बालकवी

दिंनाक: 13 Aug 2018 15:02:39

 


‘श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, 

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे।

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, 

मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे॥  

बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे निसर्गकवी म्हणून सर्वांना परिचित आहेत.डॉ. कान्होबा रणछोडदास किर्तीकरांच्या अध्यक्षतेखालील पहिल्या कवी संमेलनात ठोंबरे यांना ‘बालकवी’ ही पदवी प्राप्त झाली. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कवी संमेलन झाले होते. बालकवींचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला. वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर इथे असताना त्यांनी पहिली कविता लिहिली.

फुलराणी, तारकांचे गाणे, अप्सरांचे गाणे, गवताचे गाणे या सगळ्या कवितातून, कल्पना, बालभावना, सुकुमार तरलता आणि अतिशय लवचिक चित्रमयी शब्दकळा यांचा मोहक विळखा बालकवीमराठी रसिकतेला घालतात. रागोबा आला, माधा भाऊ, चांदोबा मजला देई ही शिशुगीतेही गुंगवून ठेवणारी आहेत.दिव्यत्व आणि प्रीती हे बालकवींना  गुंतवून ठेवणारे खास विषय होते. बालविहग,पारवा ही अविस्मरणीय भावचित्रे त्यांनी चितारली आहेत. मांगल्य आणि निरागसता या वृतीने बालकवी आपली सर्व मानसिकता उत्कटतेने अभिव्यक्तकरतात. निसर्ग कवितेत निसर्गवर्णन; त्याचबरोबर मानवी भावनांची असंख्य रूपे धारण करून अवघी सृष्टीच त्यांना फेर धरताना दिसते. उदासतेच्या सावटाखाली वावरत असतानाही खळखळत्या निर्झराच्या दोन्ही तटाकडे घुमणारा पारवात्यांना साद घालतो.

कोठूनि येथे मला कळेना। उदासीनता ही हृदयाला।

काय बोचते ते समजेना। हृदयाच्या अंतहृदयाला॥

औंदुबर, पाऊस, श्रावणमास, तडाग असतो तर मेघांचा कापूस या कवितांमध्ये निसर्गवर्णन; त्याचबरोबर मानवी भावभावना शब्दबद्ध करताना आढळतात. आपल्या एका अनोख्या विश्वात व तंद्रित हाकवी विमनस्क फिरत राहतो. 

निर्झरमय काननमय गायनमय दिव्य जाहला देह

सृष्टीचेही पुरेना विचराया स्वैर त्याजला गेह

मग गूढ अमूर्ताची मधुगीते गोड गावया लागे 

आनंदरूप झाली मानवता, मृत्यू राहिला मागे 

बालकवींच्या प्रकाशित कवितांप्रमाणेच काही अप्रकाशित कविताही होत्या. समग्र बालकवी या नावाने सर्व कविंताचा संग्रह बालकवींच्या पत्नी पार्वतीबाई ठोंबरे यांनी प्रकाशित केला.

जेमतेम २८ वर्षांचे आयुष्य वाट्यास आलेल्या बालकवींना भादली स्टेशनवर रूळ ओलांडताना आगगाडीखाली अपघाती मरण आले.

 

-ऋतुजा गवस

[email protected]