गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे बंगाली कवी आपल्या साध्या, सुंदर, आशयपूर्ण कवितांमुळे एक श्रेष्ठ आणि वंदनीय विश्वकवी झाले. त्यांचा जन्म झाला ती कोलकात्यातील जोडासांकोची ठाकूरवाडी आता एक गौरववास्तू झाली आहे. ठाकूरवाडीचे आताचे नाव आहे "रवींद्र सदन".

रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ हे त्या काळातील एक प्रतिष्ठित, धनवान व्यापारी. इंग्रज कर्मचारी कामावर ठेवून आणि इंग्रजांबरोबर पार्टनरशिप करून त्यांनी अनेक व्यवसाय उभारले. त्यातून अमाप धन मिळवले आणि दानही केले. द्वारकानाथ यांचे पुत्र देवेंद्रनाथ. ते अध्यात्मिक वृत्तीचे. त्यांना ईश्वरभेटीची तळमळ लागलेली. ते सतत हिमालयात भ्रमण करीत. अतिशय सात्विक, सज्जन, ईश्वरभक्त अशा देवेंद्रनाथांना लोक "महर्षी " म्हणत.

महर्षी देवेंद्रनाथांचे धाकटे पुत्र रवींद्रनाथ.

तुम्हाला वाटेल, रवींद्रनाथांचे बालपण अगदी सुखात, आनंदात, लाडाकोडात गेले असेल ! पण तसे नव्हते, मित्रांनो, बालपणाबद्दल रवींद्रनाथ लिहितात --"आमच्या लहानपणी चैन वगैरे करण्याची पद्धत नव्हती. त्या काळचं आयुष्य फार साधंसुधं होतं. लहान मुलांकडे लक्ष द्यायचा प्रकार तर अजिबातच नव्हता. मुलांना सतत खायला-प्यायला घालून आणि कपडेलत्ते घालून, नटवून ठेवण्याची पद्धत नव्हती. आम्ही मुलं नोकरांच्या हुकमाखाली राहायचो. स्वतःचं काम सोपं व्हावं म्हणून नोकरांनी आमच्यावर कडक निर्बंध घातले होते. पण आमची मनं मुक्त होती आणि दडपणाखाली चेपलेली  नव्हती."

रवींद्रनाथ पुढे लिहितात -- "आमच्यावेळी जेवण्या-खाण्यात आवडीनिवडीचा संबंधच नव्हता. कपडेही इतके सामान्य असायचे की आताच्या मुलांना ते घालणे म्हणजे अपमानास्पद वाटेल! फक्त एका गोष्टीचं वाईट वाटायचं, आमच्या घरचा शिंपी आमच्या शर्टाना खिसे शिवत नसे. कितीही गरीब मुलगा असेल तरी प्रत्येक मुलाकडे खिशात ठेवायला अनमोल खजिना असतोच ना! आम्हाला चपलांचा एकच जोड असायचा, जो पायांत नीट बसायचाच नाही. त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना चप्पल ओढत पुढे न्यावी लागे.

"आम्हाला लहानपणी सहज असे काहीच मिळाले नाही. त्यामुळे जे काही थोडीबहुत मिळत असे, त्याची संपूर्ण गोडी आम्ही चाखत असू. सालीपासून बाठीपर्यंत काहीही वाया घालवत नसू."

रवींद्रनाथांना सांभाळायला श्याम नावाचा नोकर होता. तो त्यांना खोलीत एका जागी बसवून त्यांच्याभोवती खडूने एक रेघ ओढायचा आणि गंभीर चेहऱ्याने सांगायचा, "या रेघेबाहेर गेलास तर भयंकर संकटात सापडशील..!" लक्ष्मणरेषा ओलांडल्यामुळे सीतेवर आलेली संकटे रामायणात वाचलेली असल्यामुळे घाबरून ते त्या वर्तुळात बसून राहत. खोलीच्या खिडकीबाहेर खाली एक पायऱ्या असलेलं तळं, काठावर प्रचंड वटवृक्ष, नारळाच्या झाडांच्या रांगा होत्या. तळ्यावर सतत बायका, पोरे, पुरुष तसेच पशू-पक्षी येत. दिवसभर चित्रपटासारखी तळ्यावरची बदलत जाणारी दृश्ये रवींद्रनाथ बघत बसत. ते लिहितात --

"त्या काळात पृथ्वी नावाच्या सुंदर वस्तूमधला आनंद अपार गहिरा होता. माती, पाणी, वारा, झाडे, आकाश... सगळेजण त्यांच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे आमची एकाकी मनं कधीच उदास, निराश झाली नाहीत."

किती वेगळं होतं नाही, रवींद्रनाथांचे बालपण? बालपणातील निरागस, आनंदी, चौकस, उत्सुक आणि टिपकागदासारखी दृष्टी सुंदर जगण्याचा पाया रचते.

रवींद्रनाथांना ८० वर्षांचे दीर्घायुष्य मिळाले आणि ७ ऑगस्ट १९४१ रोजी त्यांचे निधन झाले.

चला, आपणही सुंदर, निर्मळ दृष्टी जोपासू या !!

-स्वाती दाढे

[email protected]