मी खिडकीत चहा पीत बसलो होतो. आणि सहज समोर पाहिलं तर बिस्किटाच्या डब्यावर एक मोठं लालसर झुरळ बसलं होतं. आणि ते माझ्याचकडे मिशा हलवत पाहत होते.

त्या वळवळणार्‍या मिशा आणि त्या झुरळाची पंखबोली पाहून मी दचकलो. मी किंचाळणारच होतो.

इतक्यात ते झुरळ इंग्रजीत म्हणालं, “प्लीज डोण्ट स्क्रिम. बिहेव युवरसेल्फ.”

बापरे!! इंग्रजी बोलणारं झुरळ तर मी पहिल्यांदाच पाहात होतो. त्यामुळे माझ्या मनात विचार आला, आता आपण याच्याशी इंग्रजीत बोलायचं की मराठीत?

माझ्रा मनातलं ओळखल्याप्रमाणे उजवी मिशी हलवत ते झुरळ म्हणालं, “हॅलो, इंग्रजी ही माझी फर्स्ट लँग्वेज आहे आणि मराठी सेकंड लँग्वेज आहे. तुम्ही बोला मराठीत. नो प्रॉब्लेम.”

मी चिडून म्हणालो, “पण..पण... तू महाराष्ट्रात राहतोस तरी तुझी सेकंड लँग्वेज मराठी का बरं?”

“अहो, इंग्रजी ही माझी मातृभाषा आहे! म्हणून ती फर्स्ट लँग्वेज. आम्ही इथे आल्रावर तुमच्याकडूनच मराठी शिकलो. म्हणून ती सेकंड लँग्वेज.”

“ओह ओके. तुम्ही मुळचे कुठले? आणि इथे कसे काय आलात हो?”

“मी तुम्हाला माझं शास्त्रीय नाव सांगतो. कारण बहुतेकवेळा शास्त्रीय नावं ही त्या  त्या   प्राण्यांच्या गुणधर्म, राहण्याचे ठिकाण आणि त्यांच्या सवयी यावरून ठेवलेली असतात. तर.. माझं शास्त्रीय नाव आहे‘पेरीप्लेनेटा अमेरिकाना’ कळलं काही?”

“अं... म्हणजे अमेरिकेबद्दल काहीतरी असावं.”

“थोडं फार बरोबर आहे तुमचं.”

“आम्ही मुळचे अमेरिकेतले. पेरी म्हणजे सर्वत्र आणि प्लेनेटा म्हणजे ग्रहावर. पृथ्वी या ग्रहावर सर्वत्र आढळणारा प्राणी असा याचा अर्थ आहे.”

“आम्हाला फिरायला, भटकायला खूप आवडतं. पूर्वीच्या काळी ट्रक, बोटी किंवा विमानाने सामानाची, धान्यांची आणि कधीकधी माणसांची ने-आण करताना आम्ही पण त्यांच्यासोबत प्रवास करायला सुरुवात केली.”

“प्रवासात मात्र एक गंमत होतेच होते. म्हणजे ट्रकचं, बोटीचं किंवा विमानाचं वजन न वाढता आतल्या प्रवाशांची संख्या मात्र भरमसाठ वाढते!”

“काहीतरीच काय? माझा नाही यावर विश्‍वास बसत. अरे, एक माणूस जरी वाढला तरी वजन वाढणारच ना? माणसं का बिनवजनाची असतात का?”

माझ्या प्रश्‍नावर झुरळ मिशा फिरवत मिशाळलं. “अहो मिस्टर, मी माणसांविषयी नाही तर.. आमच्याविषयी बोलतो आहे.” आणि ते मिशीतल्या मिशीत मॅश मॅश हसू लागलं.

“अहो, झुरळाची मादी एकावेळी किमान चौदा अंडी घालते. म्हणजे तुम्ही त्याला अंडी समजता.”

मी किंचाळतच विचारलं, “अंडी समजता म्हणजे? ती अंडी नसतात मग त्या काय पेपरमिंटच्या गोळ्या असतात?”

