अबोली

दिंनाक: 21 Aug 2018 15:42:41


गुलाब, मोगरा, शेवंतीबरोबर त्यांच्यात सामावलेली ही अबोली. ही भारतीय वंशाची एक झुडूपवर्गीय वनस्पती आहे. क्रोसेन्ड्रा इनफंडी बुली फॉर्मीस हे तिच शास्त्रीय नाव. सुमारे ६० से.मी. उंची असणारी, कमी पाण्यात वाढणारी आणि रेताड सोडली, तर इतर कोणत्याही प्रकारच्या मातीत सहज वाढते. अबोलीला वर्षभर फुले येतात. हिला फुले येण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यकच. ही मूळ श्रीलंकेतील पण मलायात, भारतात, उत्तर प्रदेशात, बंगाल येथे शोभेकरता लावतात. पाने साधी समोरासमोर, फुलोरा गव्हाच्या लोंबिसारखा असतो. याला सुंदर, नाजूक, फिकट पिवळट किंवा नारंगी फुले येतात. इतर रंगांची फुले असलेले प्रकारही आढळतात. फुले गुच्छात येतात. उन्हाळ्यात याला विशेष बहर येतो. फुलांच्या पाकळ्या पातळ पापुद्र्यासारख्या असतात. हार, वेण्या, गजरे यात अबोलीचा विशेष वापर.

ही वनस्पती कडू, उष्ण आहे. सौंदर्यकारकही आहे. फुले औषधी - त्यांची पेस्ट करून त्वचारोगावर; तसेच जखम भरून येण्यास याचा लेप गुणकारी ठरतो. याची मूळही औषधी आहे. पानांचा वापरही त्वचारोगात केला जातो. हिची पाने हिरवी पसरट ५-१० सेमी लांब. फांद्या काळसर, तपकिरी असून फुले शेंड्याला येतात. गुछ्छात वरच्या बाजूला कळ्या, तर खाली फुले अशी त्यांची रचना. फूल गळून पडले की, फळे येतात. त्यात लांबट चपट्या सातूच्या आकारच्या बिया असतात. फळ पक्व झाल्यावर फुटते, त्या वेळी फाटल्यासारखा आवाज येतो. यामुळेच त्याला इंग्रजीत fire cracker flower असा मजेशीर नाव आहे.

लागवड - फळातून बी बाहेर पडते, ते फुटल्यामुळे आणि त्यातून नवीन रोपांची निर्मिती होते. तसेच फांदीपासूनही लागवड करता येते. अबोलीच्या बियांची पावडर पायोरिया या विकारावर वापरली जाते. याला दमट हवा, उष्ण तापमान निचरा होणारी जमीन मध्यम प्रतीची; पण क्षारीय नको. सुरुवातीला मशागत व्यवस्थित हवी आणि खतपाणी दिल्यास जोम येऊन उत्तम बहर येतो.

अबोलीच्या सुंदर रंगामुळेच बगीच्यात; तसेच शाळा मंदिर यांच्या परिसरातही याची लागवड केली जाते. शिवाय याला खूप पाणी लागत नसल्याने वर्षभर फुले येतात. फुले येताना भाजीचा पाला+कोबी, फ्लावरची पाने, देठे तेथे घालावीत म्हणजे कळ्या गळणे बंद होऊन फुले दर्जेदार, खूप येतात. तसेच कोणत्याही प्रकारचा रोग यावर लवकर येत नसल्याने शेतकऱ्यांनी पडीक जागी अबोली फूल शेतीचा विचार करायला हरकत नाही. आपल्याकडे अबोली रंगाशिवाय पिवळी, निळी आणि हिरव्या रंगाची अबोलीदेखील आढळते. अशी फुले खूप सुंदर दिसतात. भारतात महाराष्ट्र, गोवा आणि  दक्षिणेकडील राज्यांमध्ये या फुलांचा विशेष वापर केला जातो. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि कोकण पट्टयात लगीन सराईच्या काळात ही अबोली भाव खाऊन जाते.

पानांवर खार हा रोज कवक बिजाणूंमुळे होतो. त्यामुळे पानांवर व कडांवर अनियमित आकाराचे फिकट पिंगट डाग पडतात आणि ते एकमेकात मिसळल्याने करपा रोग होतो. त्यांचा प्रसार वाऱ्याने होतो. अशा वेळी बोर्डो मिश्राणासारखी कवकनाशके प्रतिबंधक उपाय म्हणून वापरतात.

-मीनल पटवर्धन 

[email protected]

 शेवंती या फुलाविषयी अधिक माहिती खालील लिंकवर 
शेवंती