पालकांनी आपल्या मुलांशी ‘अभ्यासाबद्दल संवाद’ कसा साधावा, याबद्दल गप्पा मारु या! अभ्यासाबद्दल दोन टोकांची मते प्रचलित आहेत. एक म्हणजे, ‘काय करायचा अभ्यास? मुलांना अभ्यासाचं ओझं कशाला?’ आणि दुसरे टोक म्हणजे ‘मुलांच्या अभ्यासावर आपण सतत पहारा ठेवला पाहिजे. त्याला जवळ घेऊन सतत त्याच्याकडून घोकंपट्टी करून घेतली पाहिजे. शिकवणीसाठी त्याच्याबरोबर पाच-सहा ठिकाणी गेले पाहिजे. त्याने लिहिले-वाचले नाही, त्याला कमी गुण मिळाले तर त्याला ठोकून काढला पाहिजे.’ या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी पालक-विद्यार्थी संवाद साधला पाहिजे. आपण आपल्या पाल्यासाठी अर्थपूर्ण व गुणवत्तापूर्ण वेळ देतो का?’ असा प्रश्न पालकांनी स्वतःच स्वतःला विचारायला हवा.       
 
बालवाडीतील मुलांच्या पालकांपासून दहावी-बारावीच्या मुलांच्या पालकांपर्यंत सर्वांनीच ‘पालक’ या आपल्या भूमिकेचा विचार करायला हवा, त्याबद्दल अभ्यासही करायला हवा. पालकांच्या अशा बदलत्या भूमिकांबरोबरच ‘पालकत्वाच्या जाणीवतेचा’ विकास होतो. आपल्या घरात ‘आपले मूल’ असा आईबाबांच्या संवादाचा विषय असायला हवा. काही घरांमध्ये हा संवादविषय असतो; त्याचे स्वागतच करायला हवे. काही घरात या विषयाला अतिशय तीव्र अशा व्यावहारिकतेचे स्वरूप असते. म्हणजे ‘माझा मुलगा किंवा मुलगी डॉक्टरच व्हायला हवी. किंवा त्यानं इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच प्रवेश घेतला पाहिजे. मुलांची आवड किंवा कल असो किंवा नसो, त्याने अमुक विषयच घेतला पाहिजे, त्यात त्याने प्रथम क्रमांक मिळवलाच पाहिजे’ अशा आग्रहांचा, हट्टांचा आपल्या मुलांवर योग्य असा परिणाम होत नाही, याचे आपण भान ठेवले पहिजे. म्हणूनच सर्वच पालकांनी आपल्यामध्ये सुजाण, डोळस पालकात्वाची जाणीव विकसित करायला हवी. त्यासाठी स्वतःच, स्वतःसाठी आणि मुलांसाठी आवर्जून वेळ काढला पाहिजे. 
 
बालवाडीतील मुलांपासून इयत्ता चौथीपर्यंतच्या मुलामुलींच्या विकासात पालकांचा व शिक्षकांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. त्यासाठी शिक्षक-पालक संवाद घडला पाहिजे. खरे म्हणजे मूल समजून घेणे सोपे नाही, ते एक आव्हानच आहे. मूल समजून घेण्यास आनंद आहे. आपले घर व शाळा ही मुलांच्या विकासाची प्रमुख ठिकाणे आहेत. ‘घर म्हणजे केवळ चार भिंती व छप्पर नव्हे, तर घर म्हणजे घरातील माणसे. घरातील माणसांच्या बोलण्याचा, वागण्याचा, परस्परसंबंधांचा मुलांच्या मनावर खूप खोल परिणाम होतो, त्याचे प्रत्येक घराने भान ठेवायला हवे.
 
आपल्या मुलांचे बोलणे, शब्दोच्चार, शब्दसंग्रह, त्याच्या सवयी आणि त्याचे शारीरक-मानसिक आरोग्य यांच्याकडे लक्ष दायला हवे. आपल्या मुलाला ‘घरची ओढ’ वाटली पाहिजे. आपले आई बाबा, ताई दादा, आजी आजोबा यांच्या सहवासातून व संवादातून मुलांवर संस्कार होतात. घरी जेव्हा केवळ आईबाबाच असतात, तेव्हा त्यांच्यावरील जबाबदारी वाढते. जेव्हा आईबाबा दोघेही नोकरी करतात, तेव्हा तर ती अनेक पटींनी वाढते. 
 
लहान मुलांना गोष्टी सांगणे, त्यांच्याबरोबर खेळणे, फिरायला जाणे, गाणी म्हणणे, मुलांनी काढलेल्या चित्रांना दाद देणे, याला फार फार महत्त्व आहे. मुलांना प्रोत्साहन देणे, त्यांना शाबासकी देणे आवश्यक असते. मुलांना त्यांचे दोष दाखविणे, त्यांना प्रसंगी रागावणे व त्यांना प्रेरणा देणे यांचे संमिश्रण पालकांच्या वागण्यात असायला हवे. 
 
आपल्याला इतिहासाचे फार मोठे धन लाभलेले आहे. रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद आदींची चरित्रे, सुंदर निवडक पौराणिक कथा, चातुर्यकथा, पंचतंत्रहितोपदेश यांतील कथा पालकांनी मुलांना सांगायला हव्यात. त्यासाठी आपणही पुन्हा आपले वाचन वाढविले पाहिजे. मुलांनी गोष्टी सांगाव्या, गाणी गावीत आणि ती ऐकावीत, असेही घडले पाहिजे. घरातील आपले वागणे हा मुलांपुढील आदर्श असतो. मुलांवर पालकांच्या वागण्याचे, परस्परसंवादाचे परिणाम होतात, याचे पालकांनी भान ठेवायला हवे. 
 
