गरज वाहनविवेकाची

दिंनाक: 30 Aug 2018 15:02:42


‘‘अजिंक्य, जरा बाहेर ये, वीणामावशी आलीय बघ तुला बेस्ट लक द्यायला.’’ बारावी कॉमर्सचा अभ्यास करत असलेल्या अजिंक्यला आईने हाक मारली. ‘‘त्याला कशाला डिस्टर्ब करतेस ताई? आपणच जाऊ त्याच्या खोलीत.’’

‘‘वाऽव मावशी तू? माझं आवडतं चॉकलेट आणि ग्रिटिंगसुद्धा? थॅक्स डिअर, यू आर नेहमीच ग्रेट हं मावशी.’’ ‘‘अरे काय ही धेडगुजरी भाषा? आणि हे काय? अभ्यासाच्या चार्टस्बरोबर बाईक्सचे फोटोग्राफ्स? जगात इतक्या प्रकारच्या बाईक्सची मॉडेेल आहेत हे मला आजच कळलं, पण सुंदर आहे हे कलेक्शन.’’ ‘‘अगं काय विचारू नकोस वीणा, परीक्षा संपली की लगेच बाईक हवी, म्हणून चिरंजीव हटून बसलेत आणि आमचे हे तर हरिश्‍चंद्राचा अवतार. शब्द दिलाय बाईक घेण्याचा, बुकसुद्धा करून झालीय. आलिया बाईकसी असावे सादर! दुसरं काय?’’ ‘‘आई, इतकं नकोय हं बोेलायला. बाबांनी केलंय मला प्रॉमिस बाईकचं आणि स्कुटी चालवायचा आता जाम कंटाळा आलाय. मित्रपण चिडवतात लेडीज व्हेइकल चालवतो म्हणून.’’

घराघरात आज असे अजिंक्य आपल्याला सहज भेटतात. भेटतात कुठे? भरधाव रपेट करताना दिसतात म्हणू या. तिसर्‍या वर्षापर्यंत तिचाकी सायकल, मग टोबू सायकल हौसेने घेतली जाते. पाचवी-सहावीतला मुलगाही गिअरची सायकल घेऊन शाळेत जायला लागतो आणि नववी दहावीत तर त्याला शाळेत जायला नॉनगिअर टू व्हिलरही सहज मिळते. आज मध्यमवर्गीय कुटुंबात दरडोई एक तरी वाहन असतेच. पुण्यात ते प्रमाण थोडे जास्त आहे म्हणतात. आताच्या पालकांना आठवेल, की त्यांच्या वेळी सायकल शिकणे हा एक मोठा आनंदसोहळा असे. (की गुडघे, ढोपरे, फुटण्याचा, खरचटण्याचा?) साधारण २५ वर्षांपूर्वी सायकल तासाला ७५ पैसे भाड्याने मिळत असे. स्वत:ची सायकल हे मुलांचे स्वप्न असायचे. ते पूर्ण करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणे, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता सायकलही मिळे’ यासारखे वाक्प्रचार, म्हणींचा साक्षात अनुभव घ्यावा लागे. या सायकलवर मग जिवाभावाचा स्नेह जडायचा. तिची स्वच्छता, तेलपाणी, चाकातली हवा तपासणे असा रविवारचा ठरलेला कार्यक्रम असायचा. डबलसीट घेता येणार्‍यांना जाम भाव असायचा. स्वत:ची सायकल स्वत:च दुरूस्त करायला शिकण्यात एक वेगळीच गंमत होती.

सायकलच्या वेगाला एक मर्यादा होती. हातापायांच्या, स्नायूंच्या शक्तीने ती नियंत्रितही करता येत असे. मनावरचे नियंत्रण यातूनच नकळत आम्ही शिकत होतो का? पण वेगाने पळणार्‍या जगाशी सायकलला जुळवून घेता आले नाही हेच खरे! आजच्या टीनएजर्स मुलांना (वय वर्षे १३ ते १७) टू व्हिलर्स, बाईक्सची प्रचंड क्रेझ आहे. ‘धूम’सारखे सिनेमे तर मुले तीनतीनदा पाहतात. ‘शोर’ सिनेमातील नायक अगतिकतेपोटी अखंड तीन दिवस सतत सायकल चालवतो, यातील साहसी प्रयोगामधील कारुण्य आजच्या पिढीला जाणवेल का?

