शेवंती

दिंनाक: 04 Aug 2018 15:14:16


शेवंतीचे शास्त्रीय नाव क्रिसँथेमम इंडिकम आहे. ही पुष्कळ वर्षे जगणारी औषधी वनस्पती आहे. ही साधारण ६० – ९० सें.मी. उंच वाढते. हिचे मूळ स्थान चीन व जपान. हार, वेण्यांसाठी यांचा मुबलक वापर होतो. पण ती छोटी फुले असतात; त्यांना बटन शेवंती म्हणतात (पाकळ्या घट्ट आणि लहान असतात.) तर पांढरी, पिवळी यांच्या पाकळ्या थोड्या लांब, मोठ्या असतात. पण त्यांना आधार द्यावा लागतो. ही फुले फुलदाणीत किंवा पुष्परचनेतही वापरली जातात. या विविधरंगी आकर्षक फुलांसाठी तिची लागवड भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होते. सरस्वतीला हे फूल आवडते.

शेवंतीची पाने साधी, एकाआड एक, सुवासिक व पिसासारखी, पण थोडी विभागलेली साधारण केसाळ असतात. हंगाम हिवाळ्यात असतो. फुले कडू, भूक वाढवणारी. सौम्य रेचक म्हणूनही याचा वापर होतो. चीनमध्येही पानांचा वापर होतो. फुलांचे विविध रंग त्यातील कॅरोटिनॉइडांमुळे येतात. बियांपासून तेल मिळते. या फुलात कीटकनाशकाचा गुण आहे.

शेवंतीची लागवड निमदुष्काळी भागात जास्त केली जाते. लागवड बीपासून केली जाते. फांद्यांचे शेंडे कापून मधल्या भागाचे ३ -४ डोळे असलेले फाटे बियाणे म्हणून वापरतात. धुमाऱ्यापासूनही लागवड करतात. हिवाळ्याच्या हंगामात पण १५ अंश सेल्सिअस तापमानात ती चांगले पीक देते. कडक थंडी, उन्हाळा तिला चालत नाही. शेवंतीची लागवड महाराष्ट्रात विशेषतः पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदे या तालुक्यात आढळते.

जून – जुलैमध्ये लागवड करावी. फुले तोडणी १ दिवसाआड, दुपारनंतर करावी. निवडक कळ्या ठेवून बाकी खुडाव्या म्हणजे फुले टपोरी व चांगली मिळतील. मोठी लांब दांड्याची फुले फुलदाणी, पुष्परचनेसाठी उपयुक्त असतात. दसरा, दिवाळी, लग्नसराईत या फुलांना मागणी जास्त असते. हिला सुपीक, पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. उत्तम मशागत करून तीत शेणखत वा कंपोस्ट खत आवश्यक त्या प्रमाणात मिसळावे. ४० – ५० सें.मी. अंतरावर सारी काढून त्यात ३० – ४० अंतरावर बियाणे उसाच्या कांड्याप्रमाणे आडवे लावतात. नियमित हलकेसे पाणी द्यावे. यावर रोग पडल्यास कडुलिंबाचा अर्क सौम्य करून (पाणी थोडे जास्त) मारावा. जुलै – ऑगस्टमध्ये येणाऱ्या मातीच्या किड्यांवर एंडोसल्फान व भुरी रोगावर पाण्यात विरघळणाऱ्या गंधकाची फवारणी करतात.  

सदाफुली

-मीनल पटवर्धन

[email protected]