किमान चारशे वर्षांचा क्रीडा इतिहास असलेला आणि खेळांमध्ये राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला भारत आज सामान्य पातळीवर खेळाबाबत किती जागृत आहे, हे पडताळण्याची वेळ आली आहे. स्वसंरक्षण, दुसरी वैयक्तिक क्षमता, तंदुरुस्ती आणि राष्ट्रप्रेम या संकल्पनांवर क्रीडा प्रकार आधारलेले असतात. पण त्यापलीकडे जाऊन भारताने क्रीडाविषयक जी जागरुकता दाखवली, ती इतर कुठल्याही देशाने दाखवली नाही. सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींच्या मल्लखांब, जोर, बैठका, ढाल-तलवारपासून आजच्या कबड्डी, खो-खो ते क्रिकेट, फुटबॉलपर्यंतच्या खेळामुळे भारताला खेळाची परंपरा आहे, असे म्हटले जाते. परंतु लहानग्यांपासून ते शालेय स्तरातील मुलांचे खेळाशी संबंधित जीवन आणि त्याचा त्याच्या शरीरावर आणि मानसिकतेवर होणारा परिणाम यावर ‘राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त’ प्रकाश टाकण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत सकारात्मक दृष्टी, आत्मविश्वास, स्वभाव, सामान्यज्ञान, समाजकार्य, मानसिक आणि शारीरिक विकास करणेही आवश्यक असते.

खेळांचे संस्कार

आपली युवा पिढी ही राष्ट्राची संपत्ती असते. त्यामुळे लहान वयापासूनच त्याच्यावर खेळाचे संस्कार करणे जरुरीचे आहे. ही पालकांची जबाबदारी आहे बरे! मुले स्वप्रेरणेने, स्वानुभवातून जास्त चांगल्या प्रकारे शिकतात. त्यामुळे खेळताना ती धडपडतील, तितकी जास्त कणखर बनतील. खेळाच्या माध्यमातून सांगायचे झाले तर मुले आपल्या अनुभवांचे निरीक्षण करतात, त्यांचे आकलन, विश्लेषण करायला शिकतात आणि त्यातूनच पुढे विचार करायलाही शिकतात. मुलांच्या खेळापासून, आपल्या परिसरातून आनंद शोधण्याची आणि उपलब्ध साधनांतून नवनिर्मिती करण्याची मानसिकता जोपासता येईल. असे झाले तर केवळ खेळांकडे नाही, तर जगण्याकडे बघण्याचा मुलांचा पूर्ण दृष्टीकोनही बदलू शकतो, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे.

तंत्रज्ञानाच्या अधीन आजची पिढी

ऐंशीच्या दशकात बाजारात व्हिडीओ गेम्स आले होते. ते लोकपिय झाल्याने मुलांच्या भावविश्वात त्यांना महत्वाचे स्थान मिळाले होते. गेल्या काही वर्षांत अशा खेळांनी लोकांना वेड लावले आहे. सुरुवातीच्या काळात इनडोअर खेळ खूपच प्राथमिक म्हणजेच बुद्धिबळ, पत्ते, कॅरम इत्यादी स्वरूपाचे होते. आता मात्र संगणकीय खेळांचा प्रभाव खूपच वाढलेला आहे. संगणकाच्या किमती कमी होत गेल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. संगणकाबाबत सांगायचे झाले तर संगणक ही आजच्या काळात आपल्या आयुष्यातील मुलभूत गरज बनली आहे. पण त्यात मनोरंजनाच्या हेतूने तयार केलेल्या खेळांच्या अधीन झाल्याने मुलांना भारतीय मैदानी खेळांचा विसर पडत आहे. त्यांच्या अशा वागण्याला पालकांकडून कळत-नकळत प्रोत्साहन मिळते. आणि मग मुले त्यांच्या आहारी जातात. संगणकीय खेळामुळे आज प्रत्येक मूल स्वतःपुरता विचार करून एकलकोंडे बनत चालले आहे. त्यामुळे त्यांच्यातील सांघिक वृत्तीचा विकास न होता स्वार्थी वृत्तीला खतपाणी मिळत आहे. खेळातूनच मुले भाषा आणि संवाद साधायलाही शिकतात. म्हणूनच खेळण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.

