सीतेची वेणी , हरणदोडी, तेरडा, कळलावी
हिरवे हिरवे गार गालीचे
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणी ही खेळत होती...
बालकवींच्या 'फुलराणी' कवितेतील या ओळी ऐकल्या की, मन थेट धाव घेते ते फुलाफुलात.. निसर्गात वर्षभर असंख्य फुले फुलतात; पण पावसातील रंगोत्सव काही औरच...पावसाची चाहूल लागली की, वसुंधरा जणू सज्ज होते निसर्गाकडून आपला शृंगार करून घेण्यासाठी. निसर्ग देखील आपल्या जादूच्या पोतडीतून वेगवेगळी फुले, पाने , फुलपाखरे, कीटक एक ना दोन सगळ्याच गोष्टींची मुक्त हस्ताने उधळण करून वसुंधरेचा शृंगार करतो. सिमेंटच्या जंगलात हे सहज जाणवत नसलं तरी प्रत्यक्ष खऱ्याखुऱ्या जंगलात गेलात तर हे प्रकर्षाने जाणवतं. इतर वेळी बोलणार जंगल आता हसत असतं, नाचत असतं आणि गातदेखील असतं तेही वेगवेगळ्या फुलांच्या माध्यमातून. 
 
पावसाळा; तीन ऋतूमधील एक अत्यंत महत्त्वाचा ऋतू. उन्हाच्या लाहीने तापलेल्या धरणीला शांत करण्यासाठी नव्हे तर तिच्या गर्भातून विविधरंगी वनस्पती आणि फुले यांचा खजानाच बाहेर काढण्यासाठी जणू मदत करणारा ऋतू.
 
पाऊस सुरू झाला की, सगळीकडेच हिरवेगार होते. डोळ्यांना शांतता प्रधान करणाऱ्या या रंगासोबतच मनाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींना येणारी रंगीबेरंगी फुले या सौदर्यात आणखीन भर घालतात. एका अर्थाने जणू पुष्पौत्सवच सुरू होतो. तशी वर्षभर वेगवेगळी फुले उमलत राहतात; पण पावसाळ्यात येणारी फुले अधिक आकर्षक ठरतात. कारण विपुल पाण्यामुळे सगळीकडे फुलेचफुले दिसत असतात. अगदी छोट्या म्हणजे भिंग घेऊन पाहिलं तर त्यांची रचना दिसेल इथपासून तर हातभार मोठ्या फुलांपर्यंत अशी वेगवेगळ्या आकारात फुले निसर्गात पाहायला मिळतात. अशी फुलाफुलांची उधळण पाहताना आणि समजून घेताना विशेष आनंद होतो. शिवाय प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा, काहींचा मनाला प्रसन्न करणारा तर काहींचा अत्यंत घाण; नकोसा वाटणारा.
 
पावसाळ्याचा सुरुवातीला उमलणारी शेवळाची फुले, सुरणाची फुले यांची करडी, तांबडी, गुलाबी आणि पिवळी अशी रंगसंगती छान दिसते; परंतु त्याचा गंध हा अतिशय घाण, नकोसा वाटणारा. याच काळात पानकुसुमाची शुभ्र नाजूक फुले, सफेद मुसळीची छोटी सफेद फुले आपली हजेरी लावून जातात. दिंड्याला पांढऱ्या रंगाची पिटुकली फुले येतात, त्यातील मधुपान करण्यासठी फुलपाखरे आणि मधमाश्या यांची जणू शाळाच भरते. आपल्या लालचुटूक रंगाने लक्ष वेधून घेणारी गणेशवेल एव्हाना फुलायला सुरुवात झालेली असते. सीतेची वेणी नावाची आमरी म्हणजे जंगली ऑर्किड याच काळात फुलते. फिकट गुलाबी ते गडद गुलाबी अशी रंगसंगती असणारी छोटी छोटी फुले गजरा गुंफावी तशी एका दांडीवर गुंफलेली असतात. हरणदोडीची हिरव्या रंगाची फुले छोटीछोटी फुले गुच्छात फुलतात. काळी मुसळीदेखील याच काळात फुलते. त्याची इटुकली पिटुकली जमिनीलगत येणारी पिवळी फुले छान दिसतात. 
 
कुर्डूची बाणासारख्या फुलांचा गुच्छ देखील माळरानात फुलायला सुरुवात होते. हिरव्या पानांत असे फिकट गुलाबी गुच्छ उठून दिसतात.त्यावर देखील मधुपानासाठी फुलपाखरांची सरभर सुरु असते. सफेद, गुलाबी, फिकट गुलाबी, जांभळा अश्या वेगवेगळ्या रंगात उमलणारा तेरडयाने आपले लक्ष वेधून घेतले नाही तर नवलच. माळरानावर याचे अक्षरशः कारपेट सारखे चित्र पाहायला मिळते. एकाच वेळी सगळा तेरडा बहरतो आणि रंगांची उधळण करतो. 
 
आपली विशिष्ट रचना आणि गडद रंग यामुळे अगदी कुठेही उठून दिसणारी अग्निशिखा म्हणजे कळलावीची फुले म्हणजे निसर्गाच्या रचनेचा एक सुंदर नमुनाच किंबहुना जहरी सौंदर्य. भडक लाल आणि पिवळा रंग यामुळे हे फुल दुरून अगदी सहज ओळखता येते. जेष्ठा गौरीपूजनात याचा वापर केला जातो. निळी, पिवळी तिळवनिची छोटी छोटी फुलेदेखील सृष्टी सौदर्यात आपला खारीचा वाटा उचलत असतात. बोनकळी म्हणजे पेवला येणारी पांढरी शुभ्र फुले इतकी नाजूक असतात की त्यांना आपला स्पर्श झाला तरी मळतील नि मोडतील की काय अशी भीती वाटते. त्याच्या लाल भडक गुच्छात ही पांढरी फुले शोभून दिसतात.
 
शेवळ 


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पिवळी तिळवण
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कुर्डू
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
काळी मुसळी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
गणेशवेल
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
दिंडा
 
 
 
 
 
 
 
अशाच आणखी दुर्मिळ रानफुलांविषयी माहिती घेऊ उद्याच्या लेखात.
                                                                           (क्रमशः)
 
-भरत लक्ष्मण गोडांबे
वनस्पती अभ्यासक