सायकलच्या अपघातात जीव गमावण्याची धास्ती नव्हती. फार तर फ्रॅक्चर होण्याचा धोका होता. आजचे हे बाईकवीर म्हणजे रस्त्यावर फिरणारे यमदूतच म्हणायाला हवेत. भन्नाट वेगाचा अनुभव (त्यांच्यासाठी थरारक असेल, पण इतरांसाठी जिवाचा थरकाप करणारा) त्यांच्यासह रस्त्यावरून जाणार्‍या सर्वांनाच नेहमी येत नाही का? आज शाळा-कॉलेजला जाण्यासाठी दुचाकी घेऊन देणे, हे प्रतिष्ठेचे लक्षण आहे, असे पालकांनाही वाटू लागले असल्याचे दिसते. संपूर्ण जगाचा विचार करता भारतात दुचाकींची संख्या वाढू लागली आहे व त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे, असे अहवाल समोर येऊनही निव्वळ ‘क्रेझ’ म्हणून दुचाकी घेणार्‍यांची संख्या कमी नाही. सहज उपलब्ध झालेली दुचाकी वाहने मुलांच्या हातातली खेळणी बनतील. उच्च-मध्यमवर्गात तर मुलांना चारचाकीही सहजपणे मिळते. आरटीओने केलेल्या नियमांकडे पाहिले, तर लक्षात येते की अठरा वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीला वाहन परवाना मिळतो यामागे विशिष्ट कारणेही आहेत. रस्त्यावरील परिस्थितीला अनुसरून विविध गुंतागुंतीच्या शारीरिक क्रिया व मेंदूच्या प्रतिक्षिप्त क्रिया यांचा एकाच वेळी समन्वय साधून वाहन चालवण्याची कृती घडत असते. अशा प्रकारे शारीरिक, बौद्धिक परिपक्वता येईपर्यंत आपण वाट पाहतो का? टू व्हिलर मित्रमंडळीत शिकली जाते, पण फोर व्हिलर शिकताना आवश्यक ते प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षक हॉर्न कसा वाजवायचा ते शिकवतात, पण तो केव्हा व कुठे वाजवायचा याचे भान ज्याचे त्याला असावे लागते; अन्यथा हॉस्पिटल्स, शाळा यांच्या परिसरात शक्यतो हॉर्न वाजवू नये; म्हणून ‘नो हार्न झोन’ राखून ठेवावे लागले नसते. सिग्नल पाळणे, ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून कोठेही गाडी पार्क न करता पार्किंग स्लॉटमध्येच गाडी पार्क करणे, वेगमर्यादा पाळणे, नादुरूस्त वाहनांची त्वरित दुरूस्ती करून, पीयूसी तपासून पर्यावरण प्रदूषणास आळा घालणे, आवश्यक ती कागदपत्रे, परवाना स्वत:जवळ बाळगणे या सगळ्या आवश्यक आणि इष्ट गोष्टी मुलांना आपण जाणीवपूर्वक शिकवतो, पण जीवनात चुकीची गोष्ट थांबवण्याची वेळ कोणती आणि बरोबर कृतीला वेग देण्याची वेळ कोणती हे मुलांना आम्ही सांगतो का?

शाळा-कॉलेजांतील प्रत्येक परीक्षेत मुलांनी यश मिळवावे, यासाठी आपण खूप आग्रही असतो, पण रस्त्यावर तर हरघडी परीक्षा द्यावी लागते. आणीबाणी, आपत्ती किंवा अचानक उद्भवणारी परिस्थिती, अनपेक्षित प्रसंग पूर्वसूचना देऊन येत नाहीत. अशा वेळी प्रसंगावधान, निर्णयक्षमता, मनोधैर्य, त्वरित कृती, संयम, मनावर नियंत्रण यांसारख्या गुणांचा कस लागत असतो. हे गुण निर्माण करण्यासाठी वाहन हाती देण्यापूर्वी आपण विचार तरी करतो का? आजच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रवृत्तीमागेही अनेक कारणे आढळतात. त्यातही वरील गुणांचा अभाव प्रकर्षाने आढळल्याचे दिसून आले आहे. मुले स्वत:चा, पालकांचा, शिक्षकांचा कोणाचाच आदर करत नाहीत असे आपण म्हणतो, पण दसर्‍याला झेंडूच्या फुलांची माळ घालून वाहनाचा आदर करण्याचा संस्कार आजकाल लुप्त होतो आहे का? याचाही विचार करायला हवा. मुले बरोबर असताना रहदारीचे नियम धाब्यावर बसवणार्‍या (वेगमर्यादा न पाळणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, ओव्हरटेक करणे, सिग्नल तोडणे, प्रसंगी चिरीमिरी देणे इ.) पालकांचे अनुकरण मुलांनी केले तर चूक कोणाची? बेफाम वेगाच्या नशेमुळे मुलांचे पाय जमिनीवर राहतील काय? पुन्हा नवीन प्रॉडक्टची जाहिरात पाहिली, की मुलांना पहिली दुचाकी नकोशी वाटते. कारण त्या वाहनात भावनिक गुंतवणूकच नसते. सतत नव्याचा हव्यास धरण्यातून चंचल वृत्तीचीच जोपासना होत नाही का?

हातात अवेळी आलेल्या बाईकचा वेग वाढवताना आई-बाबांचा विचारही मुलाच्या मनाला शिवत नाही. कोणत्या दिशेला जायचे आहे, किती गतीने जायचे आहे, कोठे थांबायचे; तर कोठे वेग वाढवायचा, हा ‘वाहनविवेक’ वाहनाची चावी हाती देण्यापूर्वीच शिकवायला हवा.

-मानसी वैशंपायन

svapp20162gmail.com