श्रमाचे मोल

दिंनाक: 19 Aug 2018 15:06:01


शरणपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात लक्ष्मीचंद नावाचा एक मोठा उद्योगपती राहत होता. लक्ष्मीचंदच्या मालकीचे दोन मोठे कारखाने होते. इतरही बरीच मालमत्ता होती. एकंदरित लक्ष्मीचंदवर लक्ष्मीचा वरदहस्त होता.

लक्ष्मीचंदला एकुलता एक मुलगा होता. त्याचे नाव दीपचंद. दीपचंदला लहानपणापासून अभ्यासाची आवड नव्हती. लक्ष्मीचंदने मुलाला शिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दीपचंदने शिक्षणाला रामराम ठोकला.

शिक्षण नसल्यामुळे दीपचंदने घरच्या व्यवसायात लक्ष द्यावे, असे लक्ष्मीचंदला वाटले; पण दीपचंद कारखारन्याच्या कामातही लक्ष द्यायला तयार नव्हता. दिवसभर तो गावात फिरत राहायचा. आपला मुलगा काहीच काम करत नाही, हे पाहून लक्ष्मीचंदला काळजी वाटू लागली. लक्ष्मीचंदने ही हकीकत आपल्या मित्राला सांगितली, त्याच्या मित्राने एक कानमंत्र दिला आणि त्याने त्याप्रमाणे वागायचे ठरवले.

दुसर्‍या दिवशी दीपचंद जेव्हा जेवायला बसला, तेव्हा लक्ष्मीचंद त्याला म्हणाला, ‘बाबा रे, तू आता मोठा झालास. तू लहान होतास, तोपर्यंत आम्ही तुला सांभाळलं. तुला खाऊपिऊ घातलं. परंतु, आता तू तुझ्या खाण्याचा काहीतरी मोबदला घरात द्यावास, असं मला वाटतं. आता रोज जेवताना तू मला रुपया दिलास, तरच तुला जेवण मिळेल.’ दीपचंद म्हणाला, ‘ठीक आहे.’ कारण त्याच्या दृष्टीने ही अट फारच सोपी आहे. त्याचे खूप मित्र होते. नातेवाईक होते. त्यामुळे रोजचा एक रुपया त्याला कुणीही दिला असता.

तो रोज मित्रांकडून, नातेवाईकांकडून रुपया आणून आपल्या वडिलांना द्यायचा. त्याचे वडील तो रुपया घेऊन नदीच्या दिशेने फेकून द्यायचे. असे बरेच दिवस झाले.

परंतु, एक दिवस असा आला की, त्याला कोणीच पैसे देईना. रोज दुसर्‍यांकडे पैसे मागणे त्याला कमीपणाचे वाटत होते. दीपचंदचा एक जिवलग मित्र होता. तो लोहार होता. त्याने त्याला आपली समस्या सांगितली, तेव्हा तो म्हणाला, ‘माझ्या वडिलांकडे ऐरणीवर घणाचे घाव घालण्याचं काम कर. ते तुला रुपया देतील.’ दीपचंदकडे दुसरा उपाय नव्हता. नाईलाजाने तो तयार झाला.

सकाळपासून दुपारपर्यंत तो ऐरणीवर घणाचे घाव घालत होता. श्रमाची सवय नसल्यामुळे त्याला चांगलेच दमायला झाले. त्या दिवशी दुपारी त्याला लोहाराकडून रुपया मिळाला. नेहमीप्रमाणे जेवताना त्याने तो रुपया आपल्या वडिलांना दिला. लक्ष्मीचंद नेहमीप्रमाणे तो रुपया नदीत फेकून द्यायला निघाला, तेव्हा दीपचंद पटकन ताटावरून उठला आणि म्हणाला, ‘थांबा, बाबा तो रुपया नदीत फेकू नका.’ लक्ष्मीचंदने आर्श्‍चयाने विचारले, ‘रोज मी नदीत रुपया फेकत होतो, तेव्हा तू काहीच बोलला नाहीस आणि आज काय झालं?’

‘कारण हा रुपया मी कष्ट करून, काम करून मिळवला आहे. चार तास मी ऐरणीवर घणाचे घाव घातले, तेव्हा मला रुपया मिळाला, तो माझ्या कष्टाचा आहे.’ लक्ष्मीचंद म्हणाला, ‘मी फेकून दिलेले ते रुपयेसुद्धा कुणाच्या तरी कष्टाचंच फळ होतं, पण ते फुकट मिळालं होतं, म्हणून तुला त्यांचं मोल कळलं नाही. आता तुला श्रमाचं मोल कळलं. आता तुला आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही.’

- एस. एम. क्षीरसागर

[email protected]