मुलांना अभ्यासविषयक चांगल्या सवयी लागाव्यात, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागाव्यात, मुले स्वावलंबी व्हावीत, इतरांशी वागताना त्यांनी सौजन्याने व शिष्टाचाराने वागावे, याचे संस्कार पालकांच्या आचरणातून मुलांवर घडतात. अनेकदा मुले चुकतात. त्यांना चुका कशा समजून सांगाव्या याचाही पालकांनी विचार करायला हवा. मुलांवर सतत रागावणे, इतरांसमोर त्यांचा अपमान करणे, त्यांना मारणे, उपाशी ठेवणे असे प्रसंग टाळता येतील का? 
 
मुले आपली पुस्तके, वह्या कशी वापरतात, याकडे पालकांनी लक्ष द्यावे. त्यातूनच त्यांचे अभ्यासावरचे प्रेम व्यक्त होते. मुले शाळेतून घरी आल्यावर सहजपणे ‘शाळेत काय झाला? कोणते नवे पाठ झाले? घरी कोणता अभ्यास करायला सांगितला आहे?’ अशा चौकशा करणे आवश्यक आहे. पण त्याचा सूर सुसंवादाचा, सहज गप्पांचा असावा. एखादा पाठ( कोणत्याही विषयाचा) मुलाला मोठ्याने वाचायला सांगावे, आपण ऐकावे. त्यांची अभ्यासाची जागा असावी. त्या ठिकाणी एखादा फळा असावा. मुलांनी त्यावर चित्रे काढावीत, लिहावे. ही त्यांची अभिव्यक्ती असते. मुलांना निसर्गाचा सहवास मिळावा म्हणून एखाद्या रविवारी मुलांना बागेत घेऊन जावे. मुलांबरोबर राहणे, त्यांच्याशी बोलणे, खेळणे यातून मुलांचा अभ्यास करता येतोच, त्यांना अधिक आनंद देता येतो. 
 
परिक्षा, चाचण्या यांना मुलांच्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान असते, असायलाच हवे. पण यातून मुलांच्या मनावर ताण येत कामा नये. अभ्यासाचे ओझे वाटता कामा नये. त्यांना सर्व विषयात गोडी वाटली पाहिजे. यासाठी मुलांना नियमितपणे, रोज अभ्यासास बसविले पाहिजे. त्यांनी कंटाळा न करता अभ्यास करावा, यासाठी थोडी विश्रांती, थोडा बदल, थोडे लिहिणे-वाचणे असे केले पाहिजे. मुलांनी स्वतः वाचणे, स्वतः लिहिणे, स्वतः समजून घेणे यावर पालकांनी भर द्यावा व या प्रवासात आपण त्यांच्याबरोबर राहावे. मुलांना अवघड वाटणारे विषय, घटक असतील, तर शांतपणे त्यांना समजून घेण्यास मदत करावी. रोज, नियमितपणे, शिस्तीने व नियोजनबद्ध, वेळापत्रक आखून अभ्यास केला तर  मुलांच्या मनावर दडपण येत नाही. अभ्यास, परीक्षा, निकाल यांतून मुलांना प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावे; आपल्या उणिवांची डोळस जाणीव व्हावी, पण उणिवा किंवा चुका म्हणजे गुन्हा नव्हे. त्या दूर करता येतात,याचा मुलांना आत्मविश्वास यावा, मुलांना यशाचा अनुभव यावा, प्रयत्नांतूनच यश मिळते याचा अनुभव यावा यासाठी पालकांनी मुलांशी संवाद साधावा. 
 
मुलांना पाठ्यपुस्तकाशिवाय अवांतर वाचनाची सवय लागली पाहिजे. आपल्या शाळेचे ग्रंथालय त्याला आपले वाटावे. आपले पालकही चांगले वाचक आहेत, त्यांना ग्रंथ सहवास आवडतो, याचे उदाहरण मुलांसमोर असावे. पालकांनी मुलांसाठी आवर्जून पुस्तके खरेदी करावीत. आपल्या घरी इंग्रजी, मराठी, हिंदी शब्दकोश असायलाच हवेत. मुलांना नवीन शब्दांचा शोध घेण्यासाठी शब्दकोश वापरायचा असतो, याची सवय लहानपणापासूनच लागली पाहिजे. त्यासाठी, प्रारंभी शब्दकोश कसा वापरावा, याचे उदाहरण आपण स्वतः घालून द्यावे. शब्दकोश, नकाशे, निवडक वाचनीय पुस्तके मुलांसमोर असावीत.
 
लहान वयात मुलांचे अक्षर चांगले व्हावे, त्यांना चित्रे काढता यावीत, आकृत्या रंगवता याव्यात, भाषण करता यावे, यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा. त्याचबरोबर मुलांची शारीरिक क्षमता चांगली व्हावी, यासाठी मुलांचे व्यायाम, धावणे, पळणे, पोहणे इत्यादीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या सर्व बाबतीत आपण मुलांबरोबर राहायला हवे. सर्व कौशल्ये आत्मसात करण्याच्या आनंदात आपण मुलांबरोबर राहणे यासारखा आनंद नाही. मुलांनी मोठे व्हावे, मोठ्यांनी लहान व्हावे, बाल व्हावे हा पालकत्त्वाचा अर्थ लक्षात आणू या, म्हणजे सुजाण पालकत्त्व हे व्रतच आहे,हे लक्षात येईल. 
 
- श्री. वा. कुलकर्णी
                                                                                                          

'अभ्यासावर बोलू काही' सदरातील श्री. वा. कुलकर्णी यांचा दुसरा लेख.
महत्त्व नियोजनाचे अभ्यासाबद्दलचे गैरसमज