मित्र-मैत्रिणींनो, अगदी बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंत आपला गणवेशाशी संबंध येतो. शाळेच्या गणवेशाप्रती असलेली तुमची जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र व्हावी, त्याचे महत्त्व तुम्हांस कळावे, हाच या लेखामागील उद्देश आहे.

विद्यार्थी मित्रांनो, गणवेशामुळे आपोआपच आपल्या अंगी शिस्तबद्धता येते. गणवेश हा आपल्याला आपल्या भूमिकेची सतत जाणीव करून देतो. जणू काही तो आपल्या कर्तव्याची एक प्रकारची साक्षच देत असतो. तसेच, गणवेशात सारखेपणा असल्यामुळे आपापसातील सलोखा, मैत्री आणि एकमेकांना साहाय्य करण्याची वृत्ती अंगी वाढते. त्यामुळे सामूहिक कार्यही सुरळीत व नीटनेटके चालते यात शंका नाही. अजून एक मित्रांनो, सर्वांचा गणवेश सारखा असल्यामुळे आपापसातील बंधुभाव जागृत होतो. एकसारखेपणा वाढतो. तसेच, वक्तशीरपणा, तत्परता, सहकार्याची वागणूक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मान राखण्याची शिकवण मिळते. समान गणवेशामुळे एकूणच वातावरण उत्साहजनक होते.

एकदा एका सैनिकाला त्याच्या सेनाप्रमुखाने एक प्रश्न विचारला, ‘तू आर्मी का जॉईन केलीस?’ त्यावर त्याने उत्तर दिले की, ‘सर, मला गणवेशाची आवड आहे आणि मला शिस्तबद्ध जीवन आवडते.’ त्यावर सेनाप्रमुख म्हणाले, ‘यंग मॅन! जर या दोन गोष्टींवर तुझा विश्वास असेल, तर तू नक्कीच सच्चा वीर, देशभक्त होशील. कारण गणवेश आणि शिस्तबद्धता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकदा का आपण सैनिकाचा गणवेश परिधान केला की, आपल्याला जगाचा विसर पडतो आणि आपण ध्येयाप्रती कटिबद्ध होतो.’

मुलांनो, आपल्या गणवेशाबद्दलही असेच काहीसे आहे. एकदा का शाळेचा गणवेश घातला की, आपण ‘विद्यार्थी’ दशेतील शिस्तप्रियता अंगी बाणवायला हवी. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायला हवे की, रोजच्या रोज 100% गणवेशाचे पालन केलेच पाहिजे. ते आपण करतो का? रोज शाळेत येताना पूर्ण गणवेशात येतो का? अगदी बूटापासून ते बेल्टपर्यंत, हेअरबँडपासून ते आपल्या केसाच्या स्टाईलपर्यंत आपण व्यवस्थित आहोत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करा. स्वत:ला हे सर्व प्रश्न विचारा. बघा, काय उत्तरे मिळतात. तेव्हा अगदी आजपासून ठरवा की, मी शाळेत जाताना अगदी पूर्ण गणवेशातच जाईन. माझा गणवेश स्वच्छ, नीटनेटका असेल.

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सैनिकांनी गणवेशात असताना हातात हात घालून कधीही चालायचे नसते. अशा कृती म्हणजे गणवेशाचा अपमान समजल्या जातात. त्यामुळे आपणदेखील जेव्हा शालेय गणवेशात असू, तेव्हा शिस्त पाळायला हवी. मर्यादेचे बंधन ठेवायला हवे. शालेय गणवेशात असताना आपापसांतील भांडणे टाळली पाहिजेत. भाषेवर मर्यादा ठेवायला हवी. थोडक्यात, गणवेशाचा आदर राखायला हवा.

सर्वांनीच गणवेशाचा स्वीकार करायला हवा; म्हणजे कामचुकारपणा, लाळघोटेपणा आणि बेशिस्त वागणूक अशा विकारांना थारा मिळणार नाही. खरोखरच, गणवेशाबाबत असा सुज्ञपणे विचार करण्याची आता वेळ आली आहे. गणवेशाचा आदर करा. रोजच्या रोज गणवेशाचा वापर करा. सर्व शिक्षकांच्यावतीने एकच सांगावेसे वाटते, असेच -

‘फुलत फुलत मोठे व्हा

चालत राहा पुढे पुढे

तरीही थोडे मागे पाहा

असतील तुमच्या पाठीशी

आमच्या शुभेच्छा अपरंपार’

- मुक्ता कौलगुड

सहशिक्षिका, सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल