कल्याणदादाने जुईला रक्षाबंधनाला एक फुलांचा ताटवा भेट देण्याचे ठरवले. डोक्यात नुसता विचार चमकून गेला तरी मन कसे सुगंधित झाले. अवतीभवती प्रसन्नता दाटली.

मे महिना चालू होता. कामाला लवकर सुरुवात करायला हवी होती. कारण आता पाऊस सुरू होईल आणि आपल्या सोबत हिरवी स्वप्ने घेऊन येतील. त्यामुळे आता बसून चालणार नव्हते. घराच्या गच्चीचे निरीक्षण केले. बागेची माहिती असणाऱ्या मित्रांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. त्यातून बरेच काही ठरले. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. स्वतःपासून, स्वतःच्या घरापासून, आजूबाजूच्या घरांपासून, जवळच्या सोसायट्यांपासून कामाला सुरुवात केली. रोज फक्त अर्धा तास, प्रत्येकाच्या देवघरातील निर्माल्यातील फुले गोळा करणे. आपल्या निर्माल्याचा परस्पर प्रश्न मिटतो आहे, म्हटल्यावर लोक स्वतःहून कल्याणला मदत करू लागले. रोज पाच किलो इतका फुलांचा कचरा गोळा होऊ लागला.

कल्याणने आपल्या गच्चीवर एक वीत उंचीचा मातीचा थर दिला. त्यात वाफे तयार केले. त्यात शेणखत, गांडूळखत टाकले आणि त्या मिश्रणात फक्त झेंडूची फुले चुरगळून पुरली. बाकी फुले खतासाठी वापरण्यात आली. ते खत सोसायटीतील लोक आपल्या कुंड्यांमधील रोपांसाठी वापरू लागली. तेही अगदी मोफत. कचऱ्याची कमाल दुसरं काय! हळूहळू गच्चीच्या मातीत झेंडूची छोटी छोटी रोपे डोलू लागली. रिमझिम पडणारा पाऊस, आवश्यक ते वातावरण यामुळे रोपे जोमाने वाढू लागली. दोन महिन्यात प्रत्येक रोपावर वीसेक कळ्या डोकावू लागल्या. वाऱ्यावर डुलणाऱ्या त्या बागेचे मोहक दर्शन मन सुखावत होते. आता छोटी छोटी केशरी, पिवळी, गोंडेदार फुले हसून स्वागत करू लागली. ज्याला कळेल तो गच्चीवरील कमाल पाहायला येऊ लागला. गच्ची एकदम देखणी दिसत होती. पिवळेधम्मक गोंडे हसून प्रत्येकाला खुणावत होते. प्रत्येकाच्या मनात ताटवा उमलून येत होता. पिवळेच पण किती त्या रंगछटा मनाला मोहवीत होत्या. 

अखेर रक्षाबंधनाचा दिवस उजाडला. जुईने कल्याणदादाला राखी बांधली. औक्षण केले व गिफ्टची वाट पाहू लागली. दादा म्हणाला, ‘गिफ्ट आहे, पण ते या छोट्या ताटात मावणार नाही.’ जुईची उत्सुकता आणखीनच ताणली गेली. दादा तिला घेऊन गच्चीवर गेला. गच्चीच्या दारातूनच घमघमाट सुटला होता. दार उघडताच गच्चीतील फुलांचा ताटवा जुईचे स्वागत करत होता. “हेच तुझे गिफ्ट” असे म्हणताच जुई जणू ताटव्यातील एक फूलच होऊन गेली. ‘दादा तू किती ग्रेट आहेस रे!’ असे सहजोद्गार तिच्या तोंडून बाहेर पडले.

आता जुईची पाळी होती दादाला वचन देण्याची. ‘दादा तुझे हे काम आता मी पुढे नेणार. जुई आणि तिचे मित्र-मैत्रिणी जोमाने कामाला लागले. त्यांनी प्रथम आपले सर्व सणवार, व्रतवैकल्य यांची यादी केली. त्यानंतर नदीकाठचे निरीक्षण केले. फोटो काढले. त्यावरून काही निष्कर्ष काढले. वर्षभरात फक्त पंधरा दिवसच नदी भरून वाहत असते, असे त्यांच्या लक्षात आले. इतर वेळेस तर ती फक्त ड्रेनेजच असते. अगदी तिचे हे किळसवाणे रूप पाहवत नाही. त्यावरच उपाय करण्याचे काम सुरू झाले. मधोमध नदी वाहते. तिच्या दोन्ही काठांवर रोपांसाठी छोटे छोटे चर खणून वाफे तयार केले. स्वच्छता केली गेली. जुई व तिच्या मित्रांनी न थकता, न थांबता कामाला सुरुवात केली.

सणावारांना, व्रतवैकल्यांना गोळा होणारा फुलांचा कचरा ते या वाफ्यांमध्ये जिरवू लागले. खत व पाण्याची व्यवस्था आपोआप होत होती. हळूहळू नदीचे दोन्ही काठ हिरव्या चिमुकल्या रोपांनी सजू लागले. येणारे-जाणारे उत्सुकतेने थांबून पाहू लागले. काही आजी-आजोबा मुलांच्या मदतीला धावून आले. काही महिन्यातच रोपांवर विविधरंगी फुले उमलू लागली. फुलांकडे पाहून लोकांनी नदीत कचरा टाकणे बंद केले. नदीच्या रस्त्याने जाणाऱ्यांना फुले सुगंध देऊ लागली. देवाचे निर्माल्य सत्कारणी लागले. कचऱ्याची समस्या फुलांच्या रूपात आनंद देऊ लागली. म्हातारी-कोतारी माणसे या पर्यावरणप्रेमींच्या गालावरून हात फिरवू लागली. प्रेमाने कानावर बोटे मोडून कौतुक करू लागली. “किती शहाणी मुले! देवाचे काम आवडीने करतायेत. असेच देवाच्या आवडीचे काम करण्याची सुबुद्धी देवा सर्वांना दे.”                                            

                                                                    -सुनिता वांजळे

[email protected]