पाईपर

दिंनाक: 11 Aug 2018 14:52:21

नमस्कार!! या शॉर्टफिल्मविषयक सदरात आज प्रथमच आपण एका ऍनिमेटेड शॉर्टफिल्मविषयी जाणून घेणार आहोत. या शॉर्टफिल्मचं नाव आहे 'पाईपर' (Piper).
 
नुकताच आपण सर्वांनी मैत्रीदिवस, अर्थात फ्रेंडशिप डे साजरा केला. मैत्री म्हणजे नेमकं काय असं विचारलं तर प्रत्येकाच उत्तर वेगवेगळं असू शकेल. पण मैत्रीसाठी खूप कालावधीचा सहवास जरुरी आहे का? काहीजण म्हणतील हो, काहीजण म्हणतील नाही. पण अगदी छोट्याशा कालावधीतही आपण केलेली छोटीशी गोष्ट मैत्रीच्या दृष्टीने टाकलेलं पुढचं पाऊल असू शकतं.. हो नं?
 
आता पाईपर या शॉर्टफिल्मविषयी विस्ताराने बोलूयात. ऍनिमेशन क्षेत्रात डिस्ने ही संस्था आघाडीची संस्था मानली जाते. तर डिस्ने पिक्सर यांनी बनवलेली ही शॉर्टफिल्म केवळ ३ मिनिटे ६ सेकंदाची आहे, पण शॉर्टफिल्मद्वारे पोचवला जाणारा संदेश फार मोठा आहे. या शॉर्टफिल्ममध्ये जेमतेम ४ पात्रं आहेत. एक माणूस, त्या माणसाचं छोटसं कुत्रं, एक बगळा (पाणपक्षी) आणि त्या बगळ्याची छोटी पिल्लं. माणूस निघाला आहे मासेमारी करायला. मोक्याची जागा हेरून आपली नाव त्या जागी थांबवून त्या माणसाचा मासेमारी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याने आधी काही खेकडे, अळ्या संध्याकाळच्या जेवणाची तजवीज व्हावी म्हणून आधीच नावेत आणून ठेवल्या आहेत. म्हणजे या अळ्या गळाला लावायच्या, गळ पाण्यात सोडायचा, अळ्या खाण्याच्या हेतूने मासे गळाच्या जवळ येतील की मग मासे पकडायचे असा त्या माणसाचा हेतू आहे. संध्याकाळची वेळ आहे, वातावरण खूप शांत आहे. तो माणूस आणि त्याचा कुत्रा मासे गळाला लागण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. इतक्यात येतो बगळा, नावेत ठेवलेल्या अळ्या उचलायला. नावेतल्या अळ्या अशा सहज कशा नेऊ देईल तो कुत्रा? कुत्रा आणि बगळ्यात वादावादी, भांडाभांडी होते. असं एकदा होतं, दोनदा होतं; पण बगळा परत परत अळ्या नेण्यासाठी धडपड का करतोय? एवढं जीवावर उदार होऊन, कुत्र्याशी भांडून त्या बगळ्याला अळ्या का हव्या आहेत? उत्तर पुढच्या काही सेकंदात मिळतं आणि कुत्रादेखील बगळ्याला नावेतले अळ्या, खेकडे नेण्यापासून अडवत नाही!! कुत्र्यात अचानक हा बदल कसा घडतो? शॉर्टफिल्मच्या शेवटी अजून एक सुंदर प्रकार घडतो. जसा कुत्रा बगळ्याला मदत करतो त्या बदल्यात बगळाही दिवसभर गोळा केलेले मासे त्या कुत्र्याला आणून देतो.
 
जमेल तेव्हा, जमेल तेवढी मदत आपण प्रत्येकाला केली पाहिजे हा सुंदर संदेश या शॉर्टफिल्मद्वारे दिला गेलाय. त्यात ऍनिमेशनने बहार आणली आहे. ही अतिशय गोड ऍनिमेटेड शॉर्टफिल्म तूम्ही यु ट्यूबवर पाहू शकता. लिंक खालीलप्रमाणे
 
 
सौजन्य - यु ट्युब
 
-भाग्यश्री भोसेकर 
 
 
शॉर्टफिल्म्स परिचय -भाग 3