‘‘आई, त्या फुलाला काय म्हणतात गं?’’

‘‘बाबा, तो कोणता पक्षी आहे?’’

‘‘पाऊस कुठून पाडतो? वीज कशी चमकते?’’

‘‘माझे केस इतके लांब, पण चिंटूचे इतके लहान का?’’

मला खात्री आहे, प्रत्येक पालकाने या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा अतोनात प्रयत्न केला असेल; पण मुलांना असे प्रश्न सुचतात कसे?आणि ते सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो? शाळेत प्रत्येक वर्गाला, पर्यावरणशास्त्र (परिसर अभ्यास) हा विषय शिकवला जातो. आता आपल्याला वाटेल पर्यावरण म्हणजे झाडे, पाने, फुले, प्राणी इ. परंतु, हे तेवढ्यापुरते मर्यादित नसते. पर्यावरणशास्त्रात रोजच्या आयुष्यात लागणार्‍या सर्व सामान्य गोष्टींचे ज्ञान दिले जाते.

स्वतःच्या शरीराची माहिती हा विषय सर्व प्रथम घेतला जातो. मी मुलगा आहे की मुलगी, कोणाचे केस लांब असतात आणि कोणाचे नाही, कोण कुठल्या प्रकारचे कपडे घालतात, हे सगळे शिकवले जाते. हाविषय मी शिकवत असताना एका ४ वर्षांच्या मुलाला मी विचारले, ‘‘आता तुला मुलगा आणि मुलगी यातला फरक कळलाना? आता सांग बरं, मी कोण आहे?’’ त्याने त्वरित उत्तर दिले, ‘‘तुम्ही टीचर!’’

याचबरोबर आपला परिवार, आपले नातेवाईक आणि अनोळखी व्यक्ती या सगळ्यांची माहितीही दिली जाते.

बर्‍याच शाळा मुलांना पोस्टऑफिस, बसडेपो, पोलीसस्टेशन, अग्शिशामकदल कार्यालय, भाजीमंडई अशा ठिकाणी घेऊन जातात. यालाच क्षेत्रभेट (Field Trip) असे म्हणतात. ते अशा साठी की, आपले शहर कसे चालते आणि ते चालवणारे कोण आहेत, याची माहिती मुलांना मिळावी. असेच एकदा आम्ही मुलांना एका गॅरेजमध्ये घेऊन गेलो होतो. तिथे एक मेकॅनिक गाडीला रंग देत होता. ते मुलांनी बघितले. इंग्रजी शाळेतील मुले होती. परत आल्यावर त्यांना विचारले, ‘‘आपण गॅरेजमध्ये बघितले तो कोण होता?’’ तर एकाने उत्तर दिले, ‘‘कारपेंटर!’’ मला खात्री आहे, तुम्हीपण मुलांबरोबर असे फिरलात, तर तुम्हाला पण खूप गमतीजमती ऐकायला मिळतील.

घरातील सामान आणायला आपण बर्‍याचदा मुलांना बरोबर घेऊन जातोच. तेव्हा त्यांना भाज्यांची नावे, पालेभाज्या कुठल्या आहेत आणि कुठल्या फळभाज्या, कुठल्या भाज्या कधी बाजारात येतात, हे सर्व आवर्जून सांगा. तसेच, कुठल्या फळामधून कोणते जीवनसत्त्व मिळते हे शाळेत सांगितले जातेच; पण मुले जेव्हा स्वतः वस्तू हाताळतात, तेव्हा शिक्षणात वेगळीच मजा येते.

‘‘आई, मी या झाडावर चढू का गं?’’ असं आजकाल ऐकायलाच येत नाही.शहरांमध्ये तेवढी झाडेच कुठे उरली आहेत? मग आपण बागेत जातो, तेव्हा मुलांना झाडे दाखवली तर? कुठल्या झाडाचे पान कसे असते?त्याची फळे खाण्यासारखी असतात का? त्याला फुले येतात का?ही सर्व माहिती आपण त्यांना देऊ शकतो. यासाठी पुस्तक उघडून चित्रे दाखवत बसण्याची गरज नाही. याचबरोबर झाडांपासून आपल्याला काय कायमिळते?त्यांचे किती फायदे आहेत?हे पण मुलांना सांगणे गरजेचे आहे.

पर्यावरणशास्त्र हा घरात बसून किंवा वर्गात बसून नुसता पुस्तकांवरून शिकवण्याचा विषय नाहीच मुळी.तो बाहेर जाऊन, फिरून, खेळत, मातीत चित्र काढत, अनुभव घेण्याचा विषय आहे. खालील चित्रातील गमतीजमती सोडवा.

 भाज्या ओळखा.

-प्रियांका जोशी 

[email protected]