"आषाढस्य प्रथम दिवसे......

हे शब्द ऐकले की आठवण येते ती  संस्कृत नाटककार आणि महाकवी कालिदासांची .....

आणि त्यांचं प्रसिद्ध महाकाव्य मेघदूताची..."

स्नेहलताईनं विषयाची सुरवात केली, पण शालेय वयातल्या त्या सर्वांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह उमटलं. आठवीपासूनच्या मुलामुलींना संस्कृतची तशी तोंडओळख नुकतीच झाली होती. त्यातल्या त्यात साहीलची आजोबांशी गट्टी असल्यानं, कालिदासाच्या गोष्टी त्याच्या कानांवरून गेल्या होत्या.

"स्नेहलताई, कालिदासांबद्दल मला आजोबांनी एक गोष्ट सांगितलेली आठवते.... सांगू...?" साहील.

"अरे सांग की...."

"एकदा कोण्या एका राजाच्या दरबारात, विद्वान ...पंडित व्यक्तींची नावं मोजायला सुरवात झाली. नेहमीप्रमाणे हाताच्या बोटांपैकी करंगळीवर अंगठा ठेऊन, कालिदासांचं नांव पहिलं मोजण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या तोडीचं दुसरं नांवच समोर येईना....आणि करंगळीनंतरच्या बोटावर मोजण्यासाठी विद्वानाचं नांवच मिळालं नाही. आणि म्हणून त्या बोटाचं नांव पडलं ....... अनामिका. "

" अरे वा.... खरंच की...." केतकी म्हणाली.

"लिटिल फिंगर ( करंगळी ), रिंग फिंगर ( अनामिका ), मिड्ल फिंगर ( मध्यमा ), पाॅईंटिंग फिंगर ( तर्जनी ) आणि थम्स अपचा थम ( अंगठा ) अशी नांवं माहिती होती. पण अनामिकेची कथा आजच कळली.. मस्तच..."

"हो ना.... " स्नेहलताईनं साहीलचं कौतुक केलं.

"कालिमातेचा भक्त असलेल्या, उज्जैनच्या या विद्वान लेखकानं, संस्कृत भाषेतील साहित्यात खूप मोलाची भर घातली. विक्रमोर्वशीयम् ( राजा विक्रम आणि उर्वशीची गोष्ट ), मालविकाग्निमित्रं ( मालविका आणि अग्निमित्राची गोष्ट ) आणि अभिज्ञान शाकुंतलम् ( राजा दुष्यंत आणि शकुंतलेची गोष्ट ) अशी तीन नाटकं त्यांनी लिहिली. कुमारसंभव ( शिव पार्वतीच्या विवाहाची आणि कुमारच्या जन्माची गोष्ट ), रघुवंशम् ( रामाच्या रघुकुळाची गोष्ट ) आणि मेघदूत ही त्यांनी लिहिलेली महाकाव्यं. यापैकी मेघदूत हे महाकाव्य प्रथम इंग्रजीत  भाषांतरित झालं. ( cloud messenger  ) आणि त्यावरून जर्मन लेखक गटे यांनी ते जर्मन भाषेत नेलं आणि त्यामुळे कालिदासाचं नाव जगभरातील वाचकांना माहित झालं आणि भारताचा शेक्सपियर म्हणून परदेशात त्यांना लौकिक मिळाला.

या मेघदूतामध्ये त्यांनी एक भन्नाट कल्पना वापरली... कोणाला माहिती आहे...?" स्नेहलताईनं मध्येच प्रश्न टाकला.

अपेक्षेप्रमाणं, साहील ने हात वर केला...." आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात दिसलेल्या मेघाला... म्हणजे ढगालाच त्यांनी दूत...निरोप्या... मेसेंजर म्हणून संबोधलं आणि मध्य प्रदेशातील रामटेक पासून, दूर हिमालयात कैलास पर्वताजवळ असलेल्या अलकानगरीत असलेल्या आपल्या पत्नीला निरोप देण्यास सांगितलं. आणि आश्चर्य म्हणजे, हा प्रवास कसा असेल, वाटेत कोणकोणती ठिकाणं लागतील याचं त्यांनी केलेलं वर्णन वाचतांना, या प्रवासाचा एरिअल व्हू त्यांनी अप्रतीम रित्या आपल्या डोळ्यांसमोर उभा केलाय. "

"शाब्बास साहील, मेघदूताचं नेमकं वैशिष्ठं तूं सांगितलंस. " स्नेहलताई.....