मुलांना प्रोत्साहन देताना -

  • मुलांचा खेळ गंभीरपणे घेणे
  • मुलांची खेळातील आवड जोपासणे
  • योग्य प्रशिक्षण, व्यायाम, सूर्यनमस्कार करायला लावणे
  • मुलांच्या अपयशात त्यांच्या पाठीशी उभे राहणे

त्याचप्रमाणे आपले पाल्य ज्या शाळेत शिकतात, त्या शाळेमध्ये खेळ या विषयाला किती महत्त्व दिले जाते, खेळाच्या तासाला नक्की कोणते खेळ घेतले जातात, याबद्दलची माहिती करून घेणे आणि जर खेळ घेतले जात नसतील तर शाळांना ते नियमित करायला लावणे, ही पालकांची जबाबदारी आहे. अशा प्रकारे मुलांमध्ये असणारी खेळविषयक आवड ओळखून त्याला उत्तम प्रशिक्षण द्यायला हवे.

मनोविकास आणि खेळ 

एकोणिसाव्या शतकात सिग्मंड फ्राॅॅईड नावाचे जर्मन मानसशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी मानवी मन जाणून घेण्यासाठी मनोविश्लेषण पद्धतीचा अभ्यास केला.  फ्राॅॅईड यांनी मुलांच्या क्रीडा विश्वाचा अभ्यास केला नसला, तरी मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी खेळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. खेळताना मुलांची मने मोकळी होतात आणि आपल्या मनात खोलवर दडवून ठेवलेल्या कितीतरी अबोल गोष्टी निष्पापपणे व्यक्त करतात. त्यात आईवडिलांबद्दलचा राग, घरातील कोणाचा तरी मृत्यू, येणारे पाहुणे, आजारपण, परीक्षेची भीती याचा त्यांच्या मनावर होणारा परिणाम याला प्रतिक्रिया देण्यासाठी ते वेगवेगळ्या युक्त्या करतात. खेळण्यावर व घरातील इतर वस्तूंवर आपल्या मनातील भीती काढतात. त्यांना येणाऱ्या त्रासदायक अनुभवांचा आणि त्यांच्याशी करावा लागणारा सामना यासाठी आंतरिक शक्ती लागते. ती शक्ती त्यांना खेळातूनच मिळते. म्हणजेच खेळ हा मुलांच्या शारीरिक, मानसिक, भाषिक आणि संबोधविषयक विकासातला एक महत्त्वाचा घटक आहे, हे समाजाने मान्य करायला हवे. काल्पनिक खेळ हीसुद्धा बालविकासातील महत्त्वाची पायरी आहे. शाळा – शाळा, घर- घर अशा प्रकारच्या खेळात वेगवेगळ्या भूमिका करणे, नातेसंबंध जोपासून त्याप्रमाणे वागणे, बोलणे याचा ते अनुभव घेत असतात.

आजही भारताच्या अनेक भागांमध्ये मुलींना दुय्यम स्थान असले तरी अनेक क्रीडा प्रकारात मुली आघाडीवर असल्याचे दिसून येते. आज आपण पी. टी. उषा (धावपटू), सानिया मिर्झा (टेनिसपटू), अंजली भागवत, सुमा शिरूर (नेमबाज) अशा अनेक महिला खेळाडूंची नावे अभिमानाने घेतो. पण आपल्या मुलींना क्रीडा क्षेत्रात यशस्वी करण्यामागची त्यांच्या पालकांची भूमिका कशी होती, याचा विचार कधीच केला जात नाही. मुलगा असो वा मुलगी दोघांनाही लहानपणापासून खेळाच्या बाबतीतही समान संधी मिळायला हवी. म्हणजेच पुढे जाऊन ‘ती’ ही समोर येणाऱ्या संकटासाठी तयार असेल.

सुरुवातीपासूनच मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण व्हायला हवी. १८८१ साली स्वामी विवेकानंद म्हणाले होते, “भगवद्गीतेपेक्षा फुटबॉल तुम्हाला देवाच्या आश्रयाला नेईल.” फुटबॉल हा स्वामी विवेकानंदांचा आवडता खेळ. खेळाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा, त्याने तुमचे मन आणि शरीर दोन्ही निरोगी आणि उत्साही राहील, हा त्यांचा विचार होता. स्वामीजींनी खेळाचे महत्त्व ओळखले आणि त्या दिशेने लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपण खेळाचे महत्त्व समजून घेऊन मैदानी खेळ खेळण्याचा निश्चय करू या.........

-ग्रीष्मा सबनीस

[email protected]