भुई आमरी, टेटू , बिबा
कालच्या भागात आपण हरणडोडी, सीतेची वेणी, तेरडा,कळलावी अशा अनेक दुर्मिळ रानफुलांची माहिती घेतली. अधिक रानफुलांविषयी माहिती घेऊ आजच्या लेखात. 
 
पावसाळी फुले यावर बोलायचं आणि रानहळदीच्या फुलाचा उल्लेख न येणं म्हणजे जेवणात मीठ नसल्यासारखे होईल. हिरव्या गुच्छात ही फिकट गुलाबी पिवळी फुले अत्यंत उठून दिसतात. गौरीचे हात म्हणून याचा गौरीपूजनात वापर केला जातो. कृष्णसखा कदंबदेखील याच काळात फुलतो. पिवळसर झाक असणारे असंख्य पांढरे चेंडू झाडाला लगडलेले असतात. कदंबाचे एक फूल पाहिले तर अतिशय छोटे, पण अशी असंख्य छोटी छोटी फुले चेंडू भोवती अतिशय सुंदर पद्धतीने रचून तो सफेद चेंडू तयार केलेला दिसतो. बकुळीला वर्षभर फुले येत असली तरी पावसाळ्यातील फुले आकाराने मोठी, रंगाने अधिक शुभ्र आणि अधिक सुगंधी असतात असा माझा तरी अनुभव आहे. एकदान्डीची छोटी सफेद फुले म्हणजे फुलपाखरांची मधुशाळाच. कवळा म्हणजे स्मिथियाला येणारी पिवळी मिकीमावूसच्या तोंडाच्या आकाराची छोटी छोटी फुले गणपतीच्या काळात फुलतात त्याचा सडा पाहन्यासारखा असतो. 
 
विदेशी असली तरी आता आपल्याकडे विशेष जम बसवलेली घाणेरीदेखील पावसात विशेष बहरते. याची रंगीबेरंगी छोटी छोटी फुले विशेष लक्ष वेधून घेतात . रानमोडी नावाची पांढऱ्या रंगाची फुलेदेखील गणपतीच्या काळात फुलायला लागतात, तर कोसमोस नावाची काहीशी झेंडूसारखी दिसणारी, पण पाकळ्यांची एकाच रिंग असणारी फुलेदेखील नजर खिळवून ठेवतात. घाणेरी, राणमोडी आणि कोसमोस तिन्हीमध्ये मोठ्या प्रमाणावर मधू असतो, त्यामुळे फुलपाखरे आणि इतर कीटक त्यावर रुंजी घालत राहतात. 
 
पावसाचे मुख्य आकर्षण असणारी आणि साधारण ९ वर्षातून एकदा फुलणारी काहीशी जांभळी झाक असणारी कारवीची फुले म्हणजे निसर्गाची अद्भूत किमयाच. सोनकी, खुरासणी यांची पिवळी धम्मक फुले आपले योगदान देत असतात. अनंताच्या कुळातील डिकेमाळीदेखील पावसाळ्यात बहरते. असंख्य चांदण्या झाडाला लगडल्याचा भास होतो. बिब्ब्याला येणारी छोटी छोटी चमकीच्या आकाराची फुलेदेखील फार सुंदर दिसतात. मुळात उन्हाळ्यात उमलणारा सफेद कुड्या पावसात देखील लेटलतीफसारखा फुलत राहतो. त्याची शुभ्र फुले हिरव्यागार पानात शोभून दिसतात. साताऱ्याचे कास पठार तर असंख्य फुलांनी भरून जाते. तुतारी, सोनकी, गवळण, कुमुदिनी, मुरडानिया, तेरडा, स्मिथिया, वर्गमूळ, वेगवेगळ्या भुई आमरी, हलुंदा, सिरोपेजीया म्हणजे कंदील पुष्प, कीटकभक्षी, टोपली कारवी अशी असंख्य फुले तेथे फुललेली असतात. 
 
