आज किनई मी तुम्हाला गंमत सांगणार आहे. आज माझी माहिती तुम्हाला सांगताना माझ्याविषयी जी माहिती मी ऐकली आहे ती तुम्हाला सांगणार आहे. माझ्याबद्दलची ही माहिती जीवितनदी या संस्थेचे स्वयंसेवक यांनी सांगितली. ही माहिती ऐकून मलाही खूप छान वाटलं. आज किनई माझ्या नदी काठावर काही शाळेची मुलं आली होती. शिक्षणविवेकने लहान मुलांसाठी नदीसफर आयोजित केली होती. हे मी गुपचूप त्यांच्या सहकाऱ्याकडून ऐकलं. जे माझ्या नदीकाठावरून जाताना एकमेकांना सांगत होते. मुलांसाठी ही नदीसफर म्हणजे माझ्या नदीकाठची सफर होती. अरे एवढी माहिती सांगताना मी नावच सांगायचं विसरले... मी मुठा.. मुळा-मुठा नदीमधील मी मुठा..

माझं मुठा नाव कसं पडलं हे सांगताना जीवितनदीच्या स्वयंसेवकानी खूप छान माहिती सांगितली. त्यांनी सांगितलं की, माझा उगम लवासा सिटीजवळ टेमघर धरण आहे. या धरणामागे वेगरे नावाचे गाव आहे तेथून झाला. तेथे काही खेकडे आढळतात. हे खेकडे जे आहेत ते मानवाने हाताची मुठ बंद केली असता त्या मुठीचा जो आकार असतो तसे दिसतात. हे खेकडे जी बीळ तयार करतात त्या बिळातून अगदी छोटेछोटे जे काही पाण्याचे झरे बाहेर पडतात त्यातून माझा उगम होतो आणि त्या खेकड्यामुळेच मला मुठा हे नाव प्राप्त झाले. मी लव्हासा येथून वाहत पुण्यातून पुढे वाहत जाऊन मुळा नदीला जाऊन मिळते. तेथून पुढे आम्हाला मुळा-मुठा या नावाने ओळखलं जातं. पुढे आम्ही भीमा नदीला जाऊन मिळतो. भीमा नदी कर्नाटकमध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. पुढे कृष्णा पूर्वेकडे वाहत जाऊन आंध्र प्रदेशात मछलीपट्टण येथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते; तर असा हा माझा मुळा, भीमा, कृष्णा नदीसोबत प्रवास होतो.

मुलांनो, तुम्हाला माहीत आहेच की भूंकप, भुगर्भातील आंतरिक हालचाली यामुळे नदीचा प्रवाह हा बदलत असतो. तसा माझ्या प्रवासामध्ये मी माझाही प्रवाह बदलला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का? आता या वेळेला माझा हा जो प्रवाह आहे, तो दीड लाख वर्षापासूनचा आहे. म्हणजे मागील दीड लाख वर्षापासून मी याच एका लयीत वाहत आहे.

नदीला पूर का येतो? तुम्ही म्हणाल, आज नदीमाय आपल्याला खूप सारे प्रश्न विचारतेय. आज थोडी वेगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जीवितनदीच्या ज्या स्वयंसेवक होत्या त्यांनी जी काही माहीती त्या मुलांना दिली, ती अगदी योग्य माहीती दिली. तीच माहिती मी तुम्हाला सांगते. मुलांनो, माझ्या नदीचे पात्र हे मी जेवढ अंतर घेऊन वाहते तेवढंच असतं. माझ्या नदीचे पात्र ही खूप रुंद असतं. माणूस काय करतो त्याला माझ्या नदीकाठाबाजूच्या जागेचा फायदा घेता यावा यासाठी तो माझा काठ अरुंद करून टाकतो. तुम्ही मला पाहिलं असेल तर मला ही खूप छोट्या ओहोळसारख रूप देऊन ठेवलं आहे; तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा माझ्या नदीकाठची जागा मानवाने घेतली आहे, मी तेथूनही वाहते. का तर तेव्हा माझ्या पोटात प्रचंड पाणी असतं आणि या पाण्याला वाट न मिळाल्याने ते नदीकाठावरून वाहतं आणि पूर येतो. हे सर्व मानवाने हव्यासापोटी करून घेतलं आहे.

माझ्या नदीकाठी अनेक पक्ष्यांचा अधिवास होता. माझ्या नदीकाठी फार पूर्वी वंचक (pond herron) नावाचा स्थानिक पक्षी दिसायचा. हा पक्षी काहीसा बगळ्यासारखा दिसायचा. आज हा पक्षी येथे दिसून येत नाही. अगदी दहा एक वर्षापूर्वी हा पक्षी अधूनमधून दिसायचा, पण आता तसा तो दिसत नाही. त्याचप्रमाणे माझ्या काठावर आधी मोठ्या प्रमाणात दिसणारे कवड्या (पाईड किंगफिशर), टिटवी, कमलपक्षी हे पक्षी आता पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याला कारण फक्त प्रदूषण. सध्या माझ्या नदीचे पाणी प्रचंड घाण व काळे बनले आहे. अशा पाण्यामध्ये पक्षांना आपले भक्ष शोधता येत नाही. म्हणून माझ्या आजूबाजूला पक्षाचा सहवास कमी झाला आहे. गेल्या काही वर्षात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने नदीतील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन माझी परिसंस्था कोलमडून पडली आहे. हे सर्व सांगताना मुलं माझ्या नदीच्या पाण्याकडे पाहत होती. मला खूप वाईट वाटत होतं. दैनंदिन जीवनात आपण जी रासायनिक प्रसाधने वापरतो; तसेच मैलापाणी यामुळेही प्रदूषण होत असते. याचाही मानवाने विचार केला पाहिजे. आज नदीसुधार प्रकल्पामध्ये माझ्या नदीचा समावेश केला गेला आहे. आता मी खूप संथपणे वाहत असते. माझ्या पाण्यावर प्लास्टिकचा कचरा दिसून येतो. मला खळखळून वाहायचं आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे. तर मुलानो, तुम्ही सारे मिळुन प्रयत्न करणार मला विश्वास आहे. आता पावसाळ्यात जोवर माझा नदीकाठ तुडुंब भरला आहे. तोवर मी पुढे जाऊन समुद्राला मिळते. तोवर तुम्ही ही अभ्यास करून पुढचा पल्ला गाठा आणि प्रवाही राहा.

-उत्कर्षा सुमित

[email protected]

 

गोदावरी नदीविषयी जाणून घेऊ खालील लेखात

मी महाराष्ट्राची गोदा...