दिल्ली म्हटलं की, काही गोष्टी आपल्याला सहजच आठवतात. त्यातली एक खास गोष्ट म्हणजे चांदणी चौक. दिल्लीला जाऊन आलेल्या कोणाकडून तरी या चांदणी चौकाबद्दल आपण ऐकतो. एखाद्या हिंदी चित्रपटाच्या नावात (चांदणी चौक टू चायना) हा चांदणी चौक आपल्याला भेटतो. बऱ्याच हिंदी चित्रपटांमधून चांदणी चौक दिसतो. पण चांदणी चौकाची खरी मजा ही प्रत्यक्ष अनुभवण्यासारखी आहे . 

दिल्लीतल्या सुप्रसिद्ध लाल किल्ल्याच्या समोरच हा चांदणी चौक आहे. आपल्या पुण्यातल्या चांदणी चौकावरून दिल्लीच्या चांदणी चौकाची कल्पना करायची नाही बरं. पुण्यातला चांदणी चौक हा खरंच एक प्रकारचा चौक आहे. दिल्लीतही चांदणी चौक असा चौक आहेच, पण आता आपण जो चांदणी चौक म्हणून ओळखतो ती एक वेगळीच दुनिया आहे. इथे खाण्यापिण्याची रेलचेल आहे, तशीच वेगवेगळ्या मार्केटसची गजबज आहे. अगदी पुस्तकांपासून ते कपडे, दागिने, वेगवेगळे मसाले, लग्न पत्रिका, कॅमेरे अशा अनेक प्रकारच्या वस्तूंची घाऊक विक्री करणारी खूप दुकानं इथे आहेत. अर्ध्या पाऊण तासात चक्कर मारून आलो इतका छोटा जीव नाही या परिसराचा. चांदणी चौकाची मजा अनुभवायची असेल तर हाताशी भरपूर वेळ पाहिजे. पाय दुखेपर्यंत फिरण्याची तयारी पाहिजे. इथली गजबज, कोलाहल हा सहन करता आला पाहिजे. 

मी तुम्हांला आधीच सांगितलं आहे की, दिल्ली शहराला अनेक वर्षांचा इतिहास आहे. चांदणी चौकही या इतिहासाचा भाग आहे. लाल किल्ला बांधला गेला, तेव्हाच चांदणी चौकही अस्तित्वात आला. शहाजहानची मुलगी जहां आरा हिने या चांदणी चौक बाजारपेठेची आखणी किंवा आजच्या भाषेत डिझाईन केल होतं. ही चौकोनी आकाराची बाजारपेठ होती आणि यांच्या मध्यभागी एक तळ होतं ज्याचं पाणी चांदण्यात चमचमायचं आणि म्हणून हा चांदणी चौक! काही लोक असंही म्हणतात की, इथे चांदीचा मोठा व्यापार व्हायचा. चांदी शब्दावरून चांदणी असा शब्द आला आहे. या नावाचा उगम कसाही असो ऐकायला चांदणी चौक छानच वाटतं. 

इथे अनेक रस्ते आहेत, जे वेगवेगळ्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहेत. यातली काही नावं अनेकवेळा तुमच्या कानावर आली असतील. उदाहरणार्थ, परांठेंवाली गल्ली. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे मिळतात. इथली काही दुकानं १०० वर्षांहूनही जुनी आहेत. इथे तुपात घोळलेले, पाहाताच कॅलरीजची आठवण करून देणारे तरीही खाण्याचा मोह टाळता न येणारे पराठे चाखलेच पाहिजेत. इथे तिखट पराठ्याबरोबरच मावा, सुका मेवा भरलेले पराठे सुद्धा मिळतात. 

वेगवेगळी पुस्तकं घ्यायची असतील तर तुम्हांला नयी सडकला चक्कर मारलीच पाहिजे. सगळ्या प्रकारची जुनी-नवी, शाळा-कॉलेजची पुस्तकं इथे मिळतात. इथे पुस्तकांचा एक आठवडी बाजारही भरतो, त्याचं नाव आहे ‘दरिया गंज’. दरिया गंजला सर्व प्रकारची पुस्तकं अगदी स्वस्तात मिळतात. ही पुस्तक बरीचशी सेकंड हॅन्ड असतात. पण पुस्तकं खरेदी करण्यासाठी देशभरातून इथे गिऱ्हाईकं येत असतात. 

तुम्ही शाळेत इतिहास शिकत असाल, तेव्हा भारताचे अगदी हडप्पा संस्कृतीच्या काळापासून जगातल्या वेगवेगळ्या भागांशी व्यापारी संबंध कसे होते हे शिकत असाल. भारताच्या इतिहासात व्यापाराला आणि बाजारपेठांना खूप महत्त्व आहे. चांदणी चौक ही सुद्धा अशीच मोठी ऐतिहासिक बाजारपेठ आहे. असं म्हणतात की, ऐतिहासिक काळात तुर्कस्तान, चीन इथूनही व्यापारी खरेदीसाठी इथे यायचे. तर असा हा उत्साहाने सळसळणारा आणि इतिहासाची शान मिरवणारा चांदणी चौक अनुभवालाच पाहिजे तुम्ही. 

-सुप्रिया देवस्थळी 

[email protected] 

 

दिल्ली शहराच्या आखणीविषयी जाणून घेऊ खालील लेखात
शोधू नवे रस्ते - भाग ४