(टीप: या लेखाचा उद्देश तांत्रिक माहिती पुरवणे, हा नसून, किमान तांत्रिक माहिती मिळवणे कशी आवश्यक आहे, याविषयी माझे निरीक्षण मांडणे हा आहे.) 

आपण केलेल्या पोस्टवर अनेकदा वादविवाद होतात, कधीकधी ते टोकालाही जातात. एखाद्या ठिकाणी वाद होतोय, असे दिसले की आपण ताबडतोब, तो विषय इतर चांगल्या गोष्टींकडे वळवून, नकारात्मक प्रतिक्रिया न देता, कधी हास्य विनोदातून तर कधी गरज असेल तर माफी मागून, तो विषय थांबवायला शिकले पाहिजे. कारण माहितीच्या युगात माणसे जितक्या वेगाने जोडली जातात, तितक्याच वेगाने जुने संबंध असलेली माणसे तुटू शकतात. आपण शक्यतो राजकीय, जातीयवादी, पंथवादी, कुत्सित, सतत एकच बाजू मांडणारे लिखाण करणे किंवा पोस्ट शेअर करणे सहज टाळू शकतो.

इंटरनेटवर आर्थिक व्यवहार करताना, आपल्या बँकेने दिलेल्या सर्व सुरक्षाविषयक सूचना आपण शांतपणे वाचणे व त्यानंतरच व्यवहार करणे, हे आपल्या अकौंटवर दरोडा पडून नये यासाठी आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार करताना, त्या वेबसाईटच्या नावाच्या आधी हिरव्या रंगाच्या बंद कुलुपाचे चिन्ह आहे, याची खात्री करून घेतलीच पाहिजे. त्याशिवाय व्यवहार करणे, म्हणजे फाटक्या खिशात, पैसे कोंबण्यासारखे आहे. ज्याप्रमाणे आपण आपले खरे वय व खरा पगार कुणाला सांगत नाही, अगदी तसेच आपले बँक डीटेल्स व ओटीपी कुणालाही सांगू"च" नये.  

इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला अचानक धन लाभ मिळवून देण्याच्या पण ऑफर येतात! कधी ती नामवंत ठिकाणी, लठ्ठ पगाराची नोकरीची संधी असू शकते तर कधी अवाढव्य किमतीची लॉटरी असू शकते. या जगात जिथे साधे इडली सांबार खाताना, दुसऱ्यांदा सांबार मागितल्यावर जास्तीचे पैसे द्यावे लागतात, तिथे असा धनलाभ होणे, कधीतरी शक्य आहे का? त्यामुळे रस्त्यावरून जाताना आपल्या हातात जाहिरातीचे पत्रक टेकवल्यावर, आपण त्या पत्रकाला जेवढी किंमत देतो, तेवढीच किंमत, या ऑफर्सना दिलेली बरी!

आणि हो सगळ्यात महत्त्वाचे, आपण केलेल्या प्रत्येक पोस्टवर लोकांनी लगेचच प्रतिसाद द्यावा, आपण दिलेल्या प्रत्येक मेसेजला लोकांनी उत्तर दिलेच पाहिजे, असा माझाही यापूर्वी आग्रह असायचा. मात्र गुगलच्या या कोर्सनंतर, सोशल मिडीयावरील प्रत्येक प्रोफाईलच्या मागे जिवंत भावना असणारी, एक व्यक्ती आहे, हे मला चांगलेच उमगले आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच जर एकमेकांच्या त्या जिवंत भावनांचा आदर केला, प्रतिसाद देण्याच्या किंवा न देण्याच्या समोरच्या व्यक्तीच्या इच्छेचा आदर केला, तर सोशल मिडियावरील संवाद केवळ संवाद न राहता तो सुसंवाद होईल, असे माझ्या लक्षात आले व त्यादृष्टीने मी स्वत:ला बदलणे देखील सुरू केले!     

माहिती तंत्रज्ञानाचा वापर करताना, जर आपण "फेक" गोष्टींपासून दूर राहिलो व इतरांनाही दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले, कुत्सितपणे लिहिणे किंवा टिंगलटवाळी करणे टाळले, स्वत:ची फुटप्रिंट प्रगल्भ व स्वच्छ कशी असेल याची काळजी घेतली तर माहितीच्या जगात नक्कीच एक जबाबदार नागरिक म्हणून आपले स्थान निर्माण करू शकतो..

-चेतन एरंडे

[email protected]

माहिती तंत्रज्ञान - माहितीच्या जगात जबाबदार नागरीक होण्यासाठी - भाग १