‘‘घराचे चैतन्य म्हणजे लहान मुले उत्साहाचा अखंड स्त्रोत म्हणजे लहान मुले निरागसपणे झुळझुळणारा निर्झर म्हणजे लहान मुले.’’

प्रत्येक घराचं घरपण म्हणजे आनंदी हसरी लहान मुले. मुले ही देवाघरची फुले असे म्हणतात ते खरंच आहे. टवटवीत फुले जसे चित्ताला मोहवतात त्याप्रमाणे उत्साही आनंदी मुलांचे चेहरे सुद्धा चैतन्यदायी वातावरणाची अनुभूती देतात. मुलांच्यातील हे चैतन्य टिकवण्यासाठी निरागसता जोपासण्यासाठी आणि त्यांच्यातून एक आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पालक म्हणून मोठी जबाबदारी पार पाडावी लागते. आपले मूल हे मोठेपणी सुसंस्कारित सुजाण, आदर्श नागरिक बनावे असे प्रत्येक पालकांना वाटते. पण सध्या जग झपाट्याने बदलत आहे. टी.व्ही, मोबाईल, संगणक अशा माध्यमांच्या प्रलोभनात आणि वाढत्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात मुलांवर सुसंस्कार करणे आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवणे हे मोठे कार्य शिवधनुष्यच पेलण्यासारखे आहे असे म्हणावे लागेल.

पालक असणं वेगळं आणि पालक होणं वेगळं! सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे फक्त पालक होऊन चालणार नाही तर सुजाण पालकत्व आत्मसात करणे आवश्यक आहे.

पूर्वीच्या आणि सध्याच्या कुटुंब संस्थेमध्ये खूप बदल झालेला आहे. पूर्वी घर अगदी माणसांनी भरलेले असे. घरातील आजी, आजोबा, आईबाबा, काका, आत्या सर्व भावंडे अशी वेगवेगळी नाती बालकाभोवती मायेची पखरण करत असत. या सर्व नात्यांचा मायेच्या ऊबेमध्ये बालकाचे व्यक्तिमत्त्व बहरायचे, खुलायचे. सर्वच जबाबदारी पालक म्हणून आईबाबांवर पडायची नाही. संस्कार आपोआप घडत जायचे. मुले भावनिकदृष्ट्या सुरक्षित होती. वर्तनातील शिष्टाचार, घराच्या चालीरीती, मोठ्यांचा आदर, एकमेकांबद्दलचा जिव्हाळा आपोआपच जोपासला जायचा. त्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची आवश्यकता नव्हती. पण सध्याच्या धावत्या युगात कोणत्या ना कोणत्या कारणाने कुटुंबे विभक्त झालेली दिसतात इच्छा असूनही सर्वांना एकत्र राहता येत नाही. कुटुंबातील सदस्य संख्या मर्यादित झाल्यामुळे स्वत:चे मूल घडवणे, वाढवणे ही सर्वस्वी आईबाबांची जबाबदारी झालेली आहे. आईबाबा जर कामानिमित्त घराबाहेर पडणारे असतील तर मग अजूनच तारेवरची कसरत होते. मुलांचे विश्‍व अजूनच लहान व एकाकी बनते.

मुलांची शाळा, अभ्यास, इतर कलाकौशल्यासाठी लावलेले क्लास, स्वत:ची नोकरी, घरातील कामे, सणवार, पै-पाहुणे, मुलांच्या आवडी-निवडी आजारपण हे सर्व सांभाळताना पालक म्हणून आपण कमी तर पडत नाही ना? आपले मूल सुसंस्कारित घडेल ना? त्याच्या व्यक्तिमत्व विकासात काही कमी तर राहणार नाही ना? असे अनेक प्रश्‍न पालक म्हणून आपल्याला सतत सतावत असतात.

व्यक्तिमत्वाची जडणघडण ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही ती सतत चालणारी प्रक्रिया आहे यासाठी संपूर्ण कुटुंबाने दैनंदिन जीवनात काही नियमावली पाळली तर जगण सुंदर होईल. जसे की कौटुंबिक सुसंवाद हा कुटुंब व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. पण सध्या कोणालाच कोणाशी बोलायला अजिबात वेळ नाही. मग भावनिक जिव्हाळा कसा निर्माण होणार? यासाठी ‘आजचा माझा दिवस’ या विषयावर सर्वांनीच संध्याकाळी घरी आल्यावर एकमेकांशी मनमोकळेपणे गप्पा मारल्या तर एकमेकांशी सुसंवाद होतो, सर्वांचीच मने हालकी होतात. दिवसभराचा ताण कमी होतो. मुले दिवसभर काय करतात हे आपल्याला समजते व आपण दिवसभर काय कष्ट करतो हे मुलांच्या लक्षात येते. यामुळे पालक-मुले यांच्यात मैत्रीचे नाते जोपासले जाते. कोणतीही गोष्ट मुले आपल्याशी मनमोकळेपणे शेअर करू लागतात.

दररोज संध्याकाळी आपणच देवासमोर ५ मि. बसून प्रार्थना म्हटली तर मुलांनाही तशी सवय आपोआप लागते. त्यामुळे श्‍लोक, स्तोत्र पाठांतर तर होतेच त्याच वेळी पाढे, कविता पाठांतर या शैक्षणिक गोष्टीपण सहज होऊन जातात.

