जून महिना उजाडला की जशी शाळा, कॉलेज सुरू व्हायची चाहूल लागते, तसेच पावसाळी सहलींचेसुद्धा प्लॅन्स तयार होत असतात. पावसाळ्यातल्या सहलींचा आनंद आणि उत्साह काही औरच असतो. नवसंजीवनी देणारा पाऊस म्हणजे निसर्गाची किमयाच म्हणायची! उन्हाळ्याच्या रखरखाटाला कंटाळून गेलेला चातक पक्षी पावसाचा पहिला थेंब घ्यायला अगदी आतुर असतो आणि मग वरुणराज बरसला, की त्याच्यासकट सगळेच जीव आनंदून जातात. झाडं ताजीतवानी होतात, नवे अंकूर फुटतात, पृथ्वीचा रंग हिरवा होऊन जातो आणि तो बघताना आपल्याला एक प्रकारचं समाधान आणि आनंद मिळत असतो. हा आनंद जवळून अनुभवण्यासाठी पावसाळ्यात बाहेर पडलंच पाहिजे.

पुण्याच्या जवळपास अशी बरीच ठिकाणे आहेत, जिथे पावसाळ्यात जायलाच हवं. त्यामध्ये ताम्हिणी-डोंगरवाडी, भीमाशंकरचे जंगल, फुलांचा गालिचा पांघरलेले कास पठार, धुवांधार पावसात भिजण्यासाठी आंबोलीचे जंगल अशी एक ना दोन, बरीच ठिकाणे आहेत. तसेच, राजगड, रायगड, सिंहगड, लोहगड यांसारख्या गडांवरही पावसाळ्यात नेहमीच गर्दी होत असते.

जंगलाचा अनुभव घ्यावा; तर तो पावसाळ्यात घ्यावा, असं म्हणतात. आणि तो योग्यच आहे. ताम्हिणीचे जंगल अशा पावसाळ्यात एकदा तरी बघितलेच पाहिजे. तिथे अनेक देवराया आहेत. त्यात असंख्य प्रकारच्या भारतीय वनस्पती आहेत. तसेच, विविध पक्षी, प्राणी, फुलपाखरे आहेत. ताम्हिणी घाटातील जंगलसमृद्धी बघून आपले मन अगदी प्रफुल्लित होते.

भीमाशंकरच्या जंगलाचा अनुभवसुद्धा वेगळाच आहे. तिथेही मोठमोठ्या देवराया आहेत. उंचच-उंच वृक्ष, दाट झाडी, सर्वत्र पसरलेल्या वेली; यांमुळे जमिनीवर सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही. या जंगलात गेल्यावर लक्षात येते की, ही झाडं म्हणजे निसर्गाचा एसीच आहे. इथे इतका थंडावा जाणवतो की, आपल्या घरातल्या एसीमधूनसुद्धा जाणवणार नाही! आणि या थंडाव्याबरोबरच शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजनही मिळतो. आणि तोही फुकट!! या जंगलातून भीमानदी वाहते, जी पावसाळ्यात पूर्णपणे भरलेली असते. या नदीमुळेच  हे जंगल नेहमीच  हिरवेगार दिसते. महाराष्ट्राचा राज्य प्राणी ‘शेकरू’ हा या जंगलातच आढळून येतो. त्याचे दर्शनही सुखावह असते.

सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढला की, कास पठारावर फुलांचा जणू गालिचाच तयार होतो. विविध रंगांची, आकारांची अतिशय सुंदर फुले तिथे पाहायला मिळतात, तसेच काही दुर्मीळ प्रजातींची ऑर्किड्सही याच दरम्यान फुलतात. सात वर्षांनी फुलणारी टोपली कारवीसुद्धा फक्त कास पठारावरच फुलते. कास पठारावर काही कीटकभक्षी वनस्पतीही आढळतात. एकंदरीत काय, तर फुलांचा हा बहर बघण्यासाठी कास हे खासच आहे, असं म्हणायला हरकत नाही.

ज्यांना धुवांधार पावसात भिजायला आवडते, त्यांनी अंबोलीला जायलाच हवं. अंबोली हे उंचीवर असलेलं सदाहरित जंगल आहे. सापांच्या अनेक प्रजाती तिथे आढळतात, तसेच बेडूक, फुलपाखरे, कीटक असे अनेक जीव तिथे आपल्याला बघायला मिळतात. हिरवेगार डोंगर, दर्‍या आणि त्यावर शुभ्र ढगांचा मुकूट आणि कोसळणारा पाऊस असं अनुभवायला अंबोलीला जायलाच हवं.

खरंतर, पावसाळ्यात भ्रमंती करण्यासाठी जागा तशा खूप आहेत. अगदी घरातून बाहेर पडून रस्त्यावर जरी फेरफटका मारला तरी रिफ्रेशींग वाटतं, कारण पाऊस आहेच मन आनंदी करणारा. त्यामुळे पावसाळ्यात नुसतं घरात बसणारा माणूस हा अरसिकच म्हणावा लागेल.

- पल्लवी दाढे

[email protected]