विकी आता १० वर्षाचा झाला होता. तो घरातील गोष्टींचे काळजीपूर्वक निरीक्षक करीत असे. वडिलांकडे मोठ-मोठी माणसे येतात. चर्चा करतात. त्यांना रोज खूप सारी पत्रे येतात. घरातील प्रत्येकाला कधी ना कधी असे पत्र येतेच, पण मला मात्र एकही पत्र येत नाही. तो विचार करू लागला खरचं किती मजा येईल ना? मला ही असे पत्र आले तर? म्हणून त्याने एक युक्ती केली. तो स्वतःच पत्र लिहू लागला. पोेस्टातून लिफाफा आणून पेटीत टाकू लागला. रोजच्या टपालात त्याचे ही पत्र येऊ लागले. सगळ्यांबरोबर आपल्याला ही पत्र येत हे पाहून त्याला आनंद झाला. वडील त्याला बोलावून पत्र देऊ लागले. त्याला हे फार आवडत होते. चार-पाच दिवसानंतर वडिलांच्या लक्षात आले की, याला कोणाची पत्रे येतात? त्यांनी  विकीला जवळ बोलावले आणि विचारले. तुला कोण पाठवतं पत्र? त्यावर विकी म्हणाला, ‘‘मीच मला पत्र लिहितो मला आवडतं ते पत्र आलेलं’’. वडील म्हणाले, "अरे, तू तर आता मोठा झालास. तुला कळू लागले आहे की, आपल्या आवडीची गोष्ट कशी मिळवायची ते! आता मला तुझी काळजी नाही. विकी आता हळूहळू मोठा होत होता. रविंद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी या व्यक्तींचे घरी येणे जाणे असल्याने त्यांचे तो निरीक्षण करत असे. आपल्याला हवे ते वेगवेगळ्या युक्त्या वापरून मिळवत असे. त्याच्या बुद्धीची चुणुक  लहानपणीच दिसत होती. सतत काहीतरी कामात गढलेला असायचा. कुणाला त्याचा कधी त्रास नाही. आईच्याच शाळेतील एका शिक्षकाकडून त्याचे शिक्षण झाले. गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय त्याचे विशेष आवडीचे होते. 
 
मुलाची हुशारी लक्षात आल्यावर वडिलांनी त्याला ब्रिटनला ब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी पाठवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर बंगलोर येथे सी.व्ही. रामन यांच्या  मार्गदर्शनाखाली ‘वैश्‍विक किरणे’ यावर संशोधन केले. ब्रिटनहून डॉक्टरेट पदवी मिळवल्यावर आपल्या मायभूमीची सेवा करण्याचे ठरवले. 
 
विकीचा आता विक्रम झाला होता. भैतिकशास्त्राच्या संशोधनासाठी अहमदाबाद येथे एक कार्यशाळा स्थापन करून भारतीय संशोधन सत्रात विक्रमने पहिले पाऊल टाकले. भारताने जेव्हा पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला त्याची रचना याच संशोधन केंद्रात झाली होती. आर्यभट्टाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे डॉ. विक्रम साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्त्व यांचा मोलाचा वाटा आहे. 
होय, आपले विक्रम हे नाव सार्थ करणारे डॉ. विक्रम आंबालाल साराभाई हे भारतीय विज्ञान विश्‍वातील एक लखलखता प्रकाश आहे. त्यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक संस्थांची पायाभरणी भारतात केली. इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट राष्ट्रीय भौतिकी प्रयोग शाळा, टेक्सटाईल रिसर्च असोशिएशन सेंटर फॉर इन्व्हीरोन्मेंटल प्लॉनिंग अँड टेक्नोलॉजी इत्यादी संस्था त्यांंच्या कार्याच्या वटवृक्षाची साक्ष देत उभ्या आहेत. आपल्या हुशारीच्या जोरावर कोणतीही गोष्ट आपण जागतिक विक्रमापर्यंत नेऊ शकता हे त्यांनी दाखवून दिले. प्रत्येक क्षेत्रात विज्ञान किती उपकारक आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या या कार्याबद्दल भारताने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवले आहे. 
 
एका वैज्ञानिकाचा, संशोधकाचा मृत्यूही असाच सतत कार्यमग्न असताना झाला. एका वैज्ञानिक परिषदेदरम्यान त्यांचा मृत्यूू झाला. परंतु भारतमातेचा हा लाडका सुपुत्र त्याच्या कामगिरीने अमर झाला. नावाप्रमाणे विक्रमाला गवसणी घालून गेला. वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगून त्यांना सतत स्मरणात ठेवू या! संशोधक वृत्ती अंगी बाणवू या! मानवकल्याणाचे शोध लावू या! त्यांची किर्ती जगभर पसरवू या!
 
       -सुनिता वांजळे