‘जे न देखे रवि, ते देखे कवि’ असं म्हणतात ते अगदी खरं आहे. भौतिकदृष्ट्या अस्तित्वात असणार्‍या, दिसणार्‍या सर्व गोष्टी सूर्यदेव आपल्याला दाखवतात, पण त्या पलीकडचे काल्पनिक किंवा कल्पनातीत (कल्पनेपलीकडचे) जग पाहाते कवीचे संवेदनशील मन. हा मनाचा प्रवास असल्याने कवी, गीतकार असे सुप्रसिद्ध ‘विंदा’ म्हणजेच विं.दा. करंदीकर बालकविता लिहिताना मनाने सहज बालमनाचे होतात व त्यांच्या विश्‍वात जाऊन विचार केल्यावर लॉजिक म्हणजे तर्काचा कित्येकदा संबंध नसतो. पण या कविता वाचताना ते अनेक माणसांच्या स्वभाव विशेष पशुपक्ष्यांच्या, परीराणीच्या रूपकातून मांडतात. विंदांचे ‘राणीची बाग’, ‘सशाचे कान’, ‘अजबखाना’, ‘परी ग परी’, ‘एकदा काय झाले’ असे अनेक बालकविता संग्रह प्रसिद्ध झाले. ‘एटू लोकांचा देश’ हा कविता संग्रह! एटू देश त्यातील घडामोडी हे पूर्ण कल्पनाविलास मांडणारे विश्‍व. न पूर्ण होणार्‍या सुखावह कल्पना सत्यात दिसल्या नाहीत तरी कवितेत मांडताना विंदा दिसतात. 'अजबखान्यात कावळा', ‘हुंडयाच्या तीन पैशात कापड’, ‘पापड आणि घर’ अशा उंच कल्पनेत रमतो.

बेडूक नावाच्या विद्यार्थ्याला संस्कृत येत नाही

पण तालीम मास्तर म्हणाले,

भलतीच तयारी

पोहण्यामध्ये आहे

सगळ्यांनाच भारी!

असे म्हणत. सकारात्मकता शिकवून प्रत्येक मुलाची वेगळी बलस्थाने आहेत ती पाहा! असेच सांगत असतील नाही का?

कल्पनाविलासात विंदांच्या परीच्या घरी मांजर स्वैपाकी आहे, उंदीर श्रीखंडपुरी खातो आहे, पोपट हरीहरी म्हणतो आहे आणि विंचू मात्र पहार्‍याला ठेवला आहे.

पैशाच्या या दुनियेचा फोलपणा कल्पनेतल्या आटपाट नगरात नाही. 'तेथे नाही चालत नाणी, एक शेट गुळासाठी दहा-बारा गाणी' मग म्हणता 'इथे सुटी नाही बाळा, सांग कशी सुटी असेल, जर नाही शाळा.' राणीच्या बागेत कोल्ह्याला चतुर ठरवताना त्याच्या दुधात पाणी आहे फार असं म्हणतात.

अतिशयोक्ती हा अलंकार वापरताना कुंभकर्ण कवितेत त्याला डोंगराची उशी, वादळाचा वारा आहे, पण तरीही घामाच्या धारा इतक्या की, त्यातून निर्माण झालेल्या नदीनाल्यात कितीतरी लोक बुडून गेले म्हणे. मग रावणाने त्याला उठवण्यासाठी त्याच्या नाकात तोफ डागली तेव्हा झोप उडाली, पण कुंभकर्ण इतका झोपाळू त्यांच्या स्वप्नातही झोपच आली.

‘सात एके सात’ यात यात्रावळ भागात पंढरपूर यात्रेची तयारी, घडमाळवी संत, संत कोल्होबा, पंढरपुरी पंडित, वेडंभट अशा कविता आहेत आणि वारी टाळून भलतंच करणार्‍या भक्तांची वर्णनं.  उडाणटप्पू कवितेत ते म्हणतात, 'विठ्ठलच त्याची जणू वाट पाहतोय कधी याला उपरती होईल. संत घड्याळजी कवितेत द्वर्थी योजनेने गजर शब्द वापरला आहे. घड्याळाचा गरज व पांडुरंगाच्या नामाचा गरज अशी शब्दरचना शेवटच्या कडव्यात दिसते. ‘सही’ कवितेत भोळा छोटा भक्त विठोबाला सही मागायला जातो आणि मग विठोबा म्हणतो मजेत, देवांना नाही लिहायला येत’ असा अल्लड, निष्पाप विचारही विंदा मांडतात.

यात पावसावळ भागात 'पाहुणी; कवितेत विंदा ‘आला भेटीला की धरता वेठीला’ ही मनोवृत्ती दाखवताना हुशार कावळा पावसात पाहुण्या आलेल्या चिमणीला म्हणतात, ‘आजचा पाऊस दिसतो बरा, चिऊताई चिऊताई स्वैपाक करा.’

स्वप्नामध्ये पडला पाऊस या कवितेत नातू आणि आजी-आजोबा यांचं सुंदर नात विंदा मांडतात. आईबाबा गारा खातात. आजोबा दात लावून गारा वेचायला धावतात, आजी खाटेवरून ओरडते आणा, आपण गारा कुटून खाऊ पण नातू म्हणतो,

‘मला वाटते भिती फार, पडसे बिडसे झाले तर!

म्हटले ओरडून याद राखा, उन्हामध्ये बांधिन घर’

एरवी काळजीपोटी ओरडणार्‍या आजोबांना नातू अशी प्रेमळ परतफेड करतो.

एकदा काय झाले संग्रहात ‘पाच बुडकुल्यांतला स्वैपाक’ कवितेत लहान मुलींची संसारगाथा विंदा सांगतात. लहानपणी बढाचढाके बोलणार्‍या मुलांसाठी सुंदर कविता 'बाताराम', तो शेवट कवितेत म्हणतो मीच माझ्या आजोबांना शिकवली संध्या, अशा प्रकारे गंमत करीत अतिशयोक्ती हा अलंकार वापरीत मुलांना गुदगुल्या करीत शिकवण देणारे बालसाहित्य विंदा देतात.

दुसर्‍याच्या वैगुण्यांवर बोट ठेवू नये व आपल्या कर्तृत्वातून मोठेपण दाखवावे हे रूपकांत ‘खुर्ची आणि स्टूल’ कवितेत पंख्याबरोबर ही रूपके मांडून ते सांगतात.

बाळांपासून मोठ्यांपर्यंत उत्तम, उद्बोधक, वाङमययुक्त असे लेखन करणारे विंदा एक उत्तम बालकवी होत हेच खरे.

- अ‍ॅड. पद्मा गणेश गोखले

[email protected]