईया मुकबधीर विद्यालय शाळेत विद्यार्थ्यांनी बनवलेले अत्यंत सुबक गणपती. ‘आमच्या शाळेतील मुलांना ही कार्यशाळा खूप आवडेल, ते उत्तम प्रयत्न करतील’, हा विश्‍वास मुख्याध्यापक आत्माराम दुतोंडे आणि पूर्वा जोशी यांनी दिला. सोमवार दि. १० सप्टेंबर रोजी ४० विद्यार्थ्यांनी गणपतीच्या उत्तमोत्तम मूर्ती बनवल्या. गणपती तयार झाल्यानंतर मुलांच्या चेहेर्‍यावर असलेला आनंद पाहण्याजोगा होता.
प्रत्येक शाळेत कार्यशाळेच्या शेवटी गणपती वाळण्याविषयी आणि रंगवण्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या वर्षी बाजारात विकत मिळणार्‍या गणपतीपेक्षा स्वत: बनवलेला गणपती बसवून त्याची पूजा करण्याचे विद्यार्थ्यांनी ठरवले. अभिव्यक्तीला वाव देणार्‍या या कार्यशाळा विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांनाही आनंद देणार्‍या ठरल्या.

-रुपाली निरगुडे 

[email protected]