मैत्री म्हणजे खरं तर मनाच्या विसाव्याचं ठिकाण असतं. मनातील सुख-दु:ख, व्यथा-वेदना जिथे विश्‍वासाने सांगितल्या व ऐकून घेतल्या जातात असं ते ठिकाण असतं. मनाचा तो एक श्रद्धेय आधार असतो. मैत्रीमुळे जीवन समृद्ध, आनंदी व्हायला मदत होते. सुख-दु:ख, आशा-निराशा, आनंद-विफलता, जीवनातील नैराश्य ज्याच्या बाहुत व्यक्त करावे असं वाटणारी भावना (व्यक्ती) म्हणजे मैत्र. आनंद मिळवण्यासाठी आपल्याला परमेश्‍वराने खूप सुंदर मार्ग तयार करून ठेवलेत. त्यातील सर्वोच्च सहज-सुलभ मार्ग म्हणजे मैत्री होय.

जगण्यातला आनंद, सुख, समाधान घेता यावं, असा नातेबंध निर्माण व्हायचा असेल, तर प्रत्येक नात्यात मैत्र हे पाहिजेच. मनुष्यप्राणी हा इतर सजीव प्राण्यांपेक्षा वेगळा मानला जातो. माणूस विचार करतो, बोलतो. त्याचबरोबर नात्यांच्या धाग्यांनी बांधलेला असतो. माणसाचे जीवनच नात्यांच्या घट्ट विणेने समृद्ध झाले आहे.

तुमची तुमच्या मुलांच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका असते. तुम्हाला मुलांना काय-काय करावे हे सांगायला लागते. आपली मुलं जसजशी वाढायला लागतात, तसतशी त्यांच्यावर आपलीच छाप पडत असते. आता आपली जबाबदारी आहे की, त्यांच्यातील बदलांची जाणीव करून देणे व उपाय सुचवणे. आज पालक म्हणून तुमची मुले तुमच्याकडून शिकत आहेत. तुम्ही काय खात आहात, व्यायाम करत आहात का? तुम्ही ताणात असल्यास कसे वागता? ते सगळे तुमच्या मुलांना प्रभावित करत असते.

मुलांना आणखी प्रेरणा मिळते ती आई-वडिलांच्या अभ्यासातील विशेष कर्तृत्वामुळे! पालकांनी स्वत:च्या आचरणाने निर्माण केलेला नैतिक धाक हा प्रत्यक्ष शारीरिक शिक्षेपेक्षा मुलांना अधिक चांगले वळण लावतो. यामध्ये आपल्या मुलांशी सुसंवाद साधणे गरजेचे आहे. मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण व्हावयास हवे. तू जे काही वागतो आहेस, त्याचे इतरांवर काय परिणाम होणार आहेत, ते चूक की बरोबर हे समजावून सांगणे. या उमलत्या वयातील मुलांना चांगली समज येत असते. इतर लोकांच्या भावना व अनुभव शेअर करण्याची सवय हवी.

आपला मुलगा वा मुलगी योग्य मित्र-मैत्रिणींची निवड करतो की नाही, हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. मैत्री ही नेहमी अभ्यासाला पूरक कशी ठरेल, चारित्र्य संवर्धनास पोषक कशी ठरेल, अभ्यासाला उपयुक्त अशा सवयी मैत्रीतून मुलास कशा लागतील, वाईट सवयीपासून तो कसा दूर राहील याबाबतीत दक्ष राहावे लागेल. वाढत्या वयात मुलांची व मुलींची शारीरिक व मानसिक अवस्थांतरे ध्यानी घेऊन त्यांना योग्य वळण देणे ही जबाबदारी मुख्यत: आईवरच येऊन पडते.

पालक आणि पाल्य या नात्यातले मैत्र हरवले, तर संवाद हरवण्याची भीती असते. मुलांच्या वयात ठरावीक वळणावर आई-वडील हे त्यांचे मित्र-मैत्रिण बनणे गरजेचे असते. वयाच्या विशिष्ट टप्प्यात शरीर-मनात होणार्‍या परिवर्तनाची योग्य जाणीव आणि माहिती मैत्रीच्या नात्यातून देता येणे शक्य आहे. आपल्यात होणारे शारीरिक व मानसिक बदल हे बरोबर की चूक यांविषयी मनात संभ्रम असतो. भीती, चिंता यांबरोबरच कधी-कधी त्यांना असुरक्षितही वाटते. त्यामुळे आपल्या मुलांना यातील नैसर्गिकतेची जाणीव करून देणे, या वयाबद्दलचे कुतूहल, उत्सुकता, सुंदरता आपण मुला-मुलींना द्यावी व ‘‘तुला ज्या एकत्रित भावना आहेत, त्या सर्वांनाच असतात. त्यात वावगं काही नाही, त्यामुळे भिऊ नकोस, आम्ही तुझ्याबरोबर आहोत.’’ असा विश्वास निर्माण करता आला पाहिजे. कधी कधी आपल्या वयात येण्याबद्दल आपल्या किशोरवयाबद्दलचे किस्से, गमती-जमती आपल्या मुलांबरोबर शेअर कराव्यात.

मुलांच्या आहाराची, व्यायामाची व विश्रांतीची काळजी घेऊन त्या सर्वांना अभ्यासाच्या संदर्भात समतोल साधणे हे काम आईलाच करावे लागते. आनंदी, आरोग्यदायी सवयी लावणे खूप महत्त्वाचे असते. जसे की समतोल आहार, नियमित व्यायाम. मुलांना कौटुंबिक चर्चेमध्ये सामावून घ्या. प्रत्येक निर्णयात, नियमात आणि अपेक्षांमध्येही यामुळे सहसंवेदना, सहजभावना वाढीस लागून एकत्र काम करण्याची सवय लागण्यास मदत होईल. स्वावलंबनाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवले जाईल.

सध्याची परिस्थिती बघता अभ्यासक्रम, पुस्तके, शालेय शिस्त, परीक्षा, परीक्षेतील गुण यांवर पालक-शिक्षक मुलांचा अभ्यास पुरा करून घेण्याच्या मागे असतात. प्रगत शिक्षणाचा विचार करताना असे दिसून येते की, नाट्य, काव्य, नृत्य, निसर्गदर्शन, खेळ, छंद, इत्यादींनी मुलांभोवती मनमोकळे वातावरण निर्माण होते व मुलांचा सर्वांगीण विकास होतो. पालकांनी अभ्यास करून घेण्याबरोबरच मुलांचे समाधान कायम ठेवणे, त्यांना आनंदी ठेवणे, त्यांचे काही छंद असतील, तर ते जोपासले पाहिजेत व त्यातून त्याची प्रगती नकळत साधली जाते.

आनंदी होण्याच्या प्रक्रियेत शिक्षण व शिकणे या गोष्टी होऊ दे, त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यास मदत होईल. मैत्रीपूर्ण वातावरण तयार होईल. मुलांना कौतुकाची थाप देणेही खूप महत्त्वाचे. पालकांनी नकारात्मक बोलणेही टाळावे. यातून एक चांगला संदेश जाईल व तो स्वीकारण्याची मनाची तयारी होईल. मूल हे घरचा बहुमोल अलंकार आहे. त्याचा विकास पूर्णत्वाला पोहोचण्यासाठी मैत्रीचा धागा खूप उपयोगी पडतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते,

‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी

नजरेत सदा नवी दिशा असावी

घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हाही

क्षितीजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी.’

-विजया कदम

[email protected]