मुलांच्यात योग्य निर्णयक्षमता विकसित होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपणच त्यांना ती संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण आपली मते मुलांवर लादतो. ‘हा ड्रेस घालू नको’, ‘अशी वेणी घालू नको’, ‘हा खेळ खेळू नको’ इ. सतत नकार घंटा वाजवली तर मुलेही नकारात्मक वागण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना छोटे छोटे स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची संधी द्यावी. उदा., कार्यक्रमाला जाताना कोणता ड्रेस घालू? मित्र/मैत्रिणीला वाढदिवसाला गिफ्ट कोणते देऊ?’ परीक्षेच्या काळात आधी कोणता अभ्यास करू? खरेदीसाठी दुकानात गेल्यावर सर्वच वस्तू आवडल्या आहेत त्यापैकी कोणती घेऊ? इ. बाबतीत त्यांना स्वत:ची मते निवडता येण्यासाठी संधी दिली तर त्यांची निर्णयक्षमता विकसित होते. फक्त त्यांनी घेतलेल्या निर्णयाची योग्यता किंवा अयोग्यता पडताळून पाहणे हे पालक म्हणून आपली जबाबदारी राहील. त्यांची मते व वास्तव परिस्थिती यांची योग्य सांगड घालण्यासाठी मुलांना निर्णय घेण्याची संधी दिली पाहिजे. मुलांच्या मताचा आपण आदर केला की, मुले सुद्धा आपल्या मतांचा आदर ठेवतात. स्व-अनुभवातूनच मुले विकसित होतात.

‘स्वच्छ सुंदर घर’ हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. त्यासाठी घरातील प्रत्येक कामाची विभागणी करून सर्वांनी कामे वाटून घेतली तर सर्वांनाच कामाची सवय लागते. सगळ्यांचाच वेळ वाचतो व कोणा एकावर कामाचा ताण येत नाही. पुस्तकांचे कपाट लावणे, कपड्यांच्या घड्या घालणे, झाडांना पाणी घालणे, देवपूजेची तयारी करणे, दररोज डबा, वॉटरबॅग भरणे, केर काढणे, कपाटे पुसणे इ. कामे मुले आवडीने करतात. तसेच सततच्या अभ्यासातून या कामामुळे त्यांना विरंगुळा मिळतो. यामुळे आपोआपच स्वच्छतेची, नीटनेटकेपणाची सवय जोपासली जाते. मुलांना स्वयंपाकघरातील कामे करायलासुद्धा आवडतात. उदा., भाज्या निवडणे, पोळ्या करणे, कुकर लावणे, लाडू करणे इ. त्यांना गंमत म्हणून ते करू द्यावे. हळूहळू हीच कामे मुले सराईतपणे करतात.

सणसमारंभ साजरे करताना मुलांना आपण धार्मिक कथा सांगतो. त्याचबरोबर त्यामागची शास्त्रीय कारणे सांगितली तर मुलांना जास्त आवडते. उदा., वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे महत्त्व, नागपंचमीला नागाचे महत्त्व, नारळीपौर्णिमेला समुद्राचे महत्त्व, मकरसंक्रांतीला तिळगुळाचे महत्त्व इ. यांमुळे जुन्या परंपरा आणि पर्यावरणवादी दृष्टिकोन यांचा मेळ घालण्याची वृत्ती मुलांच्यात निर्माण होते. मुलांचा आहार हा एक महत्त्वाचा घटक आहे. लहानपणापासूनच मुलांना विविध प्रकारांनी घरात केलेले पौष्टिक पदार्थ खायला दिले तर ती बाहेरच्या फास्टफूडकडे आकर्षित होणार नाहीत.

वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी घरातील प्रत्येकाने महिन्यातून एक पुस्तक वाचायचे व महिन्याच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना त्याचा सारांश सांगायचा असा उपक्रम राबवला, तर मुलांच्यात आपोआप वाचनाची आवड निर्माण होईल. यामुळे मुलांचे ज्ञान समृद्ध होण्यास मदत होईल.

मुलांचे टी.व्ही.चे वेड कमी करण्यासाठी रिमोट आपल्याच हातात ठेवावा. मुलांना फक्त शैक्षणिक व माहितीपर कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची सवय आपणच लावली तर मुले सुद्धा तेवढेच कार्यक्रम बघतील. आपणच आपल्यावर संयम ठेवला की मुले तेच अनुकरण करतात.

अशा प्रकारच्या अनेक छोट्या मोठ्या प्रयोगातून व उपक्रमातून आपण आपल्या बालकाचे व्यक्तिमत्व फुलवू शकतो; खुलवू शकतो. बालकाचे व्यक्तिमत्त्व बहरण्यासाठी फुलण्यासाठी त्यांच्या कृतिशीलतेला चालना देणे, त्यांच्यातील सर्जनशीलता जोपासून त्यांना नवनिर्मितीचा आनंद घेऊ देणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. तेव्हाच एका सुजाण नागरिकाची पर्यायाने सुजाण समाजाची निर्मिती होईल.

‘‘कृतिशीलतेला चालना देऊ या

सर्जनशीलतेची कास धरू या

निरागस मनाचा विकास करू या

सक्षम भारत निर्माण करू या.’’

- मनीषा सूर्यकांत मोरे

[email protected]