चिक्कार म्हणजे चिक्कारच वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. कोणास ठाऊक किती जुनी आहे ते? असेल कदाचित ५ - ७ हजार वर्षांपूर्वीची. त्या वेळी भारत आणि नेपाळच्या सीमेवर विदेह नावाचे एक विस्तीर्ण राज्य होते. हिमालयाच्या पायथ्याशी, गंगेच्या काठावर वसलेले समृद्ध राज्य. या राज्याची राजधानी होती मिथिला आणि या मनोहर नगरीचा राजा होता - जनक.

जनक एक थोर, प्रजेचे हित जपणारा राजा होता. विशेष असे की जनकाला, राजकारणाबरोबरच ज्ञानाची तहान सुद्धा होती. आपल्या पडलेल्या प्रश्नांचे उत्तर देऊन आपल्या मनाचे समाधान करेल अशा गुरूच्या तो शोधात होता. सर्वज्ञ गुरूच्या शोधाकरीता जनकाने एका यज्ञाचे आयोजन केले. मोठमोठ्या ऋषी-मुनींना, विचारवंतांना, विद्वानांना  यज्ञाचे आमंत्रण दिले. या यज्ञात राजाने सांगितले - जो ज्ञानी असेल त्याला मी सोन्याचे अलंकार घातलेल्या एक सहस्र गायी दान देण्यासाठी आणवल्या आहेत. करिता, इथे तुम्हापैकी जो सर्वोत्तम आहे, ज्ञानी आहे, वेदांमध्ये पारंगत आहे; त्याने समोर यावे आणि गायींचे दान स्वीकारावे.

त्या विद्वानांच्या सभेत कोणीच स्वत:ला ‘संपूर्ण ज्ञानी’ म्हणवून घेण्यास धजेना. त्या वेळी सभेतील याज्ञवाल्क्य ऋषी समोर आले व आपल्या शिष्याला म्हणाले, ‘‘वत्सा, या गायी आपल्या घराकडे घेऊन जा!’’ हे दान स्वीकारणार्‍या याज्ञवाल्क्यांचा स्वत:वरील व स्वत:च्या ज्ञानावरील विश्वास पाहून सभा स्तिमित झाली.

तिथे जमलेल्या विद्वानांबरोबर वाद विवाद करून, त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन याज्ञवाल्क्यांनी आपले श्रेष्ठत्व सिद्घ केले. जनक राजाला आपल्याला प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल असे गुरू भेटल्याचा अतिशय आनंद झाला! त्याने याज्ञवाल्क्यांना आदराने आसनावर बसवले व आपल्या मनातील शंका विचारण्याची परवानगी मागितली. जनकाने विचारलेले प्रश्न आणि याज्ञवाल्क्यांनी दिलेली उत्तरे बृहदारण्यक उपनिषदामध्ये वाचायला मिळतात. त्या दोघांमध्ये झालेल्या संवादाचा काही भाग पुढीलप्रमाणे - 

जनक : मुने! मनुष्याला कोण प्रकाश देतो?

याज्ञवाल्क्य : राजन्! मनुष्याला सूर्य प्रकाश देतो. सूर्याच्या प्रकाशात तो उठतो, बसतो, हिंडतो-फिरतो व आपली कामे करतो.

जनक : मुने! सूर्यास्त झाल्यावर मनुष्याला कोण प्रकाश देतो? 

याज्ञवाल्क्य : राजन्! सूर्यास्त झाल्यावर मनुष्याला चंद्र प्रकाश देतो. 

जनक : मुने! चंद्राचा अस्त झाल्यावर मनुष्याला कोण प्रकाश देतो?

याज्ञवाल्क्य : राजन्! सूर्य - चंद्र नसताना मनुष्य अग्नीच्या प्रकाशाने जगतो.

जनक : मुने! अग्नी विझल्यावर मनुष्याला कोण प्रकाश देतो?

याज्ञवाल्क्य : राजन्! अशा वेळी मनुष्याला शब्द प्रकाश देतात. गडद अंधारात, जेव्हा स्वत:चा हात सुद्धा दिसत नाही, तेव्हा आवाजाने दिशेचे ज्ञान होते किंवा कोणी तीन पावले पुढे ये मग डावीकडे वळ’, असे सांगितले, तर त्याप्रमाणे तो करू शकतो. शब्दांच्या आधाराने मनुष्य उठणे, बसणे, फिरणे, कामे करणे इत्यादी करू शकतो.

जनक : मुने! सूर्य - चंद्र - अग्नी नसताना व आवाज सुद्धा नसताना मनुष्य कोणाच्या प्रकाशाने जगतो? 

याज्ञवाल्क्य : राजन्! अशा वेळी मनुष्याला त्याचा आत्मा प्रकाश देतो.

जनक : मुने! आत्मा म्हणजे काय?

याज्ञवाल्क्य : राजन्! सर्वांच्या अंतर्यामी आत्मा वसत असतो. आत्मा जागत नाही, झोपत नाही किंवा स्वप्नदेखील पाहात नाही. तो देहाप्रमाणे सुख - दु:ख भोगत नाही. तो प्रत्येकाच्या देहात राहतो, पण देहाचा मृत्यू झाला तरी आत्मा मरत नाही. तो इच्छेनुसार पुन्हा पुन्हा जन्म घेतो. मात्र जेव्हा मनुष्य इच्छारहित होतो, तेव्हा तो ब्रह्माशी एकरूप होतो!

जनकाला शिकण्याची तीव्र इच्छा असल्याने, त्याने गुरूंना अनेक प्रश्न विचारून अध्यात्म विषय समजून घेतला. जनकाच्या तळमळीमुळे व शुद्ध भावनेने विचारलेल्या प्रश्नांमुळे, तो याज्ञवाल्क्यांचा आवडता शिष्य झाला. अभ्यासाने जनक ज्ञानी झाला. लवकरच जनक ‘राजा ऋषी’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

जनकाच्या कुळातील नंतरच्या राजांनी ‘जनक’ हेच नाव लावले. या कुळातील एका जनक राजाची कन्या होती - जानकी! ही विदेहची वैदेही, मिथिलेची मैथिली; रामाची पत्नी, सीता म्हणून प्रसिद्धीस आली! जनकाच्या दरबारात जिथे रामाने शिवधनुष्य तोडून स्वयंवराचा पण जिंकला, जिथे राम - सीतेचा विवाह झाला, त्या जनकाच्या नगरीत - जनकपुरी येथे आज ‘जानकी मंदिर’ पाहायला मिळते. याच दरबारात, पूर्वी याज्ञवाल्क्यने जनकाला अमृताचे बोल सांगितले होते. जे बृहदारण्यक उपनिषदात लिहिले गेले.

-दिपाली पाटवदकर

[email protected]