भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली, असली तरी इंग्रजांचे भारतावरील आक्रमण हे इतरांपेक्षा खूपच वेगळे होते. इतर आक्रमक भारतात आल्यानंतर त्यांच्या मूळ देशाशी त्यांचे असलेले संबंध जवळपास संपुष्टात आले. मात्र इंग्रजांनी इथे सत्ता स्थापन केल्यानंतरही त्यांचे इंग्लंडशी असलेले संबंध केवळ अबाधितच नव्हते, तर सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून तर नंतर थेट इंग्रज सरकारच्या माध्यमातून ते अधिक भक्कम केले गेले. त्यामुळे हे केवळ राजकीय नव्हे तर इंग्लंडच्या फायद्यासाठी इंग्रजी संस्कृती भारतावर थोपवणारे सामाजिक व सांस्कृतिक असे सर्वव्यापी आक्रमण होते. 

साधारण १७६५ साली ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराबरोबरच राज्यकारभार सुद्धा करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात भारतातील प्राचीन शिक्षणव्यवस्था अबाधित ठेवण्याकडे त्यांचा कल होता. मात्र ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही भारतीय अधिकाऱ्यांनी कंपनीने शिक्षणात लक्ष घालावे अशी विनंती केल्यामुळे कंपनीने १७८१ मध्ये कलकत्ता येथे एक मदरसा, तर १७९१ मध्ये बनारस इथे एका संस्कृत विद्यापीठाची सुरुवात केली. ही विद्यापीठे स्थापन करताना भारतीय माणसांना शिक्षण मिळावे हा जसा हेतू होता, तसाच इंग्रजांना भारतातील प्राचीन सामाजिक परंपरा समजाव्यात हा सुद्धा होता.

१८१३ मध्ये शिक्षण व्यवस्थेत काही बदल घडवून आणणारा कायदा तयार केला गेला. त्यानुसार आत्तापर्यंत शिक्षणासाठी किरकोळ आर्थिक मदत करण्याची असलेली भूमिका बदलून कंपनीने शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वत:कडे घेतली. त्यानुसार ज्ञाननिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या जुन्या पुस्तकांचे पुनर्जीवन करणे, नवीन पुस्तके लिहिणे, सुशिक्षित लोकांना विविध संधी उपलब्ध करून शिकण्याचा उत्साह वाढवणे; तसेच इंग्रजीतून विज्ञानाची ओळख करून देणे हे हेतू समोर ठेवून शिक्षणपद्धती विकसित करण्यात आली. हे हेतू जरी वरवर उदात्त वाटत असले तरी, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना, भारतीयांना शिक्षण कोणत्या भाषेतून द्यावे, त्यांना शिक्षण देण्याचा नक्की हेतू काय असावा व त्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण व कोणी द्यावे याविषयी एकवाक्यता नसल्याने एकूण गोंधळाचीच परिस्थिती होती. अर्थातच त्यामुळे ज्या वेगाने शिक्षणाचा प्रसार होणे अपेक्षित होते, त्या वेगाने तो होऊ शकला नाही.

१८३५ साली मेकॉलेकडे भारताच्या शिक्षणव्यवस्थेत सुधारणा करण्याची जबाबदारी सोपवली गेली. त्याने शिक्षण का द्यायचे व कोणते द्यायचे याविषयी असलेला गोंधळ मिटवला. "रंगाने व रक्ताने भारतीय मात्र विचाराने इंग्रज" नागरिक तयार करणे. त्यांच्यामार्फत शिक्षणाचा प्रचार-प्रसार करणे व हा प्रसार करत असताना इंग्रजी शासन हे कसे दयाळू आहे व त्याची भारताला कशी गरज आहे, हे त्यांच्या मनावर इंग्रजी भाषेतून बिंबवणे हाच शिक्षणाचा हेतू असला पाहिजे, हे त्याने निक्षून सांगितले.

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणासाठी स्वतंत्र धोरण व समाजातील सगळ्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवणे, उच्च शिक्षण देण्यासाठी विद्यापीठे स्थापन करणे, हे इंग्रजानी शिक्षणक्षेत्रात केलेले चांगले बदल होते. त्यासाठी आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. मात्र हे बदल करत असताना शिक्षणातून लोकांच्या गरजा काय आहेत, याचा विचार न करता केवळ सरकारी मनुष्यबळाची गरज कशी भागेल एवढाच विचार झाला. शिक्षणाचा संपूर्ण भर पाठांतरावर राहिला, त्याचबरोबर शिकलेली सगळीच माणसे एकसारखाच विचार करणारी असतील, याची काळजी घेण्यात आली. अर्थातच त्यामुळे शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्याचे साधन आहे, असा समज रूढ होऊ लागला.

इंग्रजांचे शासन सुरू होण्याआधी भारत हा केवळ कृषिप्रधान देश नव्हता, तर तो व्यापारातही तितकाच अग्रेसर होता. १७०० साली भारताचा जागतिक अर्थव्यवस्थेत असलेला वाटा २४.४% होता, १९४७ साली तो ४.२% झाला. अजूनही तो साधारण तेवढाच आहे. त्याचबरोबर १७५० साली उद्योगधंद्यातून तयार होणाऱ्या उत्पादनात भारताचा असलेला वाटा २५% होता, तो १९०० साली २% झाला. या सगळ्यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी व परंपरागत व्यापार यांची इंग्रजांनी जाणीवपूर्वक केलेली कोंडी कारणीभूत असावी; तसेच व्यावसायिक शिक्षण पूर्णपणे बंद होणे व नोकरीसाठी पाठांतरावर आधारित, जीवनाशी संबंध नसलेले शिक्षण मिळणे हेही कारणीभूत असावे.

मोडकळीस आलेले परंपरागत व्यवसाय, शेतीमध्ये सुशिक्षित माणसांचा कमी झालेला सहभाग व सरकारी नोकरीसाठी प्राथमिकता देण्याची रुजत चाललेली मानसिकता यांमुळे गावे दारिद्र्याच्या खाईत लोटली गेली. दारिद्र्यामुळे शिक्षणाचा लाभ घेणे, त्यांना अवघड जाऊ लागले. अंगभूत कौशल्य वापरण्याची संधी मिळणेही जवळपास अशक्य झाले. एकूणच सुशिक्षित व अशिक्षित अशी दरी निर्माण होऊन त्याचे पर्यावसान सामाजिक संघर्ष वाढण्यात झाले.

खालावत चाललेल्या भारतीय सामाजिक परिस्थितीतीला "भारतात शिक्षण आहे, मात्र शिक्षणात भारत नाही" हीच परिस्थिती कारणीभूत आहे, हे लोकमान्य टिळक, गोखले, महात्मा गांधी, महर्षी कर्वे व महात्मा फुले यांच्या लक्षात आले.

या मंडळीनी इंग्रजांच्या काळात भारतीय शिक्षणव्यवस्थेमध्ये भारताच्या अपेक्षांचे प्रतिबिंब दिसावे म्हणून काय प्रयत्न केले, हे आपण पुढील भागात समजून घेऊ या.

-चेतन एरंडे

[email protected]

शिक्षणपद्धतीच्या इतिहासाविषयी अधिक वाचा चेतन एरंडे यांच्या लेखात खालील लिंकवर 

शिक्षणपद्धतीचा इतिहास