मॅशकन हसत झुरळ म्हणालं, “ती अंडी नसतात तर त्या अंड्याच्या पिशव्या असतात. आणि एका पिशवीत अनेक अंडी असतात. म्हणून तर प्रवास करतानाच आमची कुटुंबसंख्या ही झपाट्याने वाढत असते. लांबच्या प्रवासाला जर शोकडो कुटुंब निघाली तर प्रवास संपल्यावर हजारो कुटुंबं एकमेकांचा निरोप घेऊन दाही दिशांना पळत सुटतात. आम्ही एकदा उचललेला आमचा केसाळ पाय कधीच मागे घेत नाही (किंवा आम्हाला पाय मागे घेताच येत नाही, असं म्हणा हवं तर). आम्ही सारखे पुढे-पुढे जात असतो. ‘वस्ती तिथे गटार आणि गटारात व्हा पसार’ अशी आमच्यात म्हण आहे.”

“म्हणूनच आज जगभरच्या विमानात, बोटीत, ट्रकमधे, रेल्वेगाड्यात, जंगलात, ऑफिसात, बागेत, घराघरात, तळघरात, स्वरंपाकघरात, दुकानात, गोदामात, गटारात, संडासात, कचर्‍याच्रा ढिगात आमची अनेक साहसी कुटुंबे आनंदाने, सुखाने नांदत आहेत.”

“आम्हाला तुमच्याप्रमाणेच पुस्तकं खूप आवडतात.”

हे ऐकून मी चक्रावलोच, “म्हणजे तुम्हाला वाचता येतं?”

“अहो महाराज, वाचण्यासाठी नव्हे कुरतडण्यासाठी! उबदार दमट हवेत पुस्तकांच्या सहवासात त्याची कुरकुरीत पानं कुरतडताना काय झुरळानंद होतो, तो तुम्हा पुस्तकी माणसांना काय कळणार?”

आता मी काही बोलणार इतक्यात तेच म्हणालं, “तुम्हाला सकाळ संध्याकाळ काहीतरी खायला पाहिजे नाहीतर प्यायला पाहिजे.”

“अरे, कमाल आहे! आम्ही खातो पितो म्हणून जगतो.”

माझ्याकडे मिशा रोखत झुरळ म्हणालं, “अन्नाचा एक कणही न खाता आम्ही ९० दिवसापर्यंत उपाशी राहू शकतो. कारण आम्हाला बाह्यकवच असल्याने आमच्या शरीरातील द्रव्यांचे जास्ती बाष्पीभवन होत नाही. आणि शून्य अंश तापमानातही आम्ही चांगला तग धरू शकतो. म्हणून तर आता जगभर आमच्या ४००० जाती आहेत म्हंटलं!”

हे ऐकून तर मी अवाकच झालो.

“आमच्याप्रमाणेच तुमच्या घरात सहा पाय असणारी अनेक मंडळी राहातात. पण, त्या सर्वांपेक्षा पळण्यात आम्हीच फास्टम-फास्ट आहोत. रोज रात्री अपरात्री आम्ही तुमच्या अंगावरूनपण पळत जातो, पण तुम्हाला काहीच कळत नाही. आम्ही एका सेकंदात एक मीटरपेक्षा जास्त अंतर कापतो. याबद्दल तुम्ही आमचं नक्कीच कौतुक कराल”

“हो तर. व्वा! व्वा! ‘किटक ऑलिंपियाड’साठी तुम्हालाच पाठवलं पाहिजे.”

“अरे हो, सांगायचं राहिलंच की. आमच्यात तुम्हा माणसांसारखा भेदभाव नसतो. आमच्यातल्या पुरुषांना, बायकांना आणि मुला-मुलींना अगदी लहानपणापासूनच मस्त लंबेलांब टोकेरी मिशा असतात. आणि ते ही सर्वांना सारख्याच मिशा बरं का. म्हणजे तुमच्यासारखं हा मिशाळजी तो पिसाळजी असं नव्हे. सर्वांना फक्त दोन म्हणजे फक्त दोनच मिशा. ‘वळवळणारी मिशी देई सौंदर्य आणि खुशी’ असं आमच्यात म्हणतात ते काय उगीच नाही.”

“म्हणून तुमच्या मिशा नसलेल्या बायका मुली पाहिल्या की त्यांच्या नाकात मिशा घालाव्यात असं आम्हाला अनेकवेळा वाटतं.. पण हे सभ्यतेला धरून नसल्याने आम्ही तसं काही करत नाही, हा आमचा मोठेपणा तुम्हाला कळलाच असेल म्हणा.”

मी काही बोलण्याआधीच झुरळराव फास्टम फास्ट पळाले होते.

-राजीव तांबे

[email protected] 

गप्पागप्पी कोळ्याशी