भारताचा – आपल्या देशाचा – स्वातंत्र्यदिन!

...आपल्या काही मित्रांना तो सुट्टीचा दिवस वाटतो. काहीजण त्याला जोडून रजा काढतात. “छानपैकी सहलीला जाऊ या” असे म्हणत मौज-मजा, रंजन-मनोरंजन यांचे बेत आखतात. ठीक आहे का ते? नाही! अजिबात नाही! का बरे?

कारण १५ ऑगस्ट हा आपल्या भारताचा स्वातंत्र्यदिन आहे. आपल्या स्वातंत्र्याचे पूजन करण्याचा हा दिवस आहे. आपल्या देशाला वंदन करण्याचा हा दिवस आहे. आपला राष्ट्रध्वज – तिरंगा ध्वज – हे त्याचे प्रतीक! त्याला – आपल्या तिरंगी ध्वजाला – अभिमानाने सलामी देऊन, ध्वजवंदन करून आपण आपल्या भारतमातेला वंदन करतो, करायलाच हवे!

१५ ऑगस्ट या दिवशी, अगदी सकाळीच होणाऱ्या आपल्या ध्वजवंदनाची तयारी आधीच करायची असते! का? कशासाठी? कारण स्वातंत्र्यदिन हा आपला सण आहे, आपला राष्ट्रीय सण आहे. या निमित्ताने आपण आपल्या इतिहासाचे स्मरण करायला हवे.

स्वातंत्र्य ही देवताच आहे. आपण तिथे स्तोत्र म्हटले पाहिजे! स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी स्वातंत्र्यदेवीचे स्तोत्र लिहिले आहे! स्वातंत्र्यदेवीला वंदन करताना स्वातंत्र्यवीर म्हणतात,

जयोSस्तुते श्रीमहन्मंगले, 

शिवास्पदे शुभदे,                        

स्वतंत्रते भगवती,                                                   

त्वामहं यशोयुतां वंदे.

स्त्रोत्राचे सारे पावित्र्य, मांगल्य या कवितेच्या शब्दाशब्दांत भरले आहे. या स्वातंत्र्यदेवीचे वर्णन करताना ते म्हणतात,

“राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीतिसंपदांची                  

स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची                       

परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी                          

स्वतंत्रते भगवती !                                          

चांदणी चमचम लखलखशी “

स्वातंत्र्यदेवीसाठी जीवनसर्वस्व समर्पित करणाऱ्या, रात्रंदिवस राष्ट्र चिंतन करणाऱ्या त्या महाकवीला वाटते, ‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते’ सारे काही या यशोदायी देवतेच्या चरणांपाशी एकवटले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतीकारकांची चरित्रे, त्यांचा स्फूर्तिदायक बलिदानाच्या कथा आपण एकमेकांना सांगायला हव्यात. ‘स्वातंत्र्यदिन’ पाहायला हवा म्हणून असंख्य सत्याग्रहींनी, राष्ट्रभक्तांनी, समाजसुधारकांनी सर्वस्वाचा त्याग केला. अशा असंख्य सत्याग्रहींनी, आसेतुहिमाचल, हिंदुस्थानी बांधवांनी केलेल्या प्रदीर्घ प्रयत्नांचे फळ म्हणजे हे स्वातंत्र्य! आज आपण साऱ्या भारतीयांनी त्या ज्ञात-अज्ञात वीरांना नम्र भावनेने अभिवादन करायला हवं! आपल्या इतिहासातील त्या राष्ट्रपुरुषांबद्दल, अनाम वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी!

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपण स्वतंत्र झालो. त्या पहाटे आकाशातील तेज पाहून स्वातंत्र्याच्या पहाटेचे स्वागत करताना कविवर्य वसंत बापट आपल्या कवितेतून उत्स्फूर्तपणे उद्गारले,

शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट !                      

पुढे ते म्हणाले...                                                  

‘दीप पेटवूनि घरदारांचे,                    

पूजन केले स्वातंत्र्याचे,                                              

त्या ज्योतींचे तेज मिसळूनी,                      

झाले आज विराट’

‘स्वातंत्र्याचा’ अर्थ आपण समजून घेऊ या. स्वतंत्र झाल्यानंतर आपली – म्हणजे आपल्या देशातील सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. ‘स्वातंत्र्य’ हे एक जीवनमूल्य आहे. आपल्या प्राणांचे व जीवनाचे मोल देऊन त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे. आपण सामाजिक ऐक्य कायम ठेवून, वाढवून आपले सामर्थ्य वाढविले पाहिजे. आपला देश एक समर्थ व सामर्थ्यसंपन्न देश झाला पाहिजे. त्यासाठी आपण समाजातील प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आदर करू या. ‘माझे स्वातंत्र्य माझ्यासाठी, माझ्यापुरते’ हा स्वार्थी विचार झाला. माझ्या स्वातंत्र्याइतकेच दुसऱ्याचे स्वातंत्र्यही महत्त्वाचे आहे. मला विचारांचे व निर्णयांचे स्वातंत्र्य आहे, तसे इतरांनाही आहे, याचे भान ठेवू या. आपण लोकशाही ही एक जीवनपद्धती आहे. सामाजिक जीवनात सहिष्णुता, संयम, सेवाभावना ठेवून आपण परस्परांशी वागलो, तर आपले सामाजिक जीवन अधिक समृद्ध होईल. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आपल्या वागण्यातून प्रकट झाले, तर स्वतंत्र भारताचा खरं अर्थ साकार   होईल. स्वातंत्र्यदिन आपल्याला जबाबदारीची जाणीव शिकवतो. ‘माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही’ ही जाणीव प्रत्येक क्षणी आपल्या मनात ठेवून आपण वागू या. आपले जीवन आपणच घडवायचे आहे, या स्वावलंबनाचा अर्थही आपण लक्षात घेऊया. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे स्वयंशिस्तीने, जबाबदारीने वागून आपले कुटुंब, समाज व देश यांचाही विचार करणे होय.

आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपला देश पुन्हा वैभवाच्या शिखरावर नेऊन पोहोचविण्याचे स्वप्न आपल्याशिवाय कोण पूर्ण करणार?

विद्यार्थी या नात्याने आपण अंतर्मुख होऊ या. आपल्या पूर्वजांनी अत्यंत उत्कटतेने म्हटले होते, ‘देशाचा तो भार| आहे शिरावरी| असे थोडे तरी| वाटू द्या हो||’ त्याचे स्मरण करूया! आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी आपण काही केले पाहिजे, याची जाणीव सेवाभावनेतून व्यक्त करू या. देशाचा उज्ज्वल भविष्यकाळ घडविण्यासाठी सारे जण एक होऊन, एकदिलाने परिश्रम करू या. विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या नव्यानव्या क्षितीजांचे आव्हान पेलू या. आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित, अभंग राहतील याची काळजी घेऊ या – त्यासाठी आपल्याला सैनिकी शक्तीच्या पाठीशी पहाडाप्रमाणे उभे राहू या! विद्येची उपासना आणि ज्ञानाची आराधना करतानाच ‘माझा भारत देश जगातील एक महासत्ता होईलच होईल’ हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या या शुभदिनी प्रतिज्ञाबद्ध होऊ या!

स्वातंत्र्याचा जयजयकार!

भारत माता कि जय!! वंदे मातरम्!!! 

-श्री. वा. कुलकर्णी

[email protected]