पावसाळी फुले म्हटली की भोपळावर्गीय फुलांचा उल्लेख आला नाही तर नवलच. भोपळावर्गीय पिकांची आता आपण शेती करीत असलो तरी त्याच्या जंगली जाती अजूनही सापडतात. मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने पावसाळ्यात यांना फुलांचा आणि फळांचा बहर येतो. रान पडवळीची पांढऱ्या रंगाच्या काहीशा चांदणीच्या आकाराचे फुल खूप सुंदर दिसते. जंगली तोंडलीलादेखील सफेद रंगाची भोंग्याच्या आकाराची फुले येतात. या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे पाकळ्यांवरील शिरा हिरव्या रंगाच्या असतात, त्यामुळे सफेद रंगावर त्या खूप छान दिसतात. करटूली, जंगली शिराळी आणि घोसाळी यांना येणारी पिवळी धम्मक फुले म्हणजे निसर्ग सौंदर्याचा सुंदर अविष्कारच. रानभेंडीची पिवळी धम्मक फुले म्हणजे कीटकांची मधुशाळाच. गोक्षुराची दृष्ट लागावी अशी सुंदर नाजूक छोटी फिकट गुलाबी रंगाची फुले या वन सौंदर्यात भर घालत असतात. अंबाडीची राणी रंगाची मोठी फुले फुले म्हणजे डोळ्याचे आणि जिभेचे चोचले पुरवण्या कामी येतात कारण ती दिसतात तर छान आणि चवीला आंबट... डोळेही खूश आणि जीभही. दशमुळातील एक टेटू म्हणजेच शोनक याला देखील फक्त पावसातच फुले येतात याचे फूल आकाराने मोठे, भोंग्यासारखे आणि आतून फिकट पिवळा तर बाहेरून तांबड्या रंगाचे दिसते. कवदार म्हणजे रानकेळी हीदेखील पावसाळ्यातच उगवते आणि फुलते इतर वेळी तिचे कंद सुप्तअवस्थेत असतात. रानकेळीला आपल्या नेहमीच्या केळीसारखीच फुले येतात, पण ती फार क्वचित त्यामुळे दर्शन दुर्लभ. कडूकंदाच्या वेलीला येणारी छोटीछोटी गुलाबी, करडी फुले दाराला तोरण बांधाव तशी वेलीवर रचलेली असतात. 
 
जंगल जसं फुलांनी बहरतं, तसंच अनेक प्रकारच्या फुलपाखरांनी देखील ते पावसाळ्यात समृद्ध होतं. खाद्य वनस्पतींची मुबलक उपलब्धता आणि मधुरसयुक्त रंगीबेरंगी फुलांची उधळण यांमुळे अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरे पावसाळ्यात पाहायला मिळतात. डेनायीड एगफ्लाय, कॉमन ग्रास यल्लो, कॉमन एमिग्रंट, ब्लु टायगर, ग्लोसी टायगर, कॉमन लेपर्ड, ब्लुस प्रकारातील फुलपाखरे, कॉमन जे, कॉमन क्रो, प्लेन टायगर, कॉमन मायीम, कॉमन रोझ अशी अनेक फुलपाखरे या काळात मोठ्या संख्येने आढळतात. फुलपाखारांप्रमाणेच पावसाळ्यात पतंगही मोठ्या प्रमाणात आढळतात. ते जास्त करून रात्री उडतात. हे सगळे कीटक जंगलातील अनेक वनस्पतींवर अवलंबून असतात.
 
जंगल पावसाळ्यात बहरतं, बोलत, नाचत आणि नाचवतोही. पटकन लक्षात येतील अशाच फुलांचा मागोवा यात घेतला गेलाय, ही फुलांची उधळण अशीच पाहाता यावी अशी इच्छा असेल तर गरज आहे जंगल वाचण्याची, वनस्पतींचा नैसर्गिक अधिवासाच्या रक्षणाची आणि मुख्य म्हणजे सजग पर्यटनाची. अनेक हौशी पर्यटक एखाद फूल चांगलं दिसतंय म्हणून त्याचे रोप मुळासकट उपटून घरी लावण्यासाठी आणतात, त्याच्या या कृतीमुळे स्थानिक जैवविविधतेवर ताण येतो किंबहुना ती नष्ट होण्याची भीतीदेखील निर्माण होते. त्यामुळे पूर्ण माहिती असल्याशिवाय या फांद्यात पडून निसर्गात नको ती लुडबुड आपण करू नये. तर मग चला निसर्गात जावूयात, निसर्ग वाचूयात आणि वाचवूयात देखील.
काही रानफुलांची छायाचित्रे :
 
रानभेंडी 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
डिकेमाळी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
घाणेरी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
रानहळद

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
करटूली

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
बकुळी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
-भरत लक्ष्मण गोडांबे
(वनस्पती अभ्यासक)