द अदर पेअर

दिंनाक: 08 Jul 2018 15:36:36

इस्त्री केलेला गणवेश, नीट विंचरलेले केस, कापलेली नखे आणि व्यवस्थित पॉलिश केलेले शूज अशी सगळी तयारी करून शाळेत जाणं हा आपला रोजचा शिरस्ता. आपण या बाबतीत खूप काटेकोर असतो नाही का?
 
पण काही मुलांच्या नशिबात गरिबीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे शाळेत जाण्याचा योग नसतो, त्याचप्रमाणे इस्त्री केलेला गणवेश आणि शूज हेही सगळं या मुलांच्या नशिबात नसतं, पण एखाद्या साध्याशा कृतीतून / मदतीतून अशा मुलांच्या मनात आपण आनंद निर्माण करू शकतो.
 
'द अदर पेअर' ही अशीच कहाणी आहे, एक छोटीशी घटना, छोटीशी कृती आणि त्यातून चेहऱ्यावर उमटलेली हास्याची लकेर. शॉर्टफिल्मच्या सुरुवात एका साजेशा संगीत पार्श्वभूमीने होते. रेल्वे स्टेशन, फलाटावर प्रवाशांची गर्दी, प्रत्येकजण आपापल्या ट्रेनची वाट पाहात थांबलेला. फलाटावर एक मुलगा येतोय, येताना त्याची चप्पल तुटते, ती दुरुस्त करता येतेय का हे पाहायला तो मुलगा फलाटाच्या थोडं कडेला जातो, तुटलेली चप्पल स्वतःच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. आता दुसरा मुलगा येतो, तो स्वतःच्या पॉलिश केलेल्या शुजच्या बाबतीत खूपच सतर्क आहे. त्यावर धूळ बसू नये म्हणून तो सतत आपले शूज एका रुमालाने पुसतोय. चप्पल तुटलेल्या मुलाला या दुसऱ्या मुलाचे शूज खूपच आवडले आहेत. एवढ्यात ट्रेन येते. प्रवाशांची गर्दी उसळते आणि ट्रेनच्या डब्यात चढण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न सुरू आहे. याच ट्रेनमध्ये दुसऱ्या मुलालादेखील (जो स्वतःचे शूज सतत पुसतोय) चढायचंय, तो चढतोदेखील, यथावकाश ट्रेन निघण्याची वेळ झालीय आणि गर्दीत त्या मुलाचा शूज बाहेर पडतो. ट्रेन सुटते.
 
आता ट्रेनने हळूहळू वेग पकडायला सुरुवात केली. ट्रेनमध्ये चढलेल्या मुलाला आपला शूज फलाटावरच पडला याच दुःख मग ते पाहून चप्पल तुटलेला मुलगा त्या ट्रेनमधल्या मुलाला त्याचा शूज देण्यासाठी पळण्याची धडपड करतो, अथक प्रयत्नांनंतरही चप्पल तुटलेला मुलगा दुसऱ्या मुलाचा पडलेला शूज परत देऊ शकत नाही...
 
मग पुढे काय होतं? ट्रेनमध्ये चढलेला मुलगा असं काय करतो की, ज्यामुळे चप्पल तुटलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू फुलतं? या प्रश्नांची उत्तरं ही शॉर्टफिल्म पाहून मिळवा.
 
शॉर्टफिल्म पाहिल्यावर आपल्या छोट्याशा कृतीने जर का कोणाला आनंद होणार असेल तर ती कृती नक्की करा. करणार नं?
 
 
 
 
सौजन्य  - यु ट्युब
 
-भाग्यश्री भोसेकर-बीडकर
 
 
‘शॉर्ट फिल्म्सवर परिचय’ या सदरातील पहिली शॉर्टफिल्म बालकामगार या कल्पनेवर आधारित हा लेख. नक्की वाचा आणि पहा.