"यांत त्यांनी वापरलेल्या उपमा... illustrations or examples.... यांनी तर ' उपमा कालिदासस्य ' अशी स्वत:ची नवी ओळख निर्माण केली. ( म्हणजे उपमा हा अलंकार वापरावा तो कालिदासानेच ). म्हणूनच आषाढ महिन्याचा पहिला दिवस ' कालिदास दिन ' म्हणून साजरा केला जातो.( कालिदासाचं हे साहित्य आज Amazon.in वर उपलब्ध आहे . )

"याच आषाढ महिन्याच्या पौर्णिमेचंही एक आगळं महत्व आहे. त्याबद्दल कोणाला माहिती आहे. ?" स्नेहलताई नं विचारलं.

आता मात्र खूपजणांचे हात वर झाले. ताईनं छोट्या वेदाला पहिली संधी दिली.

"गुरुपौर्णिमा ........ त्या दिवशी आम्ही शाळेतल्या लाडक्या बाईंसाठी गुलाबाचं फूल घेऊन जातो. " वेदा

"गुरू: ब्रह्मा गुरूर्विष्णू गुरू:देवो महेश्वर: । गुरू: साक्षात् परब्रह्म तस्मै: श्री गुरवे नम: ।। हा श्लोक म्हणून शिक्षकांना वंदन करतो. " निखिल.

"गुरूजनांविषयी आदर व्यक्त करून, त्यांनी आम्हाला आयुष्यात जे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू. " शामल

"आता पुढच्या वर्षी दहावी पास होऊन, आमची शाळा संपेल. पण शाळेतले हे प्रेमळ शिक्षक आम्हाला नेहमीच आठवत राहतील. माझ्या बाबांना तर त्यांच्या लहानपणचे शिक्षक अजून का आठवतात, ते मला आत्ता कळतंय. " निखिल.

"माझी आजी पण शिक्षिका होती. खूप कडक शिस्तीची म्हणून प्रसिद्ध होती. पण गुरूपौर्णिमेच्या दिवशी तिलाही भेटायला अजून तिचे विद्यार्थी येतात. "सानिका.

"आमच्या गाण्याच्या क्लासमध्ये तर गुरुपौर्णिमेचा फार मोठा समारंभ होतो. आमच्या बाई त्यांच्या गुरूंबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी मोठ्या कार्यक्रमाचंआयोजन करतात . आणि क्लासमध्ये शिकणा-या प्रत्येकाला त्या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळते. सगळे पालकही दरवर्षी मोठ्या कौतुकानं हा कार्यक्रमऐकायला येतात."  शाल्मली.

"अगदी खरंय...... " स्नेहलताईनं शाल्मलीच्या म्हणण्याला दुजोरा दिला. " संगीत ही गुरूमुखी विद्या असल्यानं, संगीताच्या क्षेत्रात तर गुरूपौर्णिमेचं खूपचमहत्व आहे. कारण इतर कोणतेही विषय पुस्तकांच्या सहाय्यानं समजून घेतां येत असले, तरी गायन वादन नृत्य हे शिकायला प्रत्यक्ष गुरूच लागतो. "

"माझी आजी तर म्हणते, आपले आई बाबाही आपले गुरू असतात. आपण प्रत्येक माणसाकडून काहीतरी चांगलं शिकू शकतो. " सानिका.

"अध्यात्मातही गुरूंचाही महिमा वर्णन केला आहे. ' गुरूबिन कौन बताए बाट ,............'

बालिके.... मीही तुला मार्गदर्शन करू शकतो. मला शरण ये, माझा आशीर्वाद घे ....." साहील.

"ए भोंदुबाबा, मी काही अशा सोम्या गोम्या च्या बोलण्यावर विश्वास ठेवणारी नाही हं..... " सानिकानं त्याला चांगलंच ठणकावलं. अन् सर्वांमध्ये हास्याचीलाट पसरली.

"शाब्बास सानिका.... असा ठामपणा हवा. मी सांगू का मला काय वाटतं ते..." स्नेहलताईनं विचारलं.

"सांग ना स्नेहलताई ......."

"तुम्ही सर्वांनी एक गोष्ट कायम लक्षांत ठेवा. या सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता असलेला ईश्वर हा सगळ्यांचा गुरू... परमेश्वर. त्याचं अस्तित्व मान्यकरायचं. त्यासाठी रोज उठल्यावर त्याला मनापासून नमस्कार करायचा, रात्री झोपण्यापूर्वी त्याची प्रार्थना करायची. त्याचं स्मरण ठेवायचं. पण आताच्यातुमच्या शालेय जीवनात तुमचा अभ्यास, तुमचं काम हाच तुमचा परमेश्वर. मनापासून केलेलं कोणतंही काम देवालाच काय, सर्वांनाच आवडतं.

रोजचा दिनक्रम शिस्तबद्ध रीतीनं पार पाडायचा, प्रयत्नात कसूर नको. मग घरांतल्या देवाला मनोभावे केलेला नमस्कार त्याला पोचतो. त्यासाठी कुठल्याही देवळात जाऊन, तास तास रांगेत उभं राहून त्याचे आशीर्वाद मागण्याची गरज नाही.  त्याचप्रमाणे 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी ' अशा रितीनंदेवावर अवलंबून न राहता, स्वत:च्या प्रामाणिक प्रयत्नांवर भरवसा ठेवला, तर प्रत्येक चांगल्या कामात देव नक्कीच यश देतो. "

"पण मग ताई, याच महिन्यातील आषाढी एकादशीला वारकरी पंढरपूर ची वारी करतात, ती कशासाठी ?" निखिलने बरोब्बर ताईला कोंडीत पकडलं. आता ताई काय सांगते याची सर्वांनाच उत्सुकता वाटली.

स्नेहलताई नं हसून मान डोलावली......" खरंच चांगला प्रश्न आहे निखिल. देवाची भक्ती कशी करायची, याच्या निरनिराळ्या पद्धती प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे ठरवतो. माझ्यासारखीला घरातल्या देवाला मनोभावे केलेला नमस्कारही मनाला समाधान देतो. कोणाला मानसपूजेसारख्या निर्गुणभक्तीमध्ये समाधान मिळतं. पण रोजच्या आयुष्यातील कटकटींनी, अडचणींनी त्रासलेल्या कष्टक-यांची - शेतक-यांची सगुणभक्तीमध्ये श्रद्धा असते. अशाप्रकारे सामूहिक भजन कीर्तनाने त्यांच्या मनाला समाधान मिळतं. देवाची भक्ती हा त्यांना त्यांच्या आयुष्यातला मोठा मानसिक आधार वाटतो. त्यांत काहीचूक नाही. पण त्यांनी ही भक्ती करतांना, त्याच्या आहारी न जाता, आपली कर्तव्यं विसरू नयेत यासाठी संतांनी वेळोवेळी त्यांना उपदेश केलाय. 'आधी प्रपंचकरावा नेटका' असं समर्थ रामदासांनी सांगून ठेवलंय, तर ' जनसेवा हीच ईश्वरसेवा ' असं संत एकनाथ महाराजांनी सांगितलंय.

संत सावतामाळी तर म्हणतात, ' कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी '.

"पण मग हे जप वगैरे करणं कशासाठी ? " शमिका.

"कमकुवत मनाच्या व्यक्तीचं मनोबल वाढवण्यासाठी, व्रत वैकल्यं, जप वगैरे गोष्टी सांगितल्या जातात. आता बघ, असं सांगितलं जातं की येत्या काही दिवसात काही अडचणी येणार आहेत. तूं रोज एक हजार वेळा हा जप कर म्हणजे त्या संकटाची तीव्रता कमी होईल. ती व्यक्ती जप करते. मग तिला वाटतं,आता मी जप केलाय, आता मला जास्त त्रास होणार नाही. म्हणजेच त्या व्यक्तीची संकटाला सामोरं जाण्याची मनाची ताकद वाढते. हेच मला जप न करता साध्य करायचं असेल तर मी काय विचार केला पाहिजे, तर येईल त्या परिस्थितीला मी न डगमगता धैर्यानं सामोरं जाईन. येईल त्या परिस्थितीला स्वीकारूनमी अडचणींवर मात करायला शिकेन. सतत सकारात्मक विचार करीन. अशा प्रकारे मी जर मनोबल वाढवू शकले, तर मला जप, रत्नं, अंगठ्या अशा कोणत्याच उपायांची गरज वाटणार नाही. तुम्हाला काय वाटतं...? "

"खरंच, हे नक्कीच काहीतरी नवीन आहे, वेगळं आहे.... समजलंय.. पण विचार करण्यासारखं आहे ताई. "

मुलं या नवीन विचारांनी नक्कीच भारावून गेली होती. वातावरणातला ताण हलका करण्यासाठी ताई म्हणाली, "चला मंडळी, तळ्यात मळ्यात खेळूया आता...."

दोन भाग आखून झाले. ताईच्या इशा-यानुसार मुलं तळ्यात मळ्यात उड्या मारू लागली. मनांतले विचार सुद्धा तळ्यात मळ्यात करू लागले होते. 

   - मधुवंती पेठे

[email protected]

कोणत्याही गोष्टींचा अतिरेक न करता, त्याचा योग्य तो वापर केला पाहिजे. सगळ्या नवनवीन गोष्टी सर्वांनीच शिकल्या पाहिजेत, पण त्यांच्या आहारी नाही जायचं - सांगतेय स्नेहलताई 

लेख ५ - सांग ना स्नेहलताई