पाकिस्तानने १९७१च्या युद्धात, पहिल्याच दिवशी फाजिल्का सेक्टरच्या खुशकीच्या मार्गाने भारतावर हल्ला केला. या रणसंग्रमात जाट रेजिमेंटच्या तुटपुंज्या सैनिकांनी जो पराक्रम केला तो या युद्धभूमीच्या कणाकणात भरला आहे. या भागात पाकच्या हजारो सैनिकांनी एका मोठ्या क्षेत्रफळावर अंधाराचा फायदा व बेसावध सैन्याचा फायदा घेत कब्जा केला. पाकसेना साबूना बांधापर्यंत पोहोचली. या हल्ल्यात पाकिस्तानने १५०० जवान, ३० रणगाडे व १०० पेक्षा जास्त तोफा इतकी प्रचंड १३ लॅन्सर्स ब्रिगेड उतरवली होती.

या आव्हानात्मक पण अचानक हल्ल्यास उत्तर देण्यास सरसावले फक्त १५० जाट रेजिमेंटचे बाशिंदे. या १५० जाट जवानांनी इतकी कडवी झुंज दिली की, पाकिस्तानी सैन्याचे निम्मे जवान गारद होऊन दोन दिवसांत पाकी फौजेला बेरिकला पुलाच्या पलीकडे फेकले. पाकी सैन्याला फाजिल्काच्या वेशीपासून कोसो मैल दूर अडवले. फाजिल्का काबिज करण्याचे पाकचे मनसुबे धुळीस मिळवले. जाट रेजिमेंटचे ८४ जवान हुतात्मा झाले. उरलेले जायबंदी झाले.

यानंतर जाट रेजिमेंटच्या मदतीला आली १५ राजपूत बटालियन आणि उरलेल्या जाट शिलेदारांसह राजपूतानी नुसते पाकी फौजांना पिटाळत लावून पाकिस्तानच्या भूमीवर कब्जा केला आणि इतिहास रचला. युद्धाच्या समाप्तीनंतर या शूरवीर जवानांच्या स्मरणार्थ आसफवासा या हिंदुस्थानी गावातील ग्रामस्थांनी हा रणसंग्राम झाल त्या भूमीवर ८१ फूट रुंद चिता रचून या वीरांच्या पवित्र देहावर सामूहिक अंतिम संस्कार तर केलेच; शिवाय या सर्व प्राणार्पण केलेल्या जवानांचे फोटो लावून गौरव केला. तेथे दर वर्षी मोठा आदरांजली समारोप ग्रामस्थ भरवतात. आज सीमेलगतच्या भागात येणारा प्रत्येक पर्यटक हे समाधीस्थान डोळे ओलेचिंब करून म्हणतो, ‘They have given their today for your better tomorrow’. जरा याद करो कुर्बानी.

-कॅप्टन विनायक अभ्यंकर

[email protected]

विविध युद्धांमध्ये उत्तम कामगिरी करणार्‍या भारतीय वीर योद्धांच्या पराक्रमाच्या कथा सांगणार आहेत कॅप्ट. विनायक अभ्यंकर ‘वीर कथा ’ या सदरातून.

अभिमन्यूचा वारसदार