नमस्कार मित्रहो, मागील लेखात आपण स्पुतनिक -१ या मानव इतिहासातील पहिल्यावहिल्या यशस्वी कृत्रिम उपग्रहाविषयी माहिती घेतली. प्रस्तुत लेखात आपण या अवकाश स्वारीत मनुष्यासह इतर प्रजातींनी कशी मदत केली हे पाहूयात.

अवकाश स्पर्धा सुरू झाल्यानंतर जवळपास लगेचच या स्पर्धेने वेग घेतला. आकाशात रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह सोडल्यावर अमेरिकेची या स्पर्धेत एका अर्थी पिछेहाट झाली. ती भरून काढण्यासाठी अमेरिकेनेसुद्धा अनेक प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि आपला या स्पर्धेतील जोर कायम ठेवला. साधारण भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या वर्षापासूनच म्हणजेच १९४७ पासूनच अमेरिका आणि त्याचबरोबर रशियाने अनेक प्राणी अवकाशात धाडून अवकाशातील सूक्ष्म गुरुत्व आणि त्याचे जैवसृष्टीवर होऊ शकणारे परिणाम याचा अभ्यास सुरू केला. आजपर्यंत साधारण सात देशांनी विविध प्राणी आकाशात सोडून त्यांच्यावर प्रयोग केलेले आहेत, यामध्ये रशिया, अमेरिका, फ्रांस, अर्जेन्टिना, चीन, जपान आणि इराण या देशांचा सहभाग आहे. या देशांनी अवकाशात प्रयोगासाठी, माकडे, कुत्रे, कासव आणि तसेच विविध कीटक हे प्राणी अवकाशात सोडले आणि त्यांच्यावर अवकाशाच्या पोकळीचा होणार्‍या परिणामांचा अभ्यास केला. जवळपास प्रत्येक मोहीमच अभ्यास करण्याजोगी आहे; परंतु आपण काही निवडक मोहिमांची माहिती घेऊयात.

स्पुतनिक- १ प्रमाणेच स्पुतनिक-२ मध्ये एखाद्या प्राण्यावर प्रयोग करावेत असं ठरलं. त्यानुसार रशियाच्या संशोधकांनी, रस्त्यावर सापडलेल्या एका कुत्रीला निवडलं. या प्राण्याला निवडण्यामागचं कारण म्हणजे, तिचा आकार हा लहान होता आणि स्पुतनिक-२ या यानात ती योग्य रीतीने मावणारसुद्धा होती. वैज्ञानिकांनी तिला योग्य रीतीने प्रशिक्षण दिले. शास्त्रज्ञांचा प्राणी पाठवण्यामागे विचार हा होता की कोणताही जीव हा अवकाशात जिवंत राहू शकत नाही. त्यामुळेच हे प्रयोग मानवावर करण्याआधी जर एखाद्या प्राण्यावर केले तर मानवाचा जीव धोक्यात न घालता या परीक्षणाचे निकाल पडताळून पाहता येतील. त्याचप्रमाणे त्या वेळचे रॉकेट हे सुरक्षितपणे पृथ्वीवर आणले जाऊ शकेल. ३ नोव्हेंबर १९५७ साली हे स्पुतनिक-२ या कुत्रीला घेऊन अवकाशात झेपावले. या प्राण्याचे नाव लायका, तिने सहा दिवस जिवंतपणे पृथ्वीच्या अनेक प्रदक्षिणा मारल्या; परंतु सहाव्या दिवशी मात्र त्या यानातील ऑक्सिजन संपुष्टात आल्याने आणि यानातील उष्णता प्रचंड वाढल्याने या लायकाने अवकाशातच जगाचा अंतिम निरोप घेतला. २००८ साली याच्या स्मरणार्थ रशियाने मोस्कोजवळ एक स्मारक उभारले. लायकाचे जीवनदान हे अवकाश स्पर्धेत नेहमीच मोलाचे आणि अविस्मरणीय ठरेल.

रशियाप्रमाणेच अमेरिकेनेसुद्धा आकाशात प्राणी पाठवले. पहिला अवकाशात गेलेला एप प्रजातीय प्राणी म्हणजे आल्बर्ट नावाचे माकड. हा आल्बर्ट हा अवकाशात जातानाच हवेच्या कमी दाबामुळे गुदमरून मृत्यू पावला. त्यानंतर अमेरिकेने अल्बर्ट - २,३,४,५ असे अनेक एप अवकाशात पाठवले; परंतु काही अवकाशातच मृत्यू पावले तर काही जमिनीवर उतरताना रॉकेट आदळून मेले. त्यानंतर मात्र योरिक ज्याला ‘आल्बर्ट-६’ असेही म्हटले जाते हे माकड २० सप्टेंबर १९५१ रोजी आपल्या ११ उंदीर साथीदारांसोबत सुखरूप जमिनीवर उतरले आणि अखेर यशस्वी झाले.

या अवकाश मोहिमांमध्ये आजवर सुमारे ३५-४० एप माकडे, असंख्य उंदीर, कीटक आणि इतर काही कुत्रे मानवाने सहभागी करून घेतले. परंतु तंत्रज्ञानाचा अभाव आणि अवकाशाचे एकंदरच अज्ञान यामुळे, यापैकी बहुसंख्य प्राणी हे अवकाशात किंवा पृथ्वीवर परतत असताना मृत्यू पावले. परंतु असे असूनसुद्धा या प्राणीजनांनी आपली अवकाशाची असलेली माहिती आणि ज्ञान वाढीस लागण्यास अत्यंत मोलाचा हातभार लावलेला आहे. अमेरिका, रशिया यांसारख्या देशात या प्राण्यांची स्मारके आणि त्या संबंधीची संग्रहालयेसुद्धा आहेत. त्याचप्रमाणे  या प्राण्यासंबंधी इंटरनेटवर अनेक उत्तम माहितीपट उपलब्ध आहेत. सर्वच फारच चित्तवेधक आहेत. अवकाश मोहिमांविषयी अधिक माहिती घेऊन पुढील लेखात भेटू. तोपर्यंत तुम्हीही अवकाश मोहिमांविषयी अधिक माहिती मिळवत राहा.

-अक्षय भिडे 

[email protected]

 

"अवकाश मोहिमा" ज्या विषयाने एकंदरच मनुष्य आणि विज्ञान यांच्या प्रगतीत फार जास्त मोलाचा हातभार लावला आहे , त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अवकाश स्पर्धा मालिकेत.
अवकाश स्पर्धा भाग १ – “बीप बीप” – स्पुतनिक